पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमधील वाढता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुळशी धरणातून पाणी आणण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने तत्त्वतः मान्यता दिली आहे (Sus Mahalunge Water Supply).
या निर्णयामुळे सूस, म्हाळुंगे तसेच पुण्याच्या पश्चिम भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
पुणे, पिंपरी-चिंचवडसह सूस व म्हाळुंगे परिसरात वेगाने होत असलेल्या नागरीकरणामुळे पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक असल्याने मुळशी धरणातून पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव पुढे आला होता (Sus Mahalunge Water Supply).
यापूर्वी शहराच्या उत्तर भागासाठी भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या योजनेच्या लोकार्पणप्रसंगी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे व माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सूस, म्हाळुंगे तसेच पुणे व पिंपरी-चिंचवडच्या पश्चिम भागासाठी मुळशी धरणातून पाणी देण्याची लेखी मागणी केली होती.
राज्य मंत्रिमंडळाने या योजनेला तत्त्वतः मंजुरी देतानाच समाविष्ट गावांतील पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, रस्ते आणि घनकचरा व्यवस्थापनाचे अधिकार पुणे महापालिकेकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरी सुविधा अधिक सक्षमपणे राबवता येणार आहेत.
Sus Mahalunge Water Supply: सूस टेकडीवर ‘वॉटर झोन’चा प्रस्ताव
सूस गावातील सर्वे क्रमांक २१६ येथील टेकडीवर १० ते १५ एकर क्षेत्र ‘वॉटर झोन’ म्हणून आरक्षित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. ही टेकडी तळजाईपेक्षा उंच असल्याने येथून गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने संपूर्ण पुण्याला पाणीपुरवठा शक्य होणार असून, यामुळे मोठ्या प्रमाणात खर्चाची बचत होणार आहे.
या निर्णयामुळे पुण्याच्या पश्चिम भागातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

















Leave a Reply