पुणे : पुण्यातील नऱ्हे येथील नवले ब्रिजजवळ आज (१० जून) मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात (Navle Bridge Accident) घडला आहे. कात्रजकडून बावधनच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव १६ टायरी सिमेंट मिक्सरने वळण घेताना नियंत्रण सुटल्याने पलटी घेतली आणि डाव्या बाजूने जाणाऱ्या दुचाकीला चिरडले. पुणे शहर पोलीस हददीत झालेल्या या अत्यंत भयानक अपघातात दुचाकीस्वार तरुण सिमेंट मिक्सरखाली पूर्णपणे दाबला गेल्याने त्याचा जागीच वेदनादायक मृत्यू झाला.
(Navle Bridge Accident) नऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) ईश्वर चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव रामेश्वर मच्छिंद्र भोगले (वय ३१ वर्षे) असे आहे. रामेश्वर हे मूळचे सांगवी (ता. हाजीपूर, जि. बीड) येथील रहिवासी असून, सध्या ते पुण्यातील कात्रज परिसरातील वाघजाई नगर, जैन मंदिराजवळ येथे वास्तव्यास होते.
कात्रज परिसरात राहणाऱ्या या तरुणाचा अशा रितीने भीषण अपघातात जागीच दुर्दैवी अंत झाल्याने त्यांच्या मूळ गावी आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अतिवेग ठरला मृत्यूला कारणीभूत; अपघात नेमका कसा घडला?
हा भीषण अपघात (Navle Bridge Accident) आज दिनांक १०/०६/२०२६ रोजी मध्यरात्री १२:३० वाजताच्या सुमारास नवले ब्रिजजवळ, पल्स हॉस्पिटल समोर, नऱ्हे, पुणे येथे घडला. गोरख लक्ष्मण रनसुरे (वय ५० वर्षे, रा. राजाराम काळभोर बिल्डिंग, विश्वराज हॉस्पिटल समोर, लोणी स्टेशन जवळ, लोणी काळभोर, पुणे) हा चालक त्याच्या ताब्यातील अशोक लेलंड कंपनीचा १६ टायरी विशालकाय सिमेंट मिक्सर (क्रमांक MH 12 RN 2866) घेऊन कात्रज ते बावधन या मार्गावरून चालला होता.
चालक गोरख रनसुरे याने आपले वाहन अत्यंत निष्काळजीपणे आणि मानवी जीवास धोका निर्माण होईल अशा भरधाव वेगाने चालवले होते. नवले चौकातून वळण (टर्निंग) घेत असताना, अतिवेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अवजड सिमेंट मिक्सर थेट रस्त्यावर डाव्या बाजूला पलटी झाला. (Navle Bridge Accident)
दुर्दैवाने, त्याच वेळी या मिक्सरच्या अगदी डाव्या बाजूने बावधनच्या दिशेने जाणारी होंडा शाईन दुचाकी (क्रमांक MH 23 BL 5225) जात होती. सिमेंट मिक्सर अचानक उलटल्याने दुचाकीस्वार रामेश्वर भोगले हे दुचाकीसह त्या प्रचंड वजनाच्या मिक्सरखाली पूर्णपणे चिरडले गेले. (Navle Bridge Accident) मिक्सरचा अजस्र भार शरीरावर पडल्याने रामेश्वर यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुसरीकडे, सिमेंट मिक्सर चालकाच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे.
पोलिसांची घटनास्थळी धाव; वाहतूक पूर्ववत
अपघाताचा प्रचंड आवाज ऐकून (Navle Bridge Accident) पल्स हॉस्पिटल जवळील नागरिक, सुरक्षा रक्षक आणि इतर वाहनचालकांनी मदतीसाठी घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच नऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने क्रेन मागवून उलटलेला तो भव्य सिमेंट मिक्सर बाजूला घेतला आणि त्याखाली दबलेला रामेश्वर यांचा मृतदेह बाहेर काढला.
अपघातातील (Navle Bridge Accident) दोन्ही वाहने रस्त्यावरून बाजूला हटवून पोलिसांनी काही वेळातच विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली आणि कोंडी दूर केली. पोलिसांनी आरोपी चालक गोरख रनसुरे याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवले असून मृत रामेश्वर भोगले यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
नऱ्हे पोलिसांकडून कायदेशीर कारवाई सुरू
या भीषण दुर्घटनेप्रकरणी (Navle Bridge Accident) नऱ्हे पोलिसांनी आरोपी सिमेंट मिक्सर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्वतःच्या निष्काळजीपणामुळे आणि अतिवेगामुळे एका निरपराध व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल चालकावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) ईश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.