पुणे महानगरपालिका

Pune Municipal Corporation एप्रिलनंतर कमी दराच्या निविदांना लगाम; महापालिकेचे नवे धोरण; पूर्वगणनपत्रकापेक्षा ३०–५० टक्के कमी दराच्या निविदांना मंजुरी नाही

पुणे : पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation विविध ड्रेनेज व मलनिस्सारण कामांसाठी निघालेल्या निविदा पूर्वगणनपत्रकापेक्षा ३० ते ३६ टक्के कमी दराने आल्याने त्याबाबत चर्चा रंगली आहे. सुमारे ११ कोटी रुपयांच्या या निविदांना स्थायी समितीने मंजुरी दिली असली, तरी इतक्या कमी दरामुळे कामांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

त्यामुळे महापालिका Pune Municipal Corporation प्रशासनाने याबाबत धोरण तयार करण्याचा निर्णय घेतला असून १ एप्रिलनंतर पूर्वगणनपत्रकापेक्षा ३० ते ५० टक्के कमी दराच्या निविदांना मंजुरी दिली जाणार नाही, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

महापालिकेच्या सिवेज विभागामार्फत शहरातील अनेक भागांमध्ये जुन्या व कमी क्षमतेच्या मलवाहिन्या बदलून मोठ्या व्यासाच्या नवीन मलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेतले आहे.

कल्याणीनगर सिवेज डिस्ट्रिक्ट अंतर्गत देवकर चौक ते राजीव गांधीनगर तसेच एअरफोर्स कंपाउंड वॉल परिसर, सीसीडी चौक ते कोणार्कनगर, एचसीएमटीआर रस्ता ते ओकवुड सोसायटी परिसर, साकोरेनगर, पर्णकुटी चौक ते मदर तेरेसा नगर आणि येरवडा येथील वांजळे वखार ते तलेसरा हॉल या भागांमध्ये जुन्या मलवाहिन्या बदलून नवीन लाईन टाकण्यात येणार आहेत. या कामासाठी आलेली निविदा सुमारे २ कोटी ३३ लाख रुपयांची असून ती पूर्वगणनपत्रकापेक्षा ३३.७८ टक्के कमी दराने आली आहे.

याशिवाय संगम हॉटेल परिसरात अपूर्ण मलवाहिनीचे काम पूर्ण करण्यासाठी आलेल्या निविदा सुमारे ३४ टक्के कमी दराने प्राप्त झाल्या आहेत. वाघोली परिसरातील अनुसया पार्क सोसायटी, छत्रपती संभाजीनगर, साईराज पार्क आणि दुबे नगर येथे मुख्य मलवाहिनी विकसित करण्यासाठीची निविदा २३ टक्के कमी दराने आली आहे. तसेच वाघेश्वरनगर, सोपान बोडेघर विटकर चाळ ते कचरा डेपोपर्यंत मुख्य मलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी ३६ टक्के कमी दराची निविदा आली आहे.

सोलापूर रस्त्यालगतच्या मत्स्यबीज मैलापाणी शुद्धीकरण केंद्राकडे येणाऱ्या सिवेज लाईनसाठी हुंडई शोरूम ते कॅनॉल तसेच अण्णासाहेब मगर महाविद्यालय परिसरात ९०० मिमी व्यासाची मलवाहिनी टाकण्याच्या कामासाठीही ३६ टक्के कमी दराने निविदा प्राप्त झाल्या आहेत. टेल्को कॉलनी ते नाला या भागात मुख्य मलवाहिनी विकसित करण्याच्या कामासाठी ३३ टक्के कमी दराने निविदा आली आहे.

प्रभाग क्रमांक ४० मधील जैन मंदिर पायथा, अंजनीनगर, सुर्यदत्त हौसिंग सोसायटी आणि नाकोडा मंदिर परिसरात मलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी ३२ टक्के कमी दराने निविदा प्राप्त झाली आहे. तसेच धनकवडी येथील विघादत्त सोसायटी, मोहननगर आणि भारती विद्यापीठ परिसरातील मलवाहिनी विकासासाठी ३२ टक्के कमी दराची निविदा आली आहे. विमाननगरमधील संजय पार्क, मस्जिद गल्ली आणि नाना नानी पार्क परिसरात मोठ्या व्यासाची मलवाहिनी विकसित करण्याच्या कामासाठी ३४ टक्के कमी दराने निविदा प्राप्त झाली आहे.

दरम्यान, शहरातील नालेसफाईसह विविध विकासकामांच्या निविदा गेल्या तीन वर्षांपासून १० ते ५० टक्के कमी दराने येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या कामांचे पूर्वगणनपत्रक जास्त दाखवले जाते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

इतक्या कमी दराने निविदा देऊनही ठेकेदारांना ही कामे कशी परवडतात, याबाबतही चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन निविदा प्रक्रियेत शिस्त आणण्यासाठी नवीन धोरण तयार करत असून त्यामध्ये एका ठेकेदाराला तीनपेक्षा जास्त कामे न देण्याची अट ठेवण्याचाही विचार करण्यात येत आहे.

हे ही वाचा : Murlidhar Mohol विमानतळाला थेट मेट्रोची जोड; व्यावहारिक मार्ग अंतिम, लवकरच काम सुरू – मुरलीधर मोहोळ