केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला

Union Budget 2026 महाराष्ट्राच्या विकासाला गती – मेट्रो, ग्रामीण भाग, हायस्पीड रेल्वेसाठी कोट्यवधींची तरतूद

दिल्ली   :- ( Union Budget 2026 ) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवार, दि. १ फेब्रुवारी रोजी संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. ५३.५ लाख कोटी रुपयांच्या भव्य खर्चाचा आराखडा मांडत सरकारने पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास, कृषी, वाहतूक आणि कौशल्य विकासावर विशेष भर दिला आहे.

 या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला मोठ्या प्रमाणावर निधी मिळाल्याने राज्याच्या सर्वांगीण विकासाला नवी चालना मिळणार आहे. ( Union Budget 2026 )

मेट्रो आणि शहरी वाहतुकीला बळ

मुंबई आणि पुणे या राज्यातील दोन प्रमुख शहरांमधील मेट्रो प्रकल्पांना अर्थसंकल्पातून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई मेट्रोसाठी १ हजार ७०२ कोटी रुपये, तर पुणे मेट्रोसाठी ६१७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे रखडलेल्या कामांना वेग मिळून प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

याशिवाय एमयुटीपी (Mumbai Urban Transport Project) साठी ४६२ कोटी, एमएमआर विभागातील ग्रीन मोबिलिटीसाठी १५५ कोटी आणि महामार्गांवरील इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम (ITS) साठी ६८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे शहरी वाहतूक अधिक स्मार्ट आणि पर्यावरणपूरक होणार आहे.

ग्रामीण महाराष्ट्रासाठी काय खास ?

अर्थसंकल्पात ग्रामीण भागाच्या विकासाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. ग्रामीण रस्ते प्रकल्पांसाठी ३७८ कोटी रुपये तर कृषी आधारित बिझनेस नेटवर्कसाठी १६७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

उपसा सिंचन योजनांचे सौर उर्जिकरण करण्यासाठी २०७ कोटी रुपये देण्यात आले असून यामुळे शेतकऱ्यांचा वीज खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.

तसेच अग्री बिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशनसाठी ६४६ कोटी, प्रत्येक जिल्ह्यात संस्थात्मक संरचना व क्षमता वाढीसाठी २४० कोटी, तर इकॉनॉमिक क्लस्टरसाठी २८३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे ग्रामीण रोजगार, स्थानिक उद्योग आणि मूल्यसाखळी मजबूत होण्याची अपेक्षा आहे.

पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी

महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या असलेल्या मुंबई–अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी ६ हजार १०३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल. देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प असल्याने महाराष्ट्रासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

राज्याच्या तिजोरीत वाढ

डिव्होल्यूशन ऑफ टॅक्सेसच्या सूत्रानुसार महाराष्ट्राला यंदा केंद्राकडून ९८ हजार ३०६ कोटी रुपये मिळणार आहेत. हा निधी मागील वर्षीच्या तुलनेत अधिक असून त्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीला बळकटी मिळणार आहे.

शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकास

आरोग्य आणि मनुष्यबळ विकासासाठीही अर्थसंकल्पात ठोस तरतुदी करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र टर्शरी केअर मेडिकल एज्युकेशन डेव्हलपमेंट कार्यक्रमासाठी ३८५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
तसेच डेव्हलपमेंट अँड अप्लाईड नॉलेज अँड स्किल फॉर ह्युमन डेव्हलपमेंटसाठी ३१३ कोटींची तरतूद करण्यात आली असून याचा फायदा तरुणांच्या कौशल्यविकासाला होणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अर्थसंकल्पात Union Budget 2026 महाराष्ट्राच्या वाट्याला मिळालेल्या निधीची माहिती देत केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. एकूणच, हा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास, शहरी वाहतूक आणि मानवी विकासाच्या दृष्टीने आशादायी ठरत असून राज्याच्या प्रगतीला नवी दिशा देणारा आहे.

हे ही वाचा : http://Union Budget 2026 : कोणाच्या खिशाला दिलासा, कोणावर महागाईचा फटका ? जाणून घ्या काय स्वस्त, काय महाग

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.