पुणे : पुण्यात डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनच्या वतीने संगीतप्रेमींसाठी एक आगळावेगळा आणि विचारप्रवर्तक अनुभव देणारा ‘रागप्रभा’ संगीतोत्सव Raga Prabha Music Festival रंगला. ‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ या अभिनव कल्पनेवर आधारित या कार्यक्रमात पारंपरिक वेळेच्या चौकटीत न अडकता विविध प्रहरांतील राग सकाळच्या सत्रात सादर करण्यात आले. ‘मारवा’, ‘केदार’, ‘बिहाग’, ‘जोग बहार’, ‘मालकंस’ आणि ‘जोग’ यांसारख्या रागांनी सकाळीच रंगत निर्माण करत रसिकांना वेगळ्या भावविश्वात नेले. या प्रयोगशील सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.
Raga Prabha Music Festival डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनच्या वतीने रविवारी (दि. २९) बालगंधर्व रंगमंदिरात या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सकाळी ९ ते दुपारी २ या कालावधीत देशातील नामवंत कलाकारांनी आपली कला सादर केली.
पद्मश्री पंडित व्यंकटेशकुमार, पद्मश्री पंडित रोणु मजुमदार, पंडित आनंद भाटे तसेच पद्मभूषण पंडित साजन मिश्रा आणि स्वरांश मिश्रा यांच्या सादरीकरणाने वातावरण भारावून गेले.
उद्घाटनात परंपरा आणि बदलांचा संगम
संगीतोत्सवाचे उद्घाटन पंडित अरुण कशाळकर आणि पंडित व्यंकटेशकुमार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक वळसंगकर, डॉ. रघुवीर कुलकर्णी, ॲड. अनिरुद्ध वळसंगकर आणि प्रसाद भडसावळे उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी पंडित अरुण कशाळकर यांनी परंपरेसोबत बदल स्वीकारण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “कलेत बदल होत राहणे हेच तिच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. या बदलांमुळे नव्या विचारांना स्थैर्य मिळते,” असे त्यांनी सांगितले.
मारवा-केदारने सुरुवातीलाच रंगत
संगीतोत्सवाची सुरुवात पंडित व्यंकटेशकुमार यांच्या गायनाने झाली. त्यांनी सायंकालीन राग ‘मारवा’ सकाळच्या प्रहरात सादर करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर ‘केदार’ची झलकही त्यांनी सादर केली. सुयोग कुंडलकर (संवादिनी), भरत कामत (तबला) यांच्या साथीने सादरीकरण अधिक खुलले.
बासरीतून ‘बिहाग’ची तरलता
यानंतर पंडित रोणु मजुमदार यांच्या बासरीवादनाने सभागृह भारावून गेले. त्यांनी रात्रीच्या पहिल्या प्रहरातील ‘बिहाग’ राग सादर करत स्वरांची नाजूकता खुलवली. ‘जोग बहार’ या जोडरागाची झलकही त्यांनी सादर केली. पंडित रामदास पळसुले आणि कल्पेश माचला यांनी त्यांना उत्तम साथ दिली.
मालकंसने रंगली गूढतेची छटा
पंडित आनंद भाटे यांनी ‘मालकंस’ राग सादर करत श्रोत्यांना गूढ आणि गहन स्वरांच्या दुनियेत नेले. त्यानंतर ‘बसंत मल्हार’मधील रचना सादर करत त्यांनी वातावरणात नवचैतन्य निर्माण केले. त्यांच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
जोग रागाने सत्राची सुरेल सांगता
सकाळच्या सत्राची सांगता पंडित साजन मिश्रा आणि स्वरांश मिश्रा यांच्या गायनाने झाली. त्यांनी ‘जोग’ राग सादर करत मैफलीचा उत्कर्षबिंदू गाठला. “डॉ. प्रभा अत्रे या केवळ गायिका नव्हत्या, तर त्या एक विचारवंत होत्या,” असे सांगत त्यांनी या संकल्पनेचे कौतुक केले. ‘चारूकेशी’ रागातील बंदिशीने कार्यक्रमाची सांगता झाली.
कलाकारांचा सन्मान आणि रसिकांची मानवंदना
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी प्रभावीपणे केले. या अनोख्या संगीतप्रयोगातून रागप्रहराच्या पारंपरिक चौकटीला छेद देत नव्या विचारांना व्यासपीठ मिळाले. पुणेकर रसिकांनीही या प्रयोगशील मैफलीचा मनापासून आस्वाद घेत कलाकारांना उत्स्फूर्त मानवंदना दिली.