APS Wealth Ventures दुप्पट परताव्याचे आमिष अन् ७०० कोटींचा घोटाळा ? दुबईतून आणलेल्या अविनाश राठोडला १० दिवसांची पोलीस कोठडी; हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा संशय; इंटरपोलच्या रेड नोटिसनंतर यूएईमधून भारतात आणले, बँक व डीमॅट खात्यांतील व्यवहारांचा होणार तपास

APS Wealth Ventures

पुणे : आकर्षक मासिक परतावा आणि अवघ्या २० महिन्यांत गुंतवणूक दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन महाराष्ट्रातील हजारो नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या APS Wealth Ventures LLP APS Wealth Ventures चा भागीदार अविनाश अर्जुन राठोड याला पुणे सत्र न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संयुक्त अरब अमिरातीमधून भारतात आणल्यानंतर राठोडला अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या गुंतवणूक गैरव्यवहाराची व्याप्ती ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक असण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

(APS Wealth Ventures) गुंतवणूक योजना कोलमडल्यानंतर राठोड एप्रिल २०२३ मध्ये भारतातून फरार झाल्याचा आरोप आहे. त्याचा शोध घेण्यासाठी लुकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते. त्यानंतर इंटरपोलमार्फत रेड कॉर्नर नोटीस काढण्यात आली. 

यूएईमध्ये त्याचे ठिकाण निश्चित झाल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने परराष्ट्र मंत्रालय, केंद्रीय गृह मंत्रालय आणि यूएईमधील संबंधित यंत्रणांशी समन्वय साधला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २३ जुलै रोजी त्याला मुंबई विमानतळावर आणण्यात आले.

मुंबई विमानतळावरून पुणे पोलिसांच्या ताब्यात

मुंबईत दाखल होताच महाराष्ट्र पोलिसांच्या पथकाने राठोडला ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी त्याला पुण्यात आणण्यात आले. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवत विविध केंद्रीय आणि आंतरराष्ट्रीय यंत्रणांशी समन्वय साधल्याची माहिती आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा (APS Wealth Ventures) तपास सुरू आहे.

एका गुन्ह्यातील फसवणूक ८८ कोटींहून अधिक

राठोडविरोधात (APS Wealth Ventures) पुण्यासह विविध ठिकाणी किमान चार गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. चतु:शृंगी पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कमच ८८ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणात पाचशेहून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. आणखी तक्रारींची पडताळणी सुरू असल्याने फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

पाच टक्के मासिक परताव्याचे कथित आमिष

(APS Wealth Ventures) कडून गुंतवणूकदारांना दरमहा आकर्षक आणि निश्चित परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा आरोप आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवून देण्याबरोबरच सुमारे २० महिन्यांत गुंतवलेली रक्कम दुप्पट होईल, असे सांगण्यात येत होते. सुरुवातीच्या काळात काही गुंतवणूकदारांना नियमित परतावा देऊन कंपनीने विश्वास निर्माण केला आणि त्यातून अधिकाधिक नागरिकांनी मोठ्या रकमा गुंतवल्याचा संशय आहे.

एक लाखापासून कोटीपर्यंत गुंतवणूक

पुणे, मुंबई, विदर्भासह राज्याच्या विविध भागांतील नागरिकांनी या योजनांमध्ये (APS Wealth Ventures) पैसे गुंतवल्याचे तपासात समोर आले आहे. गुंतवणूकदारांमध्ये सरकारी कर्मचारी, नोकरदार, व्यावसायिक आणि निवृत्त नागरिकांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येते. अनेकांनी एक लाख रुपयांपासून एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम गुंतवली. आतापर्यंतच्या प्राथमिक अंदाजानुसार कंपनीने सुमारे ७०० कोटी रुपये गोळा केले असावेत; मात्र नेमकी रक्कम तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

डॉक्टराच्या तक्रारीनंतर प्रकरणाला वाचा

डॉ. जगदीश जाधव यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची (APS Wealth Ventures) चौकशी सुरू केली होती. आपली आणि कुटुंबीयांची मिळून सुमारे एक कोटी २० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर शेकडो गुंतवणूकदारांनी पोलिसांशी संपर्क साधत तक्रारी नोंदवल्या. राठोड आणि त्याची पत्नी विशाखा राठोड यांच्यासह इतर व्यक्तींच्या भूमिकेचाही तपास सुरू आहे.

एप्रिल २०२३ मध्ये संपर्क तुटल्याचा आरोप

मार्च २०२३ पासून गुंतवणूकदारांनी (APS Wealth Ventures) मूळ रक्कम परत मागण्यास सुरुवात केली होती. मात्र, राठोडची प्रकृती ठीक नसल्याचे सांगून १० एप्रिलनंतर पैसे देण्यात येतील, असे कथित आश्वासन देण्यात आले. निर्धारित तारीख उलटल्यानंतरही पैसे मिळाले नाहीत आणि अविनाश व विशाखा राठोड यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली.

पैशांचा प्रवास आणि मालमत्तांचा शोध

राठोडच्या पोलीस कोठडीत बँक खाती, डीमॅट खाती, गुंतवणुकीचे व्यवहार, निधीचे हस्तांतरण आणि कथित गैरव्यवहारातून खरेदी केलेल्या मालमत्तांची (APS Wealth Ventures) चौकशी केली जाणार आहे. जमा झालेली रक्कम कोणकोणत्या खात्यांमध्ये वळवण्यात आली, त्याचा लाभ कोणाला झाला आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध आर्थिक गुन्हे शाखा घेणार आहे. आरोपींशी संबंधित मालमत्ता शोधून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवण्याच्या दृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरू आहे.

हे ही वाचा : Missing Link Roads पुण्याची वाहतूक कोंडी फुटणार! १२ ‘मिसिंग लिंक’ रस्त्यांना गती; वर्षभरात शहराच्या कनेक्टिव्हिटीचा चेहरामोहरा बदलणार; शहरात सुमारे ७०० ठिकाणी रस्त्यांचे तुटलेले दुवे; पहिल्या टप्प्यातील अवघ्या १२ किलोमीटरच्या कामामुळे जवळपास ६० किलोमीटरचे रस्त्यांचे जाळे होणार सलग

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.
Exit mobile version