रायगड,: राजकारणात विमानापेक्षा ‘ईमान’ अधिक महत्त्वाचे असते. कपटी मित्र किती घातक ठरू शकतो, याचा अनुभव देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी २०१९ मध्ये अत्यंत जवळून घेतला आहे. त्यामुळे आता अशा प्रकारच्या अफवा किंवा प्रयत्न करून काहीही साध्य होणार नाही,” अशा शब्दांत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
किल्ले रायगडावर आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी नुकत्याच गाजलेल्या उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कथित एकत्रित विमान प्रवासाच्या चर्चांवर आणि ‘उबाठा’ गटाच्या सभांवर अत्यंत आक्रमक आणि रोखठोक भाष्य केले.
२०१९ ची ‘ती’ बेईमानी आणि ‘कपटी मित्र’
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी २०१९ मधील राजकीय घडामोडींचा संदर्भ देत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना एकत्र काम करण्यासाठी, म्हणजेच एकाच विमानातून प्रवास करण्यासाठी बहुमताचे तिकीट दिले होते. परंतु, ऐनवेळी उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या वैयक्तिक आणि राजकीय स्वार्थासाठी महायुतीचे विमान बदलले. त्यांनी थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतचे विमान पकडले आणि जनतेच्या विश्वासाशी बेईमानी केली.”
पुढे बोलताना शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जी गटांगळ्या खाण्याची वेळ आली आहे, ती त्यांच्या याच कृत्यामुळे आली आहे. आता ते पुन्हा एकदा जुन्या संबंधांचे दाखले देऊन किंवा एकत्रित प्रवासाच्या वावड्या उठवून स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण देवेंद्र फडणवीस हे अत्यंत हुशार नेते आहेत. २०१९ साली ‘कपटी मित्र’ किती घातक असतो, हे त्यांनी स्वतः अनुभवले आहे. त्यामुळे मला या विषयावर अधिक बोलण्याची गरज नाही. फडणवीस आता पुन्हा अशा कोणत्याही जाळ्यात फसणार नाहीत.”
‘उबाठा’च्या सभा म्हणजे ‘वरातीमागून घोडे’
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सध्या संपूर्ण महाराष्ट्रात घेत असलेल्या जाहीर सभांबद्दल विचारले असता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपरोधिक टोला लगावला. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे आज घराबाहेर पडून सभा घेत फिरत आहेत, त्याचे श्रेय मलाच जाते. कारण मीच त्यांना घरातून बाहेर पडायला भाग पाडले आहे. पण त्यांच्या सध्याच्या सभा म्हणजे मराठीतील ‘वरातीमागून घोडे’ या म्हणीसारख्या आहेत.”
शिंदे (Eknath Shinde) पुढे म्हणाले, “जेव्हा पक्षात सर्व सहकारी, आमदार आणि खासदार सोबत होते, तेव्हा त्यांनी कधी कोणाची दखल घेतली नाही. आता पक्षातील सर्व प्रमुख आणि निष्ठावान लोक त्यांना सोडून निघून गेले आहेत. सर्व काही गमावल्यानंतर ते आता दौरे आणि सभांचे आयोजन करत आहेत. म्हणूनच त्यांच्या या अवस्थेला उद्देशून म्हणावेसे वाटते की, ‘जो बुंद से गयी वो हौद से नहीं आयेगी’. आता सभा घेऊन गेलेले वैभव परत मिळवता येणार नाही.”
रायगड पालकमंत्रीपदाबाबत मोठी अपडेट
गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरही उपमुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. ते म्हणाले, “आज मी शिवरायांच्या पावन भूमीत, त्यांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी आलो आहे. अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात हा सोहळा पार पडला. छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातील सर्व प्रश्न सुरळीत सुटतील.”
पालकमंत्रीपदाच्या प्रलंबित निर्णयावर बोलताना त्यांनी (Eknath Shinde) स्पष्ट केले की, “रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय अत्यंत योग्य वेळी आणि लवकरच घेतला जाईल. महायुतीमधील सर्व घटक पक्षांच्या संमतीने हा निर्णय होईल आणि लवकरच तुम्हाला या संदर्भात गोड बातमी ऐकायला मिळेल.”
शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह
या पत्रकार परिषदेपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी ढोल-ताशांचा गजर, शिवप्रेमींचा उत्साह आणि भगवेमय वातावरण संपूर्ण गडावर पाहायला मिळाले. “शिवरायांचे विचार आणि त्यांचे स्वराज्य हेच आमच्या सरकारचे मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारांवर चालूनच आम्ही महाराष्ट्राचा विकास करत आहोत आणि पुढेही करत राहू,” असा विश्वास शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.














