PMC Election 2026
PMC Election 2026

PMC Election 2026: शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येणार? पुण्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या (PMC Election 2026) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यातील संभाव्य युतीची चर्चा अखेर फिस्कटली आहे. गुरुवारी (२६ डिसेंबर) झालेल्या चर्चांमध्ये जागावाटप आणि निवडणूक चिन्हावरून मतभेद निर्माण झाल्याने दोन्ही गटांमध्ये एकमत होऊ शकले नाही.

अजित पवार गटाने शरद पवार गटाला ३० ते ३५ जागा देण्याचा प्रस्ताव मांडत ‘घड्याळ’ या निवडणूक चिन्हावरच निवडणूक लढवण्याची अट घातली होती. मात्र हा प्रस्ताव शरद पवार गटाने नाकारला. त्यामुळे आगामी पुणे महापालिका निवडणूक (PMC Election 2026) दोन्ही गट स्वतंत्रपणे लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते अंकुश काकडे यांनी आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे शिवसेना यांच्यात संभाव्य आघाडीच्या चर्चांना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे नेते रवींद्र धंगेकर यांनी याबाबत सावध आणि सकारात्मक भूमिका मांडली. कोणत्याही युतीत कार्यकर्त्यांना मान-सन्मान मिळाला पाहिजे. कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार न करता घेतलेले निर्णय पक्षासाठी घातक ठरू शकतात, असे त्यांनी सांगितले.

PMC Election 2026: कार्यकर्त्यांच्या भावना महत्त्वाच्या ठरणार

धंगेकर यांनी भाजपकडून आलेला जागावाटपाचा प्रस्ताव नाकारत, ज्या जागांवर भाजपने ऑफर दिली आहे, त्या जागांवर आम्ही किंवा शिवसेना कधीही निवडून आलो नाही, असे स्पष्ट केले. त्यांनी एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांची भेट घेतली असून, अंतिम निर्णय घेताना कार्यकर्त्यांच्या भावना महत्त्वाच्या ठरणार असल्याचे सांगितले.

शिवसेना (शिंदे गट) च्या कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेबाबत बोलताना धंगेकर म्हणाले की, काल आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्रपणे व्यक्त झाल्या. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना सन्मान मिळणे आवश्यक आहे.

सध्या पुणे महापालिका निवडणुकीत बहुपक्षीय लढत होण्याची चिन्हे असून, महाविकास आघाडी (काँग्रेस, शिवसेना-उद्धव गट, राष्ट्रवादी-शरद पवार गट) आणि महायुती (भाजप, शिवसेना-शिंदे गट, राष्ट्रवादी-अजित पवार गट) यांच्यात जोरदार सामना होण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रवादीचे दोन्ही गट वेगवेगळे लढणार असल्याने आणि शिंदे शिवसेना–अजित पवार गट युतीच्या चर्चेमुळे पुण्यातील राजकीय चित्र अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.

हेही वाचाः Jalmitra Puraskar: पाणी आणि शेतीशिवाय मानवजातीचे अस्तित्व शक्य नाही : डॉ. सुरेश प्रभू

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.