पुणे : पुणे आणि परिसरातील रेल्वे (Pune Railway Station) विकासकामांना गती देतानाच प्रवाशांची सुरक्षितता, मूलभूत सुविधा आणि रेल्वेच्या मालमत्तेच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा स्पष्ट सूचना केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला दिल्या. मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांच्या खासदारांच्या बैठकीत मोहोळ यांनी पुणे, हडपसर आणि खडकी रेल्वे स्थानकांशी संबंधित विविध प्रश्न मांडले. रेल्वे प्रशासनाने या प्रश्नांवर कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
(Pune Railway Station) पुणे रेल्वे स्थानकावरील वाढती प्रवासी संख्या आणि भविष्यातील गरजा विचारात घेऊन प्रस्तावित अतिरिक्त सहा प्लॅटफॉर्मच्या कामाचे नियोजन करावे, अशी सूचना मोहोळ यांनी केली.
भविष्यात वारंवार फेरबदल करण्याची किंवा विस्कळीत पद्धतीने बांधकाम करण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रवाशांची सोय आणि सुरक्षिततेचा विचार करून दीर्घकालीन आराखडा तयार करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
अनधिकृत प्रवेशमार्ग बंद करण्याची सूचना
पुणे रेल्वे स्थानकावरील (Pune Railway Station) सर्व अनधिकृत प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग तातडीने बंद करण्यात यावेत. स्थानकाची संरक्षक भिंत अधिक मजबूत करावी आणि प्रत्येक अधिकृत प्रवेशद्वारावर २४ तास तिकीट तपासनीस तसेच रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी तैनात करावेत, अशी सूचना मोहोळ यांनी केली. स्थानक परिसरात अधिकाधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षा यंत्रणा सक्षम करण्याची मागणीही त्यांनी केली.
पाणी साचण्यावर कायमस्वरूपी उपाय हवा
पावसाळ्यात पुणे रेल्वे स्थानक (Pune Railway Station) परिसर, प्लॅटफॉर्म आणि कार्यालयांमध्ये पाणी साचणे तसेच छतातून गळती होण्याच्या तक्रारी वाढतात. या समस्येवर तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश मोहोळ यांनी दिले. पार्सल कार्यालयात पावसाचे पाणी शिरल्यामुळे ग्राहकांच्या मालाचे नुकसान होऊ नये, यासाठी स्वतंत्र आणि दीर्घकालीन व्यवस्था उभारण्याची सूचनाही करण्यात आली.
प्लॅटफॉर्म क्रमांक ३० मिनिटे आधी जाहीर करा
रेल्वेगाड्यांचा प्लॅटफॉर्म क्रमांक गाडीच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान ३० मिनिटे जाहीर करावा, अशी मागणी मोहोळ यांनी केली. (Pune Railway Station) अचानक प्लॅटफॉर्म बदलल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांची धावपळ होते. त्यामुळे प्लॅटफॉर्मसंबंधी माहिती वेळेत आणि स्पष्टपणे देण्याची यंत्रणा विकसित करावी, असे त्यांनी सांगितले.
स्वच्छता आणि खानपान सेवेवर लक्ष द्या
(Pune Railway Station) स्थानक परिसराची स्वच्छता आणि प्रसाधनगृहांची देखभाल अधिक चांगल्या पद्धतीने करण्यात यावी. खानपान सेवांमधील जादा दर, अस्वच्छता आणि अन्नाच्या निकृष्ट गुणवत्तेबाबतच्या तक्रारी तातडीने दूर कराव्यात. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांना निलंबित करून त्यांचे करार समाप्त करण्यासारखी कठोर कारवाई करावी, अशी सूचना मोहोळ यांनी केली.
अतिरिक्त वसुलीला लगाम घाला
पुणे रेल्वे स्थानकावरील (Pune Railway Station) पार्किंग, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि पार्सल सेवेशी संबंधित कंत्राटांमध्ये अतिरिक्त पैसे वसूल केले जात असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेण्याची मागणी करण्यात आली. प्रवाशांकडून अधिकृत दरापेक्षा जास्त रक्कम आकारणाऱ्यांवर कारवाई करावी. लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी प्रतीक्षालय, स्वच्छ प्रसाधनगृहे, पिण्याचे पाणी आणि अल्पोपहाराच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही मोहोळ यांनी सांगितले.
रेल्वेच्या जमिनीवरील अतिक्रमणे हटवा
डेक्कन जिमखाना आणि शंकरशेठ रोड परिसरातील रेल्वेच्या मोक्याच्या जागांचा नियोजनबद्ध व्यावसायिक वापर केल्यास रेल्वेला अतिरिक्त महसूल मिळू शकतो, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले. रेल्वेच्या मालकीच्या मौल्यवान जमिनींवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी आणि विद्यमान अतिक्रमणे हटवण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
हडपसर-खडकीत मूलभूत सुविधा द्या
हडपसर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर महत्त्वाच्या गाड्या हाताळल्या जात असतानाही आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. तेथे प्रसाधनगृहे, पिण्याचे पाणी आणि प्रवाशांसाठी इतर सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात. खडकी टर्मिनलमध्येही कायमस्वरूपी बांधकाम, निवारा, आसनव्यवस्था आणि पाण्याची सोय करण्याची सूचना देण्यात आली.
डेक्कन क्विनला पुन्हा ‘प्लॅटफॉर्म एक’चा मान द्या
पुणे-मुंबई मार्गाची ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित ओळख असलेल्या डेक्कन क्विन एक्स्प्रेसचे पुणे स्थानकावरील (Pune Railway Station) संचालन पुन्हा प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून करावे, अशी मागणी मोहोळ यांनी केली. डेक्कन क्विनच्या डायनिंग कारमधील अन्नाची गुणवत्ता आणि सेवा पूर्वीच्या दर्जाप्रमाणे करण्यासाठी आवश्यक सुधारणा कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
प्रीपेड ऑटो-टॅक्सी सेवा सुरू करा
पुणे (Pune Railway Station) आणि हडपसर स्थानकांवर ऑटोचालकांकडून प्रवाशांना होणाऱ्या त्रासाच्या तक्रारींची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने आरटीओ आणि पोलिसांशी समन्वय साधावा. दोन्ही स्थानकांवर प्रीपेड ऑटो आणि टॅक्सी सेवा सुरू करावी तसेच स्थानकांसमोरील अनियमित पार्किंगवर नियंत्रण आणावे, अशी सूचना मोहोळ यांनी केली.
कालबद्ध कार्यवाहीची अपेक्षा
“रेल्वेच्या विकासकामांना गती देतानाच प्रवाशांची सुरक्षितता, सुविधांचा दर्जा आणि मौल्यवान जमिनींचे संरक्षण महत्त्वाचे आहे. पुणे स्थानकाच्या (Pune Railway Station) भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन नियोजन झाले पाहिजे,” असे मोहोळ यांनी सांगितले. बैठकीत मांडलेल्या सर्व प्रश्नांवर रेल्वे प्रशासनाने कालबद्ध कार्यवाही करून प्रवाशांना सुरक्षित, सुविधायुक्त आणि दर्जेदार सेवा द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.