पुणे : पुणे शहराचा सर्वांगीण विकास करून त्याला देशातील सर्वोत्तम शहर बनवण्याचा ठाम निर्धार केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ Murlidhar Mohol यांनी व्यक्त केला. नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी सुरू करण्यात आलेले ‘खासदार जनसंपर्क सेवा अभियान’ हे प्रभावी व्यासपीठ ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
गोखलेनगर येथील शहीद तुकाराम ओंबाळे क्रीडांगणावर आयोजित १६ व्या ‘जनता दरबार’मध्ये ते Murlidhar Mohol बोलत होते. या उपक्रमांतर्गत नागरिकांनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर मोहोळ यांनी संबंधित प्रशासनाला तत्काळ तोडगा काढण्याचे निर्देश दिले.
या कार्यक्रमाला महापौर मंजूषा नागपुरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर परशुराम वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर तसेच पुणे महापालिका, पुणे पोलिस आणि केंद्र-राज्य शासनातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘जनता दरबार’मुळे स्थानिक, राज्य आणि केंद्र पातळीवरील प्रलंबित प्रश्नांना गती मिळत असल्याचे मोहोळ यांनी नमूद केले. “पुणेकरांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यातील अडचणी या अभियानातून सोडवल्या जात आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मेट्रो प्रकल्पांना वेग
शिवाजीनगर–हिंजवडी दरम्यानची देशातील पहिली पीपीपी मॉडेलवरील मेट्रो मार्गिका लवकरच सेवेत दाखल होणार असल्याची माहिती मोहोळ यांनी दिली. २३ किलोमीटरच्या या मार्गिकेची चाचणी यशस्वी झाली असून, पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.
वनाज–रामवाडी मार्गिकेचा वाघोलीपर्यंत आणि पिंपरी-चिंचवड–स्वारगेट मार्गिकेचा कात्रजपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. तसेच खडकवासला–खराडी आणि माणिकबाग–नळस्टॉप या नव्या मार्गिकांनाही केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होऊन शहराची गतिमानता वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विमानतळ विस्ताराला गती
लोहगाव विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी सुमारे ३२५ एकर जमीन संपादन प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देताना मोहोळ म्हणाले, “पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्याच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यात आली आहे.”
विमान दुर्घटनेचा अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वी
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेचा तपास Aircraft Accident Investigation Bureau (एएआयबी) आणि Directorate General of Civil Aviation (डीजीसीए) यांच्याकडून सुरू आहे. नियमानुसार २८ फेब्रुवारीपूर्वी प्राथमिक अहवाल प्रसिद्ध होणार असून, त्यातून अपघाताची वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असेही मोहोळ यांनी सांगितले
नागरिकांमध्ये उत्साह
जनता दरबारात मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. प्रशासनाने तत्परतेने प्रतिसाद दिल्याने नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत होती.
‘पुणेकरांच्या विश्वासाला न्याय देत शहराच्या विकासासाठी ठोस पावले उचलली जातील,’ असा निर्धार व्यक्त करत मोहोळ यांनी अभियान अधिक व्यापक करण्याचा संकेत दिला.
हे ही वाचा : Quantumforce Inc निर्भय आणि सुरक्षित संवादासाठी ‘गुरुचॅट्स’चे जागतिक लोकार्पण; ‘क्वांटमफोर्स’ची अभिनव एआय प्रणाली

















1 Comment