Asha Bhosle ‘आशाताईंचे आयुष्य म्हणजे अखंड संघर्ष; त्यांच्या जाण्याने कुटुंबावर मोठा आघात’; उषा मंगेशकर झाल्या भावुक; आशा भोसले यांच्या जीवनकार्यावरील ‘देशो देशी पानो पानी  आशा आशा’ विशेषांकाचे पुण्यात प्रकाशन

Asha Bhosle

पुणे : ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले (Asha Bhosle) अत्यंत जिद्दी, कष्टाळू आणि संकटांशी धैर्याने सामना करणाऱ्या होत्या. आयुष्यात आलेल्या प्रत्येक आव्हानाला त्यांनी समर्थपणे तोंड दिले. त्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे एक प्रकारचे युद्धच होते. लता मंगेशकर यांच्या स्वरांनी मन समृद्ध होत असे, तर आशाताईंची गाणी ऐकल्यानंतर पाय आपोआप थिरकू लागत. त्यांच्या अचानक जाण्यामुळे मंगेशकर कुटुंबावर मोठा मानसिक आघात झाला, अशा भावपूर्ण शब्दांत ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर यांनी आशा भोसले यांच्या आठवणींना उजाळा दिला.

संपादक प्रवीण प्र. वाळिंबे यांनी पद्मविभूषण आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या जीवनावर आणि प्रदीर्घ संगीत कारकिर्दीवर आधारित ‘देशो देशी पानो पानी  आशा आशा’ या स्वरप्रतिभा विशेषांकाचे संपादन केले आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात शनिवारी उषा मंगेशकर यांच्या हस्ते या विशेषांकाचे प्रकाशन झाले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हास पवार होते. ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, पुणे महापालिका काँग्रेसचे गटनेते ॲड. रामचंद्र ऊर्फ चंदूशेठ कदम आणि माजी नगरसेवक सुनील शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

लता-आशांसारख्या गायिका पुन्हा होणे कठीण

उषा मंगेशकर Usha Mangeshkar यांनी लता मंगेशकर Lata Mangeshkar आणि आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या गायन कारकिर्दीतील अनेक आठवणी सांगितल्या. कोलकाता येथे झालेल्या एका मैफिलीस तब्बल एक लाख ३० हजार रसिकांनी तिकीट काढून उपस्थिती लावली होती, अशी आठवण त्यांनी सांगितली. पुढील २०० वर्षांत लता आणि आशा यांच्यासारख्या गायिका होणे कठीण आहे. लतादीदींनी ३५ भाषांमध्ये गाणी गायली, तर आशाताईंनी आपल्या बहुआयामी गायकीच्या माध्यमातून संगीतविश्वात स्वतंत्र स्थान निर्माण केले, असे त्या म्हणाल्या.

‘गीतांमधून आशाताई आजही अजरामर’

आशाताई (Asha Bhosle) त्यांच्या हजारो गीतांच्या माध्यमातून आजही रसिकांच्या मनात जिवंत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या छायाचित्राला कधीही हार घालत नाही, असे उषा मंगेशकर यांनी सांगितले. कुटुंबाची आणि मुलांची जबाबदारी सांभाळताना आशाताईंनी स्वतःचे दुःख कधीही मुलांपर्यंत पोहोचू दिले नाही. त्यांना साड्या आणि खरेदीची विशेष आवड होती. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसल्याचेही त्यांनी नमूद केले.

गायनाची परंपरा अखंड ठेवण्याचा निर्धार

मंगेशकर घराण्याची समृद्ध गायन परंपरा अखंडपणे सुरू राहावी, यासाठी आपण आजही गात असल्याचे उषा मंगेशकर म्हणाल्या. आशाताईंनी (Asha Bhosle) हजारो गाणी गायली असली, तरी त्यांनी गायलेले ‘पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती’ हे गीत आपल्याला विशेष आवडत असल्याचे त्यांनी सांगितले. आशा भोसले यांचे १२ एप्रिल २०२६ रोजी वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले होते. 

संग्रही ठेवण्याजोगा सांगीतिक दस्तावेज

माजी आमदार उल्हास पवार यांनी विशेषांकाचे कौतुक केले. आशा भोसले (Asha Bhosle) यांच्यावरील विविध भाषांतील लेख, दुर्मीळ छायाचित्रे आणि त्यांच्या निधनानंतर जगभरातील वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या ठळक बातम्यांचे संकलन करणे हे अत्यंत कठीण काम होते. हा विशेषांक आशाताईंच्या कारकिर्दीचा संग्रही ठेवण्याजोगा ऐतिहासिक आणि सांगीतिक दस्तावेज ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दिवाळीपूर्वी उषाताईंची प्रकट मुलाखत

ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ म्हणाले की, आशाताईंचे (Asha Bhosle) गायन म्हणजे श्रोत्यांना ऊर्जा देणारा विलक्षण अनुभव होता. त्यांच्या अनेक मुलाखती घेण्याची संधी आपल्याला मिळाली असून आता उषाताईंची मुलाखत घेण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. उषा मंगेशकर यांनीही या इच्छेला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर ‘स्वरप्रतिभा’तर्फे दिवाळीपूर्वी उषाताईंच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला जाईल, अशी घोषणा प्रवीण वाळिंबे यांनी केली.

मंगेशकर कुटुंबाच्या योगदानाचा गौरव

ॲड. चंदूशेठ कदम यांनी विशेषांकातील लेखांचे संकलन माहितीपूर्ण असल्याचे सांगत मंगेशकर कुटुंबाच्या संगीत क्षेत्रातील योगदानाचा गौरव केला. मंगेशकर कुटुंबीय मूळचे सांगलीचे असून आपणही सांगलीचे असल्याने या कुटुंबाशी भावनिक नाते असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषांकात आशा भोसले (Asha Bhosle) यांचे जीवन, गाणी, छायाचित्रे आणि विविध लेखकांचे लेख यांचा समृद्ध ठेवा असल्याचे संपादक प्रवीण वाळिंबे यांनी सांगितले.

उभे राहून उषाताईंना मानवंदना

उषा मंगेशकर यांच्या प्रदीर्घ संगीत कारकिर्दीला सलाम करण्यासाठी उपस्थित रसिकांनी सभागृहात उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी तन्मयी मेहेंदळे-कुलकर्णी यांनी शिवस्तवन सादर केले. त्यानंतर मनीषा निश्चल आणि धनंजय पवार यांनी हिंदी व मराठी गीतांचा ‘स्वरस्वामिनी’ हा विशेष संगीत कार्यक्रम सादर केला. रवींद्र खरे यांनी निवेदन केले, तर नीरजा आपटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

हे ही वाचा : APS Wealth Ventures दुप्पट परताव्याचे आमिष अन् ७०० कोटींचा घोटाळा ? दुबईतून आणलेल्या अविनाश राठोडला १० दिवसांची पोलीस कोठडी; हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा संशय; इंटरपोलच्या रेड नोटिसनंतर यूएईमधून भारतात आणले, बँक व डीमॅट खात्यांतील व्यवहारांचा होणार तपास

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.
Exit mobile version