OTT ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट महोत्सवांचे महत्त्व अधिक ठळक होत असल्याचे मत पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील PIFF ज्यूरी सदस्यांनी व्यक्त केले. विविध संस्कृती, वेगळे दृष्टिकोन आणि अस्सल कलात्मकता अनुभवण्यासाठी फिल्म फेस्टिवल्सना पर्याय नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील PIFF 2026 ज्यूरी सदस्यांनी आज संवाद साधला. यामध्ये विविध देशांतील
चित्रपटांच्या वेगवेगळ्या प्रवाहांत कार्यरत असलेल्या दिग्गजांचा सहभाग होता.
यामध्ये तामिळ लेखक बी. जेयामोहन, स्लोव्हाकियाचे माहितीपट दिग्दर्शक पिटर केरेकेस, तुर्कस्थानच्या दिग्दर्शिका येसिम उस्ताओग्लू, फिनलॅंडच्या लेखिका, चित्रपट दिग्दर्शिका रीट्टा आल्टो, स्पेनचे चित्रपट दिग्दर्शक सेर्गी कासामीतजाना आणि तमिळ चित्रपट दिग्दर्शक सिनू रामासामी यांचा समावेश होता.
युरोपियन सिनेमातील डॉक्युमेंटरी दिग्दर्शक पिटर केरेकेस म्हणाले, “ओटीटी OTT प्लॅटफॉर्म्सवर प्रेक्षक एका ठराविक प्रकारच्या कंटेंटमध्ये अडकून पडतात. चित्रपट महोत्सव मात्र असे चित्रपट समोर आणतात, जे आपण कधीच शोधले नसते. खऱ्या अर्थाने कला समजून घ्यायची असेल, तर चित्रपट महोत्सवाचा अनुभव घेणं गरजेचं आहे.”
चित्रपट परीक्षणाच्या प्रक्रियेबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की, ज्यूरी सदस्यांची अभिरुची वेगवेगळी असली तरी चर्चेच्या माध्यमातून सर्वांना मान्य होईल अशा सामायिक भूमिकेपर्यंत पोहोचणं ही एक आव्हानात्मक पण आनंददायी प्रक्रिया असते. त्यांनी एआय कंटेंटच्या वाढत्या वापराबाबत सावधगिरी व्यक्त केली.
तंत्रज्ञान उपयोगी असले तरी सर्जनशीलतेचा केंद्रबिंदू मानवी जीवन आणि चित्रपटकाराची अभिव्यक्तीच असावी, असे ते म्हणाले. “तुमच्या मातृभाषेतून येणारी अस्सल भावना कोणतंही तंत्रज्ञान निर्माण करू शकत नाही,” असा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.
रीट्टा आल्टो यांनी मोठ्या पडद्यावर, अनेक प्रेक्षकांबरोबर चित्रपट पाहण्याचा अनुभव मोबाईल किंवा वैयक्तिक स्क्रीनवर शक्य नसल्याचे सांगितले. सामूहिक अनुभवातूनच चित्रपटाची खरी ताकद प्रेक्षकांपर्यंत पोहोचते, असे त्यांनी नमूद केले.
बी. जेयामोहन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, की कलेतील मौलिकता आणि अस्सलपणा अनुभवायचा असेल, तर चित्रपट महोत्सवांना कोणताही पर्याय नाही. त्यांनी नवोदित चित्रपटकारांना व्यापक वाचनाचा सल्ला दिला. साहित्य, इतिहास आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्याशिवाय सखोल सिनेमा शक्य नसल्याचे ते म्हणाले.
चित्रपटांवरून चित्रपट बनवण्याऐवजी जगण्यातल्या अनुभूती आणि विचारातून सिनेमा निर्माण करा, असे आवाहन त्यांनी केले.
तर सेर्गी कासामीतजाना यांच्या मते, अशा महोत्सवांमुळे प्रेक्षकांची वैयक्तिक अभिरुची आणि दृष्टिकोन नव्याने परिभाषित होतो. नवोदित दिग्दर्शकांना स्वतःच्या कल्पनांवर विश्वास ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला.
“इतरांसारखे चित्रपट बनवण्याऐवजी तुमची स्वतःची दृष्टी प्रामाणिकपणे मांडणारे चित्रपट करा आणि ते चित्रपट महोत्सवांपर्यंत पोहोचवा,” असे त्यांनी सांगितले.
ओटीटीवरील OTT एकसुरी आणि नकारात्मक कंटेंटच्या पार्श्वभूमीवर चित्रपट महोत्सवांचे महत्त्व अधोरेखित करत सिनू रामासामी यांनी ‘पिफ PIFF 2026 ’मधील प्रचंड गर्दीने येणाऱ्या प्रेक्षकवर्गाचे विशेष कौतुक केले.
भविष्यात प्रादेशिक चित्रपटकारांना अधिक भक्कम पाठबळ देण्यासाठी राज्य सरकारांनी स्वतंत्र ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि चित्रपट संग्रह उभारण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. मराठी चित्रपटांमध्ये दिसणारी कथनातील प्रामाणिकता आणि प्रयोगशीलता ही त्यांची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले. मराठी संस्कृतीशी दक्षिण भारतातील संस्कृतीचं साधर्म्य जाणवत असल्याचंही त्यांनी सांगितले.
तुर्कस्थानच्या दिग्दर्शिका येसिम उस्ताओग्लू यांनी मराठी चित्रपटांतील विषयांची विविधता आणि स्थानिकतेतून जागतिक स्तरावर जाणाऱ्या दृष्टिकोनाचे विशेष कौतुक केले. ही विविधता शोधणे आणि अनुभवणे आपल्यासाठी समृद्ध करणारा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.

















Leave a Reply