पुणे: रणरणत्या उन्हात गारव्याची झुळूक यावी, तशी साहित्याची आणि संस्कृतीची एक देखणी पर्वणी पुणेकर बालदोस्तांसाठी चालून आली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मोबाईल आणि टीव्हीच्या आभासी जगात हरवलेल्या बालमनांना पुन्हा एकदा शब्दांच्या आणि कल्पनाशक्तीच्या दुनियेत नेण्यासाठी ‘पुणे बाल पुस्तक जत्रा २०२६’ Pune Bal Pustak Jatra सज्ज झाली आहे. पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका, समर्थ युवा फाऊंडेशन आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ३० एप्रिलपासून स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच Ganesh Kala Krida Manch Swargate येथे हा अक्षरांचा उत्सव रंगणार असून, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हे केवळ प्रदर्शन नसून ज्ञानाचे एक चैतन्यमय केंद्र ठरणार आहे.
या ज्ञानयज्ञाचा Pune Bal Pustak Jatra शुभारंभ ३० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला महापौर मंजुषा नागपुरे, आयुक्त नवलकिशोर राम आणि शहरातील अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
चार दिवस चालणाऱ्या या जत्रेत विनामूल्य प्रवेश असून, मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न असल्याचे मुख्य संयोजक राजेश पांडे Rajesh Pande यांनी नमूद केले आहे.
हास्यकल्लोळ आणि ‘चिंटू’ची जादू
जत्रेच्या Pune Bal Pustak Jatra पहिल्याच दिवशी, म्हणजे १ मे रोजी, मुलांसाठी आनंदाचा खजिना खुला होणार आहे. मकरंद टिल्लू यांच्या ‘हसण्याची बायारकी’ या उपक्रमातून हास्याचे फवारे उडतील, तर चैताली माजगावकर-भंडारी यांच्या ‘हा खेळ बाहुल्यांचा’ या प्रयोगातून बाहुल्यांच्या माध्यमातून कथा उलगडणार आहेत. विशेष आकर्षण म्हणजे, मुलांचा लाडका ‘चिंटू’ आणि त्याचे निर्माते चारुहास पंडित प्रत्यक्ष भेटायला येणार असल्याने बालप्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
विज्ञानाची गोडी आणि एआयचा ‘स्टडी बडी’
केवळ गोष्टींची पुस्तकेच नव्हे, तर विज्ञानाची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे हे या जत्रेचे Pune Bal Pustak Jatra महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. २ मे रोजी डॉ. अमेय पांगारकर ‘एआय तुमचा नवा स्टडी बडी’ या सत्रातून कृत्रिम बुद्धिमत्तेचा अभ्यासात कसा उपयोग करायचा, याचे रंजक मार्गदर्शन करणार आहेत. सोबतच डॉ. अर्चना कुंटेकर यांचे ‘स-संविधानाचा!’ हे बालनाट्य आणि राजीव तांबे यांच्या ‘विज्ञान गप्पा’ मुलांच्या जिज्ञासू वृत्तीला खतपाणी घालतील.
साहित्याची सफर आणि देशप्रेमाचा अविष्कार
३ मे रोजी जत्रेत Pune Bal Pustak Jatra साहित्य आणि शौर्याचा सुंदर संगम पाहायला मिळेल. सुप्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या ‘कथा कवितांच्या राज्यात’ या सत्रातून मुले शब्दांच्या जगात रमतील. त्याच दुपारी सदानंद काले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सलाम भारतीय वायुसेनेला!’ हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये विमानांचे एरो मॉडेलिंग आणि थरारक प्रात्यक्षिके दाखवून मुलांच्या मनात देशसेवेची ज्योत पेटवली जाणार आहे.
स्क्रीन टाइमवर उपाय आणि सांस्कृतिक सांगता
आजच्या डिजिटल युगात पालकांसमोर मुलांच्या ‘स्क्रीन टाइम’चे मोठे आव्हान आहे. यावर उपाय शोधण्यासाठी ४ मे रोजी श्रुती पानसे आणि स्मिता वळसंगकर पालकांशी संवाद साधणार आहेत. या जत्रेचा Pune Bal Pustak Jatra समारोप संबळ वादन, गोंधळ गाणे आणि मोहिनी भुसे यांच्या विद्यार्थिनींच्या सांस्कृतिक सादरीकरणाने होणार आहे. हा सोहळा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची ओळख नव्या पिढीला करून देणारा ठरेल.
शंभर दालने आणि भरगच्च उपक्रम
या जत्रेत Pune Bal Pustak Jatra सुमारे १०० पुस्तक दालने उभारण्यात आली असून, त्यामध्ये बालसाहित्याचा मोठा साठा असणार आहे. केवळ पुस्तके खरेदी करणे इतकाच मर्यादित हेतू नसून, मुलांचे गीतरामायण, किशोर मासिकांच्या मुखपृष्ठांचे प्रदर्शन, जादूचे खेळ, पपेट शो आणि नाट्यनगरी अशा अनेक कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. साहसी खेळ आणि खाद्यजत्रेमुळे या जत्रेला खऱ्या अर्थाने ‘उत्सवा’चे स्वरूप प्राप्त झाले आहे.
पुणेकरांनी आपल्या मुलांसह या अक्षरांच्या जत्रेत सहभागी होऊन, त्यांच्या सुट्टीत ज्ञानाचा आणि आनंदाचा नवा रंग भरावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.