Purandar Airport
Purandar Airport

Purandar Airport पुरंदर विमानतळाला ‘टेकऑफ’; डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामाचा श्रीगणेशा ! ७५ टक्के जमिनीचा ताबा प्रशासनाकडे; तीन महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन, शेतकऱ्यांना ३,६०० कोटींचे वाटप

पुणे : पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Purandar Airport) उभारणीतील महत्त्वाचा टप्पा पार झाला आहे. विमानतळासाठी आवश्यक एकूण जमिनीपैकी सुमारे ७५ टक्के जमिनीचा प्रत्यक्ष ताबा जिल्हा प्रशासनाकडे आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाला निविदा प्रक्रिया सुरू करण्याबाबत कळविण्यात आले आहे. पुढील तीन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करून डिसेंबरमध्ये विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी Jitendra Dudi यांनी दिली.

(Purandar Airport) पुरंदर तालुक्यातील Purandar Taluka वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, पारगाव, मुंजवडी आणि खानवडी या सात गावांमधील एकूण एक हजार २९६ हेक्टर जमीन विमानतळासाठी संपादित केली जात आहे. प्रशासनाने थेट खरेदीच्या माध्यमातून जमीन संपादनाला प्राधान्य दिले आहे. 

या प्रक्रियेला संबंधित गावांतील शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत सुमारे ९६ टक्के शेतकऱ्यांनी जमीन संपादनाला संमती दिल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांना ३,६०० कोटींचा मोबदला

जमीन संपादनासाठी संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला वाटपाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. सुमारे ७५० हेक्टर जमिनीच्या संपादनापोटी शेतकऱ्यांना आतापर्यंत तीन हजार ६०० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित जमिनीचा ताबा मिळविण्यासाठीही प्रशासनाकडून आवश्यक प्रक्रिया राबविली जात आहे. सप्टेंबरअखेर विमानतळासाठी (Purandar Airport) आवश्यक एकूण जमिनीपैकी सुमारे ८० टक्के जमीन जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

निविदेसाठी आता कोणतीही अडचण नाही

कोणत्याही मोठ्या प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीपैकी ५० टक्क्यांहून अधिक जमिनीचा ताबा मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करता येते. पुरंदर विमानतळासाठी (Purandar Airport) सप्टेंबरअखेर सुमारे ८५० हेक्टर क्षेत्र ताब्यात येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आता कोणतीही प्रशासकीय अडचण राहिलेली नाही. जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाला निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

प्रकल्पासाठी सहा हजार कोटींची तरतूद

पुरंदर विमानतळाच्या (Purandar Airport) भूसंपादनासाठी राज्य सरकारने सहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी पाच हजार २०० कोटी रुपये विमानतळाच्या मुख्य जागेच्या प्रत्यक्ष भूसंपादनासाठी वापरण्यात येणार आहेत. उर्वरित सुमारे ८०० कोटी रुपये विकसित भूखंडाच्या संपादनासाठी खर्च केले जाणार आहेत. जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना दहा टक्के परतावा देताना या विकसित भूखंडांची आवश्यकता भासणार असल्याने त्यासाठी स्वतंत्र आर्थिक नियोजन करण्यात आले आहे.

तीन महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने निविदा प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करून ती तीन महिन्यांत पूर्ण करावी, अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे. नियोजनानुसार प्रक्रिया पार पडल्यास डिसेंबरपासून विमानतळाच्या (Purandar Airport) प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकते. आवश्यक जमीन मोठ्या प्रमाणात ताब्यात आल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आता गती मिळण्याची चिन्हे आहेत.

उर्वरित ४० हेक्टरसाठी प्रयत्न सुरू

विमानतळासाठी (Purandar Airport) अद्याप सुमारे ४० हेक्टर जमिनीबाबत संबंधित शेतकऱ्यांची संमती मिळालेली नाही. मात्र, या मर्यादित क्षेत्रामुळे निविदा प्रक्रिया थांबविण्याची गरज नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत संबंधित जमीन प्रशासनाच्या ताब्यात न आल्यास त्यानंतर सक्तीच्या संपादनाची प्रक्रिया राबविली जाईल, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले.

विमानतळ उभारणीला निर्णायक गती

मोबदला वाटप, जमिनीचा ताबा आणि निविदेची पूर्वतयारी या तिन्ही आघाड्यांवर वेगाने कार्यवाही सुरू असल्याने पुरंदर विमानतळ (Purandar Airport) प्रकल्प निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. शेतकऱ्यांच्या मोठ्या संमतीमुळे भूसंपादनातील प्रमुख अडथळा दूर झाला असून, नियोजित वेळेत निविदा पूर्ण झाल्यास डिसेंबरमध्ये या महत्त्वाकांक्षी विमानतळाचे प्रत्यक्ष काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

हे ही वाचा : Bharat Gite उद्योगाला अध्यात्माची जोड; ‘ॲल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया’ भरत गिते यांची भगवानगडाला भेट; महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराजांशी शिक्षण, युवकांचे भविष्य आणि सामाजिक बांधिलकीवर चर्चा; श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराच्या कामाची घेतली माहिती

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.