Music Therapy
Music Therapy

Music Therapy संगीतातून आरोग्यसाधनेची नवी वाट; ‘सुर संजीवन’ पदविका अभ्यासक्रम १५ सप्टेंबरपासून; यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची मान्यता; पुणे-मुंबईत ऑफलाइन, तर जगभरातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाची सुविधा

पुणे : संगीताचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रभावी उपचारपद्धती म्हणून करण्याची संधी आता विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या YCMOU मान्यतेने सूर संजीवन म्युझिक थेरपी ट्रस्टतर्फे ‘सुर संजीवन (क्युरेटिव्ह म्युझिक)’ हा एक वर्षाचा संगीत चिकित्सा पदविका अभ्यासक्रम (Music Therapy) सुरू करण्यात येत आहे. येत्या १५ सप्टेंबरपासून अभ्यासक्रमाला सुरुवात होणार असून, तो जगभरातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन; तसेच पुणे आणि मुंबई येथे ऑफलाइन पद्धतीने उपलब्ध असेल. ट्रस्टचे संस्थापक आणि ज्येष्ठ सतारवादक डॉ. पं. शशांक कट्टी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

(Music Therapy) संगीत ही प्रभावी उपचारपद्धती असून, तिचा शास्त्रीय आणि वैज्ञानिक पद्धतीने वापर करण्याचे प्रशिक्षण या अभ्यासक्रमातून दिले जाणार आहे. संगीताच्या माध्यमातून व्यक्तीचे आरोग्य, मानसिक समतोल आणि सकारात्मक जीवनशैली विकसित करण्यावर अभ्यासक्रमात भर असेल.

 विद्यार्थ्यांना संगीत चिकित्सेची मूलभूत तत्त्वे, तिचा विविध आरोग्यविषयक क्षेत्रांतील उपयोग आणि प्रत्यक्ष उपचारांमध्ये संगीताचा वापर याबाबत मार्गदर्शन केले जाईल, असे डॉ. कट्टी यांनी सांगितले.

विद्यापीठाचे पदविका प्रमाणपत्र

एक वर्षाचा अभ्यासक्रम (Music Therapy) यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे मान्यताप्राप्त पदविका प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. संगीत चिकित्सा क्षेत्रात व्यावसायिक कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्राचा उपयोग होईल. उपचारक संगीताच्या वाढत्या क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांना संधी

(Music Therapy) हा अभ्यासक्रम केवळ संगीत क्षेत्रातील विद्यार्थ्यांपुरता मर्यादित राहणार नाही. डॉक्टर, समुपदेशक, विशेष बालशिक्षक, मानसोपचारतज्ज्ञ आणि समाजकार्य क्षेत्रातील व्यावसायिकांसाठीही तो उपयुक्त ठरणार आहे. संबंधित व्यावसायिकांना आपल्या नियमित कार्यपद्धतीमध्ये संगीत चिकित्सेचा पूरक साधन म्हणून वापर करता येईल. संगीताची आवड असलेल्या आणि आरोग्य क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनाही या अभ्यासक्रमामुळे स्वतंत्र दिशा मिळू शकणार आहे.

४५० विद्यार्थ्यांना यापूर्वी प्रशिक्षण

डॉ. कट्टी यांनी आतापर्यंत सुमारे ४५० विद्यार्थ्यांना संगीत चिकित्सेचे (Music Therapy) प्रशिक्षण दिले आहे. प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ८० ते ९० प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांचा समावेश आहे. त्यांच्यापैकी अनेक जण सध्या आपल्या व्यावसायिक कामामध्ये संगीत चिकित्सेचा प्रत्यक्ष वापर करीत आहेत, अशी माहिती डॉ. संगीता सांगवीकर यांनी दिली. या अनुभवाच्या आधारे नव्या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.

१३ सप्टेंबरला पुण्यात विनामूल्य सेमिनार

(Music Therapy) अभ्यासक्रमाची रचना, शिक्षणपद्धती, प्रवेश प्रक्रिया, आवश्यक पात्रता आणि शुल्क याबाबत माहिती देण्यासाठी रविवार, १३ सप्टेंबर रोजी विनामूल्य सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. कोथरूड येथील सिद्धार्थ टॉवर्सच्या दुसऱ्या मजल्यावरील कर्नाटक संघाच्या सभागृहात सायंकाळी पाच ते सात या वेळेत हा सेमिनार होईल. संगीत चिकित्सेचे महत्त्व, विविध क्षेत्रांतील तिचा उपयोग आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या संधींबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

ऑनलाइन प्रवेश नोंदणी सुरू

(Music Therapy) पदविका अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रवेश नोंदणी सुरू झाली आहे. अभ्यासक्रम आणि प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी इच्छुकांनी डॉ. पं. शशांक कट्टी यांच्याशी ९८२००४६९२०, तर डॉ. संगीता सांगवीकर यांच्याशी ९९६००६१०२९ या क्रमांकावर संपर्क साधावा. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरही अभ्यासक्रमासंबंधी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हे ही वाचा :  Cancer Research कर्करोगावरील आयुर्वेद संशोधनाची जागतिक झेप; ‘अ‍ॅस्को ब्रेकथ्रू २०२६’साठी निवड; पुण्यातील रसायु कॅन्सर क्लिनिककडून ३,३५१ रुग्णांचा अभ्यास; जीवनमान सुधारण्यासाठी ५१ टक्के रुग्णांचा आयुर्वेदाकडे कल

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.