Pune cyber crime डिजिटल ‘सीबीआय अटकेची भीती; ज्येष्ठ नागरिकाकडून तब्बल 10.74 कोटींची फसवणूक, दोन सायबर चोरटे जेरबंद

Cyber police Shivajinagar

पुणे: Pune cyber crime डिजिटल अरेस्टची भीती दाखवत शहरातील एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 10 कोटी 74 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन सायबर चोरट्यांना शिवाजीनगर येथील सायबर गुन्हे शाखेने Cyber police Shivajinagar अटक केली आहे. हर्षद सुभाष धनतोले (वय 23) आणि समर्थ सुरेश देशमुख (वय 24, दोघे सध्या रा. कर्वेनगर, मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Pune cyber crime या कारवाईत आरोपींकडून लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून त्यांच्या खात्यातील मोठी रक्कम गोठवण्यात आली आहे.

Cyber police Shivajinagar पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून स्वतःला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातील (सीबीआय) अधिकारी असल्याची बतावणी केली. त्यांच्या बँक खात्याचा वापर काळ्या पैशांच्या व्यवहारात झाल्याचा आरोप करत, या प्रकरणात सीबीआयकडून ‘डिजिटल अटक’ करण्यात येणार असल्याची भीती दाखवण्यात आली. इतकेच नव्हे तर या प्रकरणात कुटुंबीयांनाही अटक करण्यात येईल, असा धाक दाखवत आरोपींनी तातडीने ठराविक बँक खात्यात रक्कम जमा करण्याचे निर्देश दिले.

भीतीपोटी आणि मानसिक दबावाखाली ज्येष्ठ नागरिकाने आरोपींनी सांगितलेल्या खात्यात तब्बल 10 कोटी 74 हजार रुपये जमा केले. काही काळानंतर फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यावर त्यांनी तात्काळ शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.

तक्रार मिळताच सायबर पोलिसांनी Cyber police Shivajinagar तांत्रिक तपास सुरू केला. ज्येष्ठ नागरिकाने ज्या खात्यात पैसे जमा केले होते त्या खात्याची बारकाईने चौकशी करण्यात आली. तसेच आरोपींनी शहरातील विविध एटीएममधून काही रक्कम काढल्याचे समोर आले. संबंधित एटीएम केंद्रांतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. डिजिटल पुरावे, बँक व्यवहारांचा मागोवा आणि सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक केली.

अटकेदरम्यान आरोपींकडून 4 लाख 78 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तसेच त्यांच्या खात्यातील 40 लाख रुपयांची रक्कम गोठवण्यात आली आहे.

या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच उर्वरित रक्कम कुठे वळवली गेली याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख आणि पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक संगीता देवकाते यांच्यासह त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

दरम्यान, कोणतीही केंद्रीय तपास संस्था फोनवरून अटक करण्याची धमकी देत नाही, असे स्पष्ट करत पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकारचे संशयास्पद फोन किंवा संदेश आल्यास घाबरून न जाता तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक जागरूक राहणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी नमूद केले.

हे ही वाचा : Pune Municipal Corporation पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय; रस्ते, ड्रेनेज, पावसाळी गटारे आणि केबल डक्टची कामे आता एकत्रित

Exit mobile version