पुणे : पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महापालिकेने ‘मिसिंग लिंक’ (Missing Link Roads) रस्त्यांची महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. शहरातील १२ महत्त्वाचे अपूर्ण रस्ते पुढील वर्षभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले आहे. हे रस्ते अस्तित्वातील मार्गांना जोडल्यास पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण भागांतील प्रवास अधिक सुलभ होणार असून, वाहनचालकांचा वेळही वाचण्याची अपेक्षा आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत.
(Missing Link Roads) पुणे महापालिकेने ऑगस्ट २०२२ मध्ये शहरातील रस्त्यांच्या जाळ्याचे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये अनेक विकास आराखड्यातील रस्ते प्रत्यक्षात पूर्ण झाले नसल्याचे समोर आले. काही ठिकाणी भूसंपादन रखडले, तर काही मार्गांवर अतिक्रमणे, तांत्रिक अडचणी आणि विविध विभागांतील समन्वयाचा अभाव असल्यामुळे रस्ते अर्धवट राहिले.
या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करून कृती आराखडा तयार करण्यात आला.
३३ रस्त्यांना प्राधान्य, पहिल्या टप्प्यात १२ कामे
शहर आणि नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये शेकडो ‘मिसिंग लिंक’ (Missing Link Roads) असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. त्यापैकी वाहतुकीच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाच्या ३३ रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १२ रस्त्यांची कामे पूर्ण केली जाणार आहेत. या जोडरस्त्यांची एकत्रित लांबी तुलनेने कमी असली, तरी ते पूर्ण झाल्यानंतर अस्तित्वातील मोठे रस्ते एकमेकांना जोडले जातील. परिणामी जवळपास ६० किलोमीटरचे रस्त्यांचे जाळे अखंडपणे वापरता येणार आहे.
सिंहगड रस्ता परिसरातील प्रवास होणार सुलभ
राजाराम पूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा जवळकर गार्डनमार्गे जाणारा रस्ता पहिल्या टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते रोझरी स्कूल भुयारी मार्ग, ह्यूम पाइप ते प्रयेजा सिटी रस्ता आणि कोद्रे फार्ममार्गे धायरीपर्यंतचा रस्ता विकसित करण्याचे नियोजन आहे. या कामांमुळे सिंहगड रस्ता, धायरी आणि लगतच्या भागांतील पर्यायी वाहतूक व्यवस्था मजबूत होऊ शकते.
बाणेर, पाषाण आणि बालेवाडीला थेट फायदा
बहुप्रतीक्षित बाणेर-पाषाण लिंक रस्त्याचा समावेशही प्राधान्य प्रकल्पांमध्ये (Missing Link Roads) करण्यात आला आहे. औंधमधील नगरस रस्ता ते ज्युपिटर हॉस्पिटलमार्गे बालेवाडी स्टेडियम हा रस्तादेखील पूर्ण केला जाणार आहे. नवले पूल ते वाकड सेवा रस्त्याचे काम झाल्यास मुंबई-बंगळूर महामार्गावरील स्थानिक वाहतुकीला पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. या प्रकल्पांमुळे बाणेर, पाषाण, बालेवाडी, वाकड आणि औंध परिसरातील कोंडी कमी होण्याची शक्यता आहे.
पूर्व पुण्यातील वाहतुकीला नवा पर्याय
गुंजन चौक ते कल्याणीनगर आणि कल्याणीनगर ते खराडी हे दोन महत्त्वाचे दुवे (Missing Link Roads) पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. मुंढवा रेल्वे उड्डाणपूल ते केशवनगरमधील मंत्रा परिसराचा रस्ताही यामध्ये आहे. या मार्गांमुळे नगर रस्ता, विमाननगर, कल्याणीनगर, खराडी, मुंढवा आणि केशवनगरदरम्यान प्रवास करणाऱ्यांना पर्यायी रस्ते मिळणार आहेत. आयटी कार्यालये आणि निवासी प्रकल्पांची संख्या वाढलेल्या या भागात वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी हे रस्ते निर्णायक ठरू शकतात.
कस्पटे वस्ती आणि मध्यवर्ती भागालाही दिलासा
गणराज चौक ते कस्पटे वस्ती, एबीसी चौक ते गाडीगुट्टा चौक तसेच एन. एम. रोड परिसरातील त्रिकोणी जोडरस्ता (Missing Link Roads) पूर्ण केला जाणार आहे. लोकमत प्रेस ते सावित्री गार्डन हा अपूर्ण दुवाही प्राधान्य यादीत आहे. या मार्गांमुळे अंतर्गत रस्त्यांवरील वाहनांचे वितरण सुधारून प्रमुख चौकांवरील दबाव कमी होण्याची अपेक्षा आहे.
भूसंपादन ठरणार सर्वांत मोठे आव्हान
‘मिसिंग लिंक’ (Missing Link Roads) प्रकल्पांसमोरील प्रमुख अडथळा भूसंपादनाचा आहे. अनेक रस्त्यांच्या जागा खासगी मालकीच्या असून काही ठिकाणी अतिक्रमणे आहेत. वीजवाहिन्या, जलवाहिन्या आणि इतर सेवा हलवण्यासाठी विविध सरकारी यंत्रणांमध्ये समन्वय करावा लागणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी आवश्यक जागा ताब्यात घेणे आणि प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वर्षभरात कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य
निवडलेल्या १२ रस्त्यांची (Missing Link Roads) कामे पुढील वर्षभरात पूर्ण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. ही मोहीम नियोजित वेळेत यशस्वी झाल्यास पुण्यातील रस्त्यांचे तुटलेले दुवे जोडले जातील. प्रवासाचे अंतर आणि वेळ कमी होण्याबरोबरच प्रमुख मार्गांवरील वाहतुकीचा भार अंतर्गत रस्त्यांवर विभागला जाईल. मात्र या घोषणेचे प्रत्यक्ष परिणाम दिसण्यासाठी भूसंपादन, निधी आणि कामांची गुणवत्ता या तिन्ही आघाड्यांवर प्रशासनाला वेग कायम ठेवावा लागणार आहे.



















