पुणे : भारताच्या अश्व उद्योगाला संघटित आणि सक्षम स्वरूप देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ‘द इक्वाइन कलेक्टिव्ह’तर्फे पुण्यात पहिल्यांदाच ‘द इक्वेस्ट्रियन फोरम’ Equestrian Forum Pune या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. “भारताचा अश्व उद्योग सध्या विखुरलेला असून त्याला मजबूत संस्थात्मक चौकट देण्याची गरज आहे. या फोरमद्वारे उद्योगाच्या भविष्यासाठी दिशा ठरविण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे ‘द इक्वाइन कलेक्टिव्ह’च्या संस्थापिका गायत्री राहुल कराड यांनी सांगितले. ११ आणि १२ एप्रिल रोजी होणाऱ्या या परिषदेत देश-विदेशातील तज्ज्ञ, उद्योजक आणि अश्वप्रेमी सहभागी होणार आहेत.
Equestrian Forum Pune या परिषदेचे उद्घाटन ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता राज्याचे विपणन आणि शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल तसेच पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. ‘द इक्वाइन कलेक्टिव्ह’च्या संस्थापिका गायत्री राहुल कराड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
उद्योगातील दिग्गजांची उपस्थिती
या परिषदेत Equestrian Forum Pune भारतातील अश्व उद्योगाशी संबंधित शेकडो तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. डॉ. हसनेन मिर्झा, यशान खंबाटा, गौरव रामपाल, रोहन मोरे, डायना अल शाईर, डॉ. रवी रेड्डी, बर्नार्ड डुव्हरने आणि जुट्टा पुट्झ यांसारख्या नामवंत व्यक्तींचा सहभाग विशेष ठरणार आहे.
धोरणात्मक चर्चांवर भर
पहिल्या दिवशी विविध पॅनल चर्चांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय अश्व उद्योगाची सद्यस्थिती, धोरणात्मक दिशा आणि विकासाच्या संधी यावर सखोल चर्चा होणार आहे. हिसार येथील राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्राचे डॉ. नितीन विरमानी रोग नियंत्रण आणि गतिशीलता या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
आहार, मूल्यांकन आणि तंत्रज्ञान
केंटकी इक्वाइन रिसर्चचे डॉ. पीटर हंटिंग्टन हे घोड्यांच्या आहार धोरणांवर भाष्य करणार आहेत, तर ऑस्ट्रेलियाचे मार्क बर्नेल मूल्यांकन प्रक्रियेवर मार्गदर्शन करतील. तंत्रज्ञानाच्या वापरावर आधारित सत्रांमध्ये पुण्यातील विविध संस्थांकडून सादरीकरणे होणार आहेत.
देशी घोड्यांच्या संवर्धनावर लक्ष
ऑल इंडिया मारवाडी हॉर्स सोसायटीचे अध्यक्ष के.आर. गजेंद्र पाल सिंगजी पोसाना देशी घोड्यांच्या पुनर्वापर आणि संवर्धनावर विशेष भाष्य करणार आहेत. भारतीय परंपरेतील घोड्यांचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न या सत्रातून केला जाणार आहे.
पशुवैद्यकीय आणि प्रशिक्षण क्षेत्रातील मार्गदर्शन
पशुवैद्यकीय शिक्षण, घोडेस्वारांची तंदुरुस्ती आणि उद्योगातील बदलत्या गरजांवर देश-विदेशातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यूके आणि भारतातील तज्ज्ञांकडून आधुनिक उपचारपद्धती आणि प्रशिक्षण तंत्रांची माहिती दिली जाणार आहे.
दुसऱ्या दिवशी थेट प्रात्यक्षिके
१२ एप्रिल रोजी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड येथे घोड्यांच्या थेट प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. फिजिओथेरपी, नालकाम (फॅरिअरी) आणि उपयोजित प्रशिक्षण यावर आधारित सत्रे सहभागींसाठी विशेष आकर्षण ठरणार आहेत.
महत्त्वाच्या विषयांवर विशेष सत्रे
संकरण, प्राणी कल्याण, आयात-निर्यात, धोरणात्मक चौकट आणि उद्योगातील नैतिकता यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ या सत्रांमधून मार्गदर्शन करतील.
उद्योगाच्या औपचारिकीकरणाचा उद्देश
गायत्री कराड यांनी सांगितले की, भारतातील अश्व उद्योग सध्या विखुरलेला असून त्यात मोठी क्षमता दडलेली आहे. या फोरमद्वारे उद्योगाचे औपचारिकीकरण, मानके सुधारणा आणि आर्थिक संधी वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
भविष्यासाठी मजबूत पायाभरणी
‘द इक्वेस्ट्रियन फोरम’मधील चर्चांमधून नव्या भागीदारी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. उद्योग, क्रीडा आणि संशोधन यांना जोडणारा हा उपक्रम भारतातील अश्व परिसंस्थेला अधिक सक्षम आणि भविष्याभिमुख बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.