Navrasya
Navrasya

Navrasya: सूर्यदत्त नॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात; विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट सादरीकरण

पुणे: सूर्यदत्त नॅशनल स्कूलतर्फे वार्षिक स्नेहसंमेलन ‘नवरस्य: व्हेअर इमोशन्स स्पीक’ (Navrasya)मोठ्या उत्साहात झाले.

‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमधील बन्सीरत्न सभागृहात आयोजित स्नेहसंमेलनात भारतीय संस्कृतीतील शृंगार, हास्य, करुणा, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स, अद्भुत आणि शांत या नवरस भावनांवर विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, संगीत, दृश्यकथन अशा विविध कलाप्रकारांद्वारे मानवी भावविश्वाची प्रभावी आणि हृदयाला भिडणारी अभिव्यक्ती साकारली.

‘ऑपरेशन सिंदूर’ या देशभक्तीपर भावनेने भारलेल्या व ‘वीर’ रस दर्शविणाऱ्या या प्रस्तुतीने प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणत, सैनिकांच्या शौर्य, त्याग आणि धैर्याला मनोभावे अभिवादन केले.

Navrasya: शिस्तबद्ध आणि उत्कृष्ट सादरीकरण

इयत्ता ३ री ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य, संगीत, दृश्य सादरीकरण इत्यादी माध्यमांतून प्रत्येक रसाचे रंगमंचावर प्रभावी दर्शन घडविले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध आणि उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थित पालक व मान्यवरांची दाद मिळाली.

उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाचे कौतुक केले. सुरुवातीला शृंगार रसातील ‘मोहे रंग दो लाल’ आणि ‘काहे करे शृंगार’ यांसारख्या कलाकृतींतून प्रेम आणि सौंदर्याची पवित्र अनुभूती रंगमंचावर साकारली.

पुढच्या टप्प्यात हास्य रसाचा शिरकाव झाला आणि खुसखुशीत विनोद व हलक्याफुलक्या कार्यक्रमातून उपस्थितांमध्ये हास्यलहरी व उत्साह संचारला. ‘धुरंधर टेररिस्ट थीम’मधून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे भयानक वास्तव विद्यार्थ्यांनी मांडले (Navrasya Cultural Program).

‘भरें नैना’मधून करुण रस जागृत झाला. प्रिय व्यक्तीच्या निधनाचे दुःख आणि अश्रूंनी भरलेली संवेदना मनाला भिडली. या वेदनेतून प्रकट झालेल्या संतापाचे रूप ‘आरंभ है प्रचंड’ आणि ‘रक्त चरित्र’च्या सादरीकरणांतून रौद्र रसात उमलले.

दहशतवादाविरुद्धचा आक्रोश आणि अन्यायाविरोधातील धग वीर रसाच्या माध्यमातून प्रभावीपणे उमटली. ‘मर्दानी’ आणि ‘काली महाकाली’ सारख्या सादरीकरणातून भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम करण्यात आला, ज्यामध्ये सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांना समर्पित भाग विशेष भावला.

त्यानंतर, अद्भुत रसातील ‘कौन है वो’ आणि ‘मल्हारी’मधून राष्ट्राच्या पराक्रमाचा भव्य दिमाख अनुभवता आला. सोहळ्याचा शेवट शांत रसाने झाला; ‘तू भूला जिसको’ आणि ‘जीतेंगे’ मधून एकात्मता व राष्ट्रप्रगतीचा संकल्प मांडत कथेला हृदयस्पर्शी समारोप मिळाला (Navrasya Cultural Program).

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया कार्यक्रमाचे अध्यक्ष, तर ब्रिगेडियर प्रशांत शिरोडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘सूर्यदत्त’च्या उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, विद्या लड्डा आदी उपस्थित होते.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण, सुसंगत आणि विचारप्रवर्तक सादरीकरणाचे (Navrasya) मनापासून कौतुक केले. त्यांनी आपल्या देशातील विविध संस्कृतींचे जतन करण्याचे महत्त्व, जवानांनी केलेल्या शौर्याचे स्मरण, तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी केलेले उत्कृष्ट आणि प्रभावी सादरीकरण याची विशेष दखल घेतली.

या कार्यक्रमातून भावनिक बुद्धिमत्ता, सांस्कृतिक मूल्यांची जाण, तसेच देशप्रेमाची भावना विद्यार्थ्यांत रुजविण्याचा शाळेचा उपक्रम आहे. सूक्ष्म नियोजन, कलात्मक नृत्यदिग्दर्शन, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास तसेच सुसंस्कृत सादरीकरण झाले. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळण्यासाठी असे उपक्रम महत्वाचे ठरतात, असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.

ब्रिगेडियर प्रशांत शिरोडे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी शब्दांत संबोधित केले. भारतीय सैन्यातील त्यांच्या अनुभवातून त्यांनी शिस्त, धैर्य, त्याग आणि देशभक्ती या मूल्यांवर प्रकाश टाकला. ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भातून त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि जबाबदारीची जाणीव बाळगण्याचे आवाहन केले.

हेही वाचाः Jalmitra Puraskar: पाणी आणि शेतीशिवाय मानवजातीचे अस्तित्व शक्य नाही : डॉ. सुरेश प्रभू 

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.