पुणे: Maharashtra Udyog Bhushan Award “आत्मनिर्भर भारतासाठी योगदान देण्याच्या उद्देशाने जर्मनीहून भारतात परतलो आणि उद्योग सुरु केला. भारतीय बनावटीचे उत्पादन करून भारत आत्मनिर्भर होण्यात, तसेच युवापिढीला चांगले शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण क्षेत्रात योगदान देण्यासाठी कटिबद्ध आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योगांचे ग्रामीण भागात विकेंद्रीकरण व्हायला हवे. गुणवत्ता आणि नीतिमत्ता हेच माझ्या यशाचे खरे साथीदार आहेत,” असे प्रतिपादन अल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया, तौराल इंडियाचे संस्थापक भरत गीते Bharat Geete यांनी केले.
पिंपरी-चिंचवड येथे आयोजित फेस ऑफ इन्स्पिरेशन पुरस्कार सोहळ्यात भरत गीते यांना महाराष्ट्र उद्योगभूषण पुरस्काराने Maharashtra Udyog Bhushan Award सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी गीते यांची प्रकट मुलाखत घेत त्यांचा परळी ते जर्मनी व्हाया पुणे असा प्रवास आणि उद्योगाची यशोगाथा उलगडली.
चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित सोहळ्यावेळी खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, शिवसेना नेत्या सुलभा उबाळे, महावितरणचे अधिकारी धनंजय औंढेकर, शिवसेनेचे सचिव वैभव थोरात, उद्योजक अमेय जैन, संयोजक मनिषा थोरात-पिसाळ व संतोष सौंदणकर आदी उपस्थित होते.
संघर्षमय प्रवास आणि कुटुंबाचा आधार
भरत गीते Bharat Geete यांनी आपल्या जीवनप्रवासातील संघर्ष आणि यशाची कहाणी मोकळेपणाने मांडली. ते म्हणाले, “या प्रवासामध्ये माझी पत्नी प्राची हिचा सिंहाचा वाटा आहे. जर्मनीसारख्या प्रगत देशातील स्थिर आयुष्य सोडून भारतात उद्योग उभारण्याचा निर्णय घेताना, तसेच सुरुवातीच्या अत्यंत खडतर काळात तिने खंबीरपणे साथ दिली.
वडिलांनी, मोठ्या भावांनी शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. अल्युमिनियममध्ये नवे तंत्रज्ञान विकसित करून भारताला आत्मनिर्भरतेकडे नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. उद्योग केवळ काही शहरांपुरते मर्यादित न राहता ग्रामीण आणि दुर्गम भागातही पोहोचले पाहिजेत.”
विकासाभिमुख नेतृत्व आणि धोरणात्मक पाठबळ
“देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis हे विकासाभिमुख नेतृत्व असून, राज्यातील औद्योगिक विकासासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे उद्योगांना चालना मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वात धोरणात्मक काम करण्याची इच्छा असून, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात उद्योग नेण्यासाठी त्यांचे पाठबळ महत्वपूर्ण ठरत आहे.
येत्या काळात उद्योग आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात भरीव काम करून विकासात योगदान देण्यासाठी कटिबद्ध आहे. कोणत्याही उद्योगात गुणवत्ता आणि नीतिमत्ता या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. दीर्घकालीन यश मिळवण्यासाठी केवळ नफा नव्हे, तर प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि उत्कृष्टतेला प्राधान्य द्यावे,” असेही त्यांनी Bharat Geete नमूद केले.
पुण्याच्या जडणघडणीत सर्वांचा सहभाग
श्रीरंग बारणे म्हणाले, “शहराच्या जडणघडणीत विविध भागांतून आलेल्या लोकांचे मोठे योगदान आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भातील लोकांचा यामध्ये सहभाग आहे. प्रत्येकाने आपल्या कर्तृत्वाने आणि मेहनतीने पुण्याच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलला आहे. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
नाम फाउंडेशनच्या माध्यमातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पाणी समस्येवर प्रभावीपणे काम केले आहे. दुष्काळग्रस्त भागांमध्ये पाणी उपलब्ध करून देणे, जलसंधारण प्रकल्प राबवणे आणि शेतकऱ्यांना आधार देणे अशा विविध उपक्रमांद्वारे त्यांनी समाजात मोठा बदल घडवून आणला आहे.”
सामाजिक बांधिलकीतून विकासाची वाटचाल
रवी लांडगे यांनीही मनोगत व्यक्त केले. आपण समाजाला देणे लागतो, या भावनेतून उभारलेले कार्य समाजाच्या हिताचे असते. औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये जागतिक दर्जाचे ग्रंथालय, शिक्षण व साहित्य उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला असून, या उपक्रमात उद्योजकांनीही साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
मनीषा थोरात पिसाळ यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. शुभांगी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष सौंदणकर यांनी आभार मानले.


















