पुणे: ऑस्करच्या यादीत आलेले तब्बल ९ चित्रपट पाहण्याची संधी १५ ते २२ जानेवारीदरम्यान होणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF 2026) मिळणार आहे. यातील ४ चित्रपट हे गोल्डन ग्लोब पुरस्कारांच्या यादीतही आहेत.
सध्या जगभरामध्ये गाजत असलेले ‘सेंटीमेंटल व्हॅल्यू’, ‘सिरात’ आणि ‘इट वॉज जस्ट अॅन अॅक्सिडेंट’, हे तीन चित्रपट आणि इतर ५ चित्रपट ग्लोबल सिनेमा या विभागात पाहायला मिळणार आहेत. तर ‘ऑल दॅटस् लेफ्ट ऑफ यू’, हा चित्रपट जागतिक चित्रपट स्पर्धा विभागात पाहायला मिळणार आहे.
ऑल दॅटस् लेफ्ट ऑफ यू – (जर्मनी, सायप्रस, पॅलेस्टाईन, जॉर्डन, ग्रीस, सौदी अरेबिया, कतार) हा शिरेन दाबीस या पॅलेस्टाईन-अमेरिकन दिग्दर्शिकेचा चित्रपट ऑस्करच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या पहिल्या यादीमध्ये नुकताच समाविष्ट करण्यात आला आहे. शिरेन दाबीस यांच्या अमरिका या चित्रपटाला यापूर्वी २००९ मध्ये कान्स महोत्सवात फ्रीप्रेसी पुरस्कार मिळाला होता.
‘सेंटिमेंटल व्हॅल्यू’, हा २०२५ चा गाजणारा चित्रपट जोआकिम ट्रियर यांनी दिग्दर्शित केला आहे. यात रेनेट रेन्सवे, स्टेलन स्कार्सगार्ड, इंगा इब्सडॉटर लिलियास आणि एले फॅनिंग यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट एक प्रसिद्ध दिग्दर्शक आणि त्याच्या दोन विभक्त मुलींमधील तुटलेल्या नात्यावर आधारित आहे.
२०२५ च्या कान्स चित्रपट महोत्सवाच्या मुख्य स्पर्धेत या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर झाला आणि त्याला ग्रँड प्रिक्स पुरस्कार मिळाला. ९८ व्या अकादमी (ऑस्कर) पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मसाठी नॉर्वेजियन प्रवेशिका म्हणून त्याला पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे. गोल्डन ग्लोब पुरस्कारांच्या यादीतही या चित्रपटाला नाव आहे.
ऑस्कर यादीतील ९ चित्रपट पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात | PIFF 2026
‘सिरात’, हा २०२५ चा ऑलिव्हर लॅक्से दिग्दर्शित चित्रपट आहे. हा चित्रपट दक्षिण मोरोक्कोच्या वाळवंटात आपल्या हरवलेल्या मुलीचा आणि रेव्ह पार्टी करणाऱ्या गटाचा शोध घेणाऱ्या वडिलांची कथा सांगतो. या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर १५ मे २०२५ रोजी ७८ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या मुख्य स्पर्धेत झाला होता. तिथे त्याला ज्युरी पारितोषिक मिळाले होते.
८३ व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये, याला सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट मूळ स्कोअरसाठी यादीत नाव असून, ९८ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मसाठी यादीत स्थान मिळाले आहे.
‘इट वॉज जस्ट अॅन अॅक्सिडेंट’, हा जाफर पनाही यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट इराण, फ्रान्स आणि लक्झेंबर्ग यांच्या संयुक्त निर्मितीत बनवण्यात आला आहे. मे २०२५ रोजी ७८ व्या कान्स चित्रपट महोत्सवाच्या मुख्य स्पर्धेत या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर झाला आणि त्यांला पाल्म डी’ओर पुरस्कार मिळाला.
८३ व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये, हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी यादीत स्थान मिळालेला पहिला इराणी चित्रपट ठरला आणि सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी देखील त्याला स्थान मिळाले आहे. ९८ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी फ्रेंच प्रवेशिका म्हणून या चित्रपटाला पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे.
या चित्रपटांना जानेवारी १५ ते २२ दरम्यान होणाऱ्या ‘पिफ’मध्ये (PIFF 2026) पाहता येणार आहे. यांशिवाय ‘साउंड ऑफ फॉलिंग’ हा मास्का शिलिन्स्की यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट, ‘कटिंग थ्रू रॉक्स’ हा मोहम्मदरेझा आयनी आणि सारा खाकी दिग्दर्शित केलेला माहितीपट पाहता येणार आहे.
‘द प्रेसिडेंट्स केक’, हा हसन हादी यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट, ‘लेट शिफ्ट’, हा पेट्रा व्होल्पे यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आणि ‘नो अदर चॉइस’, हा जो पार्क चान-वूक यांनी दिग्दर्शित केलेला कोरियन व्यंग्यात्मक ब्लॅक कॉमेडी थ्रिलर चित्रपट ऑस्करच्या यादीत असून, पिफमध्ये पाहता येणार आहेत. ‘नो अदर चॉइस’, या चित्रपटालाही गोल्डन ग्लोबमध्ये यादीत स्थान मिळाले आहे.
पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २४ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (PIFF 2026) यंदा १५ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत पुण्यातील १० स्क्रीनवर होत असून, त्याचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन www.piffindia.com या संकेतस्थळावर सुरू झाले आहे.

















1 Comment