PMC Politics पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निलेश निकम; विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणार


पुणे : PMC Politics पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी अनुभवी नगरसेवक निलेश निकम यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे महापालिकेतील विरोधी पक्ष नेतृत्वाची सूत्रे आता निकम यांच्या हाती येणार  असून, भाजपच्या एकहाती सत्तेला सामोरे जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अनुभवी नेतृत्वावर विश्वास टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.

निलेश निकम हे महापालिकेतील परिचित आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी महापालिकेचे सभागृह नेते तसेच स्थायी समिती अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे यशस्वीपणे सांभाळली आहेत. PMC Politics

महापालिकेतील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी असून, त्यांनी आतापर्यंत चार टर्म पूर्ण केल्या आहेत. सध्या त्यांची ही पाचवी टर्म आहे. त्यामुळे प्रशासन, विकासकामे आणि सभागृहातील राजकीय डावपेच यांची त्यांना सखोल जाण आहे.

पुणे महापालिकेतील सध्याच्या पक्षीय बलाबलाचा विचार करता, PMC Politics भारतीय जनता पक्षाला तब्बल ११९ जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा ३० जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून, काँग्रेसकडे १५, उद्धव ठाकरे गटाकडे १ तर शिंदे सेना आणि मनसेकडे एकही जागा नाही. या राजकीय गणितामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता हाच महापालिकेतील अधिकृत विरोधी पक्ष नेता ठरतो.

भाजपची एकहाती सत्ता असली, तरी लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्ष नेत्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. PMC Politics जनतेचे प्रश्न, नागरी सुविधांतील त्रुटी, प्रशासनातील अनियमितता आणि विकासकामांतील त्रास सभागृहात ठामपणे मांडण्याची जबाबदारी विरोधी पक्ष नेत्यावर असते. या पार्श्वभूमीवर निलेश निकम यांची निवड ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी रणनीतीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

निकम यांच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या काळात पुणे शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा मेट्रो रेल्वे प्रकल्प स्थायी समिती आणि मुख्य सभेत मंजूर झाला होता. त्या काळात या प्रकल्पाबाबत विविध पातळ्यांवर चर्चा, टीका आणि विरोध होत असतानाही त्यांनी समन्वयाची भूमिका घेत प्रकल्पाला गती दिली होती. आज पुणे मेट्रो शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा कणा बनत असताना, त्या निर्णयांचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे.

त्याचबरोबर निलेश निकम यांनी सुरू केलेली शहरी गरीब योजना ही महापालिकेच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक लोकप्रिय योजनांपैकी एक ठरली आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अनेक रुग्णांना महागड्या उपचारांसाठी आर्थिक मदत मिळाली. आरोग्य सेवांच्या क्षेत्रात ही योजना एक आदर्श उपक्रम म्हणून ओळखली जाते.

अनुभव, अभ्यास आणि प्रशासनावर पकड या त्रिसूत्रीच्या जोरावर निलेश निकम हे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते म्हणून जबाबदारी भक्कमपणे सांभाळतील, PMC Politics असा पक्षातील नेत्यांचा विश्वास आहे. भाजपच्या बहुमताच्या पार्श्वभूमीवर सभागृहात प्रभावी विरोध, जनतेच्या प्रश्नांसाठी ठाम भूमिका आणि विकासकामांवर बारकाईने लक्ष ठेवणे, हीच आगामी काळातील त्यांच्या भूमिकेची दिशा असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा :- http://Ganesh Naik vs Eknath Shinde गणेश नाईकांची शिंदेंवर जहरी टीका; राजकीय वर्तुळात खळबळ, धंगेकरांची उपरोधिक प्रत्युत्तरात्मक पोस्ट चर्चेत

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.