Pune Water Tanks
Pune Water Tanks

Pune Water Tanks: समान पाणीपुरवठा योजनेच्या कामांना संथ गती; जलवाहिन्या, टाक्यांची कामे अद्याप अपूर्ण

पुणे महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी समान पाणीपुरवठा योजनेची कामे (Pune Water Tanks) विविध तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे अद्यापही संथ गतीने सुरू आहेत.

योजना जाहीर होऊन आठ वर्षांचा कालावधी उलटला असला, तरी जलवाहिन्या, पंपिंग स्टेशन आणि पाण्याच्या टाक्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. परिणामी, प्रत्यक्ष समान पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी पुणेकरांना आणखी तीन ते चार महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

शहरातील अनेक भाग तसेच समाविष्ट गावांमधील नागरिकांना अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ही समस्या दूर करून नागरिकांना सुरळीत व समान पाणीपुरवठा मिळावा, या उद्देशाने महापालिकेने २०१७ मध्ये सुमारे ९७३ कोटी रुपयांची ‘समान पाणीपुरवठा योजना’ जाहीर केली होती.

मात्र, कामाच्या सुरुवातीपासूनच कोरोना महामारीसह विविध अडचणींमुळे या योजनेच्या कामांना अपेक्षित गती मिळू शकली नाही.

कोरोनानंतर कामाला वेग येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, भूसंपादनाच्या समस्येमुळे कामात अडथळे येत राहिले. मागील वर्षभरात काही प्रमाणात कामाला गती मिळाली असली, तरी अद्यापही भूसंपादनाच्या प्रश्नामुळे अनेक ठिकाणी कामे रखडलेली आहेत.

Pune Water Tanks: कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात १४ जलवाहिन्यांचे काम अपूर्ण

कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात १४ पाण्याच्या टाक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांचे काम अद्याप पूर्ण व्हायचे आहे. सुमारे ९०० मीटर जलवाहिन्या टाकण्याचे काम बाकी असून, जागेचा अभाव, जलवाहिन्यांच्या मार्गात येणारी पक्की घरे तसेच जलवाहिन्यांमधील अंतर यामुळे कामास अडथळे येत आहेत.

याशिवाय काही पाण्याच्या टाक्या (Pune Water Tanks), पंपिंग स्टेशन आणि जलवाहिन्यांची कामे सध्या सुरू आहेत. पंपिंग स्टेशनवर आवश्यक यंत्रसामग्री बसविण्याची प्रक्रिया सुरू असून, या सर्व कारणांमुळे समान पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी विलंबित होत आहे.

आतापर्यंत ८२ पैकी ६७ पाण्याच्या टाक्यांची कामे पूर्ण झाली असून, एकूण १२०० किलोमीटरपैकी सुमारे ११०० किलोमीटर जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.

या योजनेअंतर्गत शहरात सुमारे १२०० किलोमीटर लांबीचे जलवाहिन्यांचे जाळे उभारण्यात येत आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून येणाऱ्या मुख्य जलवाहिनीला विविध ठिकाणी उपजलवाहिन्या जोडल्या जाणार असून, त्यावर व्हॉल्व बसवून पाणीटंचाईग्रस्त भागातही पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.

यामुळे शहरातील विविध भागांमध्ये नियमित व समान पाणीपुरवठा होण्यास मदत होणार असून, पाण्याची गळती कमी होण्याचीही अपेक्षा आहे.

समान पाणीपुरवठा योजनेतील उर्वरित पाण्याच्या टाक्या (Pune Water Tanks), जलवाहिन्या आणि पंपिंग स्टेशनची कामे मार्चअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. योजनेअंतर्गत उभारलेल्या काही टाक्यांमधून सध्या पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली.

हेही वाचाः Navrasya: सूर्यदत्त नॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात; विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट सादरीकरण 

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.