पुणे: Maharashtra Education Society महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी बालमित्रांच्या साथीने पहिल्यांदाच केलेली मेट्रो सफर, रेल्वे म्युझियममध्ये रेल्वेच्या विविध प्रतिकृती, रेल्वेचा इतिहास व त्याची कार्यपद्धतीचा अनुभव घेताना बालगोपाल हरखून गेले. मेट्रो व रेल्वेची प्रत्यक्ष पाहणी यामुळे विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढली व हा अनुभव त्यांच्या ज्ञानविश्वात भर घालणारा ठरला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी Maharashtra Education Society (मएसो) क्रीडावर्धिनी व बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडीयम स्कुलच्या वतीने ‘मएसो’च्या प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व अनुभवाधिष्ठित उपक्रमांचे आयोजन नुकतेच केले होते.
खेळांबरोबरच विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, भावनिक व सामाजिक विकास घडावा, हा यामागील उद्देश होता. क्रीडा महोत्सवाचे हे १४ वे वर्ष होते. त्यामध्ये २० शाळांतील सुमारे १२०० खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सूर्यनमस्कार, लंगडी, डॉजबॉल आणि गोल खो-खो यांसारख्या सांघिक मैदानी खेळांचा समावेश होता.
यापूर्वी मेट्रो प्रवासाचा अनुभव नसलेल्या ८० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांसाठी मेट्रो सफरीचे आयोजन करण्यात आले. आनंदनगर ते रामवाडी असा प्रवास विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उत्साहवर्धक व आनंददायी ठरला. कर्वेनगर येथील जोशी रेल्वे संग्रहालयाला विद्यार्थ्यांनी भेट दिली.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी व वाचनसंस्कार रुजावेत, या हेतूने ‘वाचन कट्टा’ या उपक्रमात मूल्यशिक्षण, ऐतिहासिक, शास्त्रीय तसेच गोष्टींची विविध पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. मोकळ्या वेळेत विद्यार्थ्यांनी आवडीने पुस्तके वाचली.
कलेतून शिक्षण या संकल्पनेनुसार मकरंद बापट यांनी विद्यार्थ्यांसाठी ओरिगामी कलेचे प्रात्यक्षिक सादर केले. त्यांनी कागदापासून विविध आकर्षक प्रतिकृती तयार करून दाखविल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, एकाग्रता व कल्पकतेला चालना मिळाली.
विद्यार्थ्यांमध्ये मूल्यसंस्कार रुजावेत, या उद्देशाने मूल्याधिष्ठित लघुचित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले. या चित्रपटांतून सहकार्य, शिस्त, पर्यावरण जपणूक व नैतिक मूल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रभावीपणे समजले.
हा संपूर्ण क्रीडा महोत्सव पर्यावरणपूरक, प्लास्टिकमुक्त व शून्य कचरा व्यवस्थापन या संकल्पनेनुसार साजरा करण्यात आला. स्पर्धेच्या कालावधीत प्लास्टिकचा वापर टाळून स्टीलच्या भांड्यांचा वापर करण्यात आला. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण व पुनर्वापर यावर विशेष भर देण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी व स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित व्हावे, हा यामागे उद्देश होता, असे मुख्याध्यापिका मंजुषा दुर्वे यांनी सांगितले.
हे ही वाचा : Pune cyber crime डिजिटल ‘सीबीआय अटकेची भीती; ज्येष्ठ नागरिकाकडून तब्बल 10.74 कोटींची फसवणूक, दोन सायबर चोरटे जेरबंद
1 Comment