रंजना आणि रमेश जोशी हे दांपत्य

Elderly Couple Love Story आजारपणातही पत्नीला आयुष्यभराची साथ देणारे ‘व्हॅलेंटाईन’ आजोबा– आजारी पत्नीची अखंड सुश्रूषेसह प्रेमाची साथ

पुणे : हातात कॉफीचा कप, मशीनवर सुरू असलेले पत्नीचे डायलिसिस… आणि तिच्या कपाळावर हलकेच हात फिरवत ‘काळजी करू नकोस, मी आहे ना’ असे हळूच म्हणणारे ऐंशी वर्षीय रमेश जोशी. (Elderly Couple Love Story) प्रेम म्हणजे नक्‍की काय असतं, याचं जिवंत उदाहरण ठरलेले व पत्नीला आपला ‘व्हॅलेंटाईन’ मानणारे हे आजोबांच अनोख प्रेम आजच्‍या काळात अभावानेच आढळते.

(Elderly Couple Love Story) पत्नी रंजना यांचे दोन्ही मूत्रपिंड दोन वर्षांपूर्वी निकामी झाले. त्यानंतर आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस हा त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनला. मात्र या कठीण प्रवासात त्या कधीच एकट्या नाहीत. प्रत्येक वेळी रुग्णालयात त्यांच्या सोबत पती ठामपणे उभे असतात.


व्हॅलेंटाईन डे निमित्त तरुणाई प्रेम साजरे करत असताना, या आजी-आजोबांचे प्रेम (Elderly Couple Love Story) मात्र शब्दांपेक्षा कृतीतूनच अधिक बोलके ठरत आहे. विवाहानंतर किरकोळ कारणांवरून नाती तुटत असलेल्या काळात पती-पत्नीचे नाते किती घट्ट, निरपेक्ष आणि त्यागमय असावे, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रंजना आणि रमेश जोशी हे दांपत्य आहे.

सिंहगड रस्त्यावरील सनसिटी येथे वास्तव्यास असलेले जोशी दांपत्य आजच्या पिढीला नात्याचा खरा अर्थ शिकवणारे जोडपे ठरत आहे. (Elderly Couple Love Story) शासकीय दूध डेअरीतून लिपिक पदावरून निवृत्तीनंतर निवांत आयुष्य जगण्याचा काळ असताना, जोशी आजोबांनी पत्नीला साथ द्यायची हेच आपले कर्तव्य मानले. डायलिसिसच्या तासन्‌तास चालणाऱ्या प्रक्रियेदरम्यान ते पत्नीशेजारी बसून राहतात.

वेळेवर औषधे देणे, डॉक्टरांशी चर्चा करणे, जेवण भरवणे, थकवा जाणवला तर हात धरून धीर देणे, इतकेच नव्हे तर प्रेमाने स्वतःच्या हाताने कॉफी पाजणे, या छोट्या छोट्या कृतींमधून त्यांचे प्रेम अधिक दृढपणे दिसून येते. दर तीन-चार महिन्यांनी रुग्णालयात दाखल व्हावे लागले तरी जोशी आजोबा रात्रंदिवस पत्नीसमवेत असतात. मुलगा असूनही त्याच्यावर भार टाकू नये, या भावनेतून सर्व जबाबदारी ते स्वतः सांभाळत आहेत.

‘पूर्वीच्या चित्रपटांमध्ये जुन्या नायकांचे प्रेम आणि त्याग पाहिला. मनात वाटायचं, असंच प्रेम करावं. लग्न म्हणजे फक्त एक सोहळा नसतो, ती आयुष्यभराची सोबत असते,’ असे जोशी हसत सांगतात. त्यांचे हे प्रेम पाहून रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकाही भारावून गेले आहेत.

त्‍यांच्‍यावर उपचार करणारे संजीवनी रुग्णालयातील अतिदक्षता विभागतज्ज्ञ डॉ. भुषण किन्होळकर म्हणाले, “अलीकडच्या काळात इतकं निस्वार्थ प्रेम दुर्मिळच दिसतं. किरकोळ कारणांवरून नातेसंबंध तुटताना दिसतात. अशा वेळी जोशी दांपत्य खऱ्या अर्थाने आदर्श ठरते.”

‘पती-पत्नी हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. जीवात जीव असेपर्यंत ही साथ निभावायची आहे,’ असे म्हणताना जोशी यांच्या डोळ्यांत समाधान दिसते. तर ‘आज पैशांना जास्त महत्त्व दिलं जातं. पती पत्‍नीच्‍या नात्यांमधील प्रेम कमी होत चालल्याचं पाहून खंत वाटते,’ असेही त्यांनी सांगितले. फुलांचे गुच्छ, भेटवस्तू किंवा सोशल मीडियावरील पोस्ट्सपेक्षा आयुष्यभराची साथ देणारे हे खरेखुरे प्रेमच अधिक मोठे असल्याचे या दांपत्याकडे पाहून जाणवते. 

हे ही वाचा: Digital OPD System सरकारी रुग्णालयांत डिजिटल क्रांती; ‘मोबिचिकित्सा’मुळे ओपीडी झाली स्मार्ट