दिल्ली : पुणे शहराची ओळख बनलेला ‘MH 12’ वाहन नोंदणी कोड कायम ठेवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पुणे आरटीओमध्ये सध्या नवीन वाहनांच्या नोंदणीसाठी ‘MH 12 ZZ’ ही अंतिम मालिका सुरू आहे. त्यामुळे ही मालिका संपल्यानंतर पुण्यातील वाहनांसाठी कोणता नोंदणी कोड वापरला जाणार, याबाबत चर्चा सुरू झाली होती. ‘MH 12’ कोड बदलला जाण्याची शक्यता व्यक्त होताच पुणेकरांमध्येही उत्सुकता आणि चिंता निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ Murlidhar Mohol यांनी केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत ‘MH 12’ कोड कायम ठेवण्याची आग्रही मागणी केली.
(MH 12) पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नवीन वाहनांची नोंदणी ‘MH 12’ या कोडअंतर्गत केली जाते. त्यामधील अक्षरमालिकेचा क्रम पुढे जात सध्या ‘MH 12 ZZ’पर्यंत पोहोचला आहे.
विद्यमान नोंदणी मालिका संपत आल्यामुळे पुढील वाहन नोंदणीसाठी पर्यायी मालिका किंवा अन्य प्रशासकीय व्यवस्था करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ‘MH 12’ कोडच्या भवितव्याबाबत चर्चा सुरू झाली.
कोड बदलण्याच्या चर्चेने पुणेकरांचे लक्ष
‘(MH 12’) हा केवळ वाहनांवरील नोंदणी क्रमांक राहिलेला नसून तो पुणे शहराच्या ओळखीचा अविभाज्य भाग बनला आहे. शहरातील लाखो वाहनांवर हा कोड पाहायला मिळतो. पुणेकरांच्या दैनंदिन वापरासह सोशल मीडिया, चित्रपट, जाहिराती आणि लोकप्रिय संस्कृतीतही ‘MH 12’चा उल्लेख पुण्याचे प्रतीक म्हणून केला जातो. त्यामुळे हा कोड बदलला जाण्याच्या चर्चेने पुणेकरांचे लक्ष वेधले होते.
मुरलीधर मोहोळ यांनी घेतली गडकरींची भेट
पुणेकरांच्या भावना आणि शहराची स्वतंत्र ओळख लक्षात घेऊन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या विषयात पुढाकार घेतला. त्यांनी केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेतली. पुण्याची ओळख असलेला (MH 12’) कोड कोणत्याही परिस्थितीत बदलण्यात येऊ नये, अशी विनंती त्यांनी या भेटीत केली.
त्याच कोडमध्ये पर्यायी मालिका सुरू करण्याची मागणी
सध्याची ‘MH 12 ZZ’ मालिका पूर्ण झाल्यानंतरही ‘MH 12’ कोड कायम ठेवून त्याअंतर्गत नवीन पर्यायी वाहन नोंदणी मालिका सुरू करण्यात यावी, अशी मागणी मोहोळ यांनी केली. त्यासाठी आवश्यक प्रशासकीय आणि तांत्रिक निर्णय तातडीने घेण्यात यावेत, असेही त्यांनी गडकरी यांच्यासमोर मांडले. विद्यमान कोड कायम ठेवत पुढील नोंदणीसाठी व्यवहार्य पर्याय शोधण्यावर या चर्चेत भर देण्यात आला.
नितीन गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद
मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन गडकरी यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ‘MH 12’ कोड V कायम ठेवण्यासाठी संबंधित विभागाला आवश्यक सूचना दिल्या जातील, अशी ग्वाही गडकरी यांनी दिल्याचे मोहोळ यांनी सांगितले. त्यामुळे पुण्याचा वाहन नोंदणी कोड बदलण्याऐवजी त्याच कोडअंतर्गत पर्यायी मालिका सुरू होण्याची शक्यता बळावली आहे.
पुण्याची ओळख जपण्यासाठी महत्त्वाचे पाऊल
पुण्याची वाढती लोकसंख्या आणि सातत्याने वाढणारी वाहनसंख्या यामुळे नवीन नोंदणी मालिकांची आवश्यकता निर्माण झाली आहे. मात्र, त्यासाठी पुण्याची वर्षानुवर्षे प्रस्थापित झालेली ‘MH 12’ ही MH 12 ओळख बदलू नये, अशी भावना व्यक्त होत आहे. मोहोळ यांच्या पुढाकारामुळे ही ओळख कायम ठेवण्याचा मार्ग अधिक सुकर झाल्याचे मानले जात आहे.
अंतिम निर्णयाकडे पुणेकरांचे लक्ष
केंद्रीय स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असला, तरी पुढील नोंदणी मालिकेचे स्वरूप आणि त्याची अंमलबजावणी याबाबत अधिकृत निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. संबंधित विभागांकडून आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्या मालिकेबाबत स्पष्टता मिळण्याची अपेक्षा आहे. तोपर्यंत पुण्याची ओळख असलेला ‘MH 12’ कोड कायम ठेवण्याबाबतच्या अंतिम निर्णयाकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.















