CR Sanglikar Arrest
CR Sanglikar Arrest

CR Sanglikar Arrest: पीएसीएल जमीन घोटाळ्याप्रकरणी उद्योजकाला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

पुणे: मिरजेतील प्रसिद्ध उद्योजक आणि राजकीय कार्यकर्ते ॲड. चंद्रकांत रामचंद्र ऊर्फ सी.आर. सांगलीकर यांना पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी मिरज येथून अटक केली (CR Sanglikar Arrest)

बावधन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सुमारे २७ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

पांडुरंग पवार यांनी १८ नोव्हेंबर रोजी दिलेल्या तक्रारीनंतर ॲड. सांगलीकर आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पुढे आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला.

पीएसीएल कंपनीची तसेच सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीच्या ताब्यातील मौजे सुस (ता. मुळशी, जि. पुणे) येथील ३३ एकर जमीन बेकायदा विक्री करून सुमारे २७ कोटी ९१ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या व्यवहारामुळे पीएसीएलमधील गुंतवणूकदार आणि शासनाची फसवणूक झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

CR Sanglikar Arrest: न्यायालयाने सुनावली ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

ॲड. सांगलीकर मिरज परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून त्यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे (CR Sanglikar Arrest).

दरम्यान, या अटकेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ॲड. सी.आर. सांगलीकर यांनी २०१४ मध्ये मिरज विधानसभा निवडणूक लढवली होती. मागील निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यानंतर त्यांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका केली होती.

सध्या सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अटकेकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.

हेही वाचाः German Bakery Blast: प्रकरणातील आरोपी बंटी जहागिरदारवर श्रीरामपूरमध्ये गोळीबार 

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.