PIFF Awards 2026
PIFF Awards 2026

PIFF Awards 2026: बिस्वजित चॅटर्जी, फरीदा जलाल, आशा काळे यांना ‘पिफ’चा सन्मान

पुणे: भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते बिस्वजित चॅटर्जी, ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल आणि मराठी सिने-नाट्यसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आशा काळे यांना यंदाचा ‘PIFF Distinguished Award’ प्रदान करण्यात येणार आहे (PIFF Awards 2026).

तसेच ज्येष्ठ व्हायोलिन वादक व संगीतकार अमर हलदीपूर यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीतकार एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (PIFF) अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

पुणे फिल्म फाउंडेशन, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २४ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (PIFF Awards 2026) १५ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात पुरस्कार, मराठी चित्रपट स्पर्धा, ‘मराठी सिनेमा टुडे’, तसेच विविध कार्यशाळा व चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

PIFF Awards 2026: पुरस्कार सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडणार

महोत्सवाचे उद्घाटन १५ जानेवारी रोजी सायंकाळी ई-स्क्वेअर थिएटर येथे होणार असून, समारोप व पुरस्कार सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडणार आहे. यंदा PIFF Awards 2026 पुण्यातील १० स्क्रीनवर आयोजित केला जाणार असून, ऑनलाईन नोंदणी www.piffindia.com या संकेतस्थळावर सुरू झाली आहे. प्रत्यक्ष थिएटरवरील नोंदणी ५ जानेवारीपासून सुरू होणार आहे.

यावेळी मराठी चित्रपट स्पर्धेसाठी निवड झालेल्या सात चित्रपटांची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण आंतरराष्ट्रीय परीक्षकांमार्फत करण्यात येणार असून, विजेत्या चित्रपटास महाराष्ट्र शासनाचा संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार (५ लाख रुपये) दिला जाणार आहे.

हेही वाचाः PIFF 2026: ‘ऑस्कर’च्या यादीतील ९ चित्रपट पिफमध्ये पाहण्याची संधी 

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.