पुणे : पुणेकरांसह हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. हिंजवडी आयटी पार्कला (Hinjawadi Metro) शिवाजीनगरशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका क्रमांक ३ने महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. माण ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय, बालेवाडी या सुमारे १३ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यावर प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (CMRS) तात्पुरती अधिकृत मंजुरी दिली आहे. त्यामुळे प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षेत असलेली हिंजवडी मेट्रो आता प्रत्यक्ष प्रवासी सेवेच्या आणखी जवळ पोहोचली आहे.
(Hinjawadi Metro) मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी २३ जुलै २०२६ रोजी या टप्प्याला तात्पुरती मंजुरी दिली. मेट्रोची व्यावसायिक प्रवासी सेवा सुरू करण्यापूर्वी आवश्यक असलेल्या अंतिम वैधानिक मंजुरींपैकी ही एक अत्यंत महत्त्वाची मंजुरी मानली जाते.
उर्वरित प्रशासकीय आणि परिचालनविषयक औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर पहिल्या टप्प्यावर प्रवासी सेवा सुरू करता येणार आहे.
१३ किलोमीटर मार्गावर १२ स्थानके
मंजुरी मिळालेला माण ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय हा मेट्रो मार्ग सुमारे १३ किलोमीटर लांबीचा आहे. या टप्प्यामध्ये एकूण १२ मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. हिंजवडी परिसरातून (Hinjawadi Metro) बालेवाडीपर्यंत नियमित प्रवास करणारे आयटी कर्मचारी, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना या सेवेमुळे वेगवान व सुरक्षित सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
ताशी ८० किलोमीटर वेगाची क्षमता
या मार्गिकेवरील (Hinjawadi Metro) मेट्रो गाड्या ७५० व्होल्ट डीसी थर्ड-रेल ट्रॅक्शन प्रणालीवर धावणार आहेत. अत्याधुनिक कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल अर्थात CBTC सिग्नलिंग यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे. ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन मोडमध्ये मेट्रो गाड्यांना ताशी कमाल ८० किलोमीटर वेगाने धावण्याची परवानगी असेल. आधुनिक सिग्नलिंग प्रणालीमुळे गाड्यांमधील सुरक्षित अंतर राखण्यासह सेवेची नियमितता वाढण्यास मदत होईल.
चार दिवस झाली सविस्तर सुरक्षा तपासणी
मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी ५ ते ८ जुलैदरम्यान माण–बालेवाडी मार्गाची सखोल पाहणी केली होती. (Hinjawadi Metro) पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मार्गिका, स्थानके, रुळ, विद्युत यंत्रणा, सिग्नलिंग आणि प्रवासी सुरक्षेशी संबंधित विविध बाबींची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान नोंदवण्यात आलेल्या निरीक्षणांबाबत कंपनीने आवश्यक कार्यवाही करून अनुपालन अहवाल सुरक्षा प्राधिकरणाकडे सादर केला.
चाचण्या आणि तांत्रिक प्रमाणपत्रांची पडताळणी
मंजुरी देण्यापूर्वी मार्गिकेवरील (Hinjawadi Metro) मेट्रोच्या चाचणी फेऱ्यांची पडताळणी करण्यात आली. स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकन प्रमाणपत्र, मुख्य विद्युत निरीक्षकांचे ना-हरकत प्रमाणपत्र, दूरसंचार विभागाचा परवाना आणि सर्व १२ स्थानकांची अग्निसुरक्षा मंजुरी तपासण्यात आली. नागरी बांधकाम, रुळ, सिग्नलिंग, दूरसंचार यंत्रणा आणि मेट्रो गाड्यांशी संबंधित तांत्रिक प्रमाणपत्रांचेही परीक्षण करण्यात आले.
हिंजवडीतील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा
हिंजवडी आयटी पार्क आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक कोंडी ही अनेक वर्षांपासून गंभीर समस्या बनली आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी वाकड, बाणेर, बालेवाडी आणि हिंजवडी परिसरात वाहनांच्या लांब रांगा लागतात. मेट्रोचा (Hinjawadi Metro) पहिला टप्पा कार्यान्वित झाल्यानंतर खासगी वाहनांवरील अवलंबित्व काही प्रमाणात कमी होऊन प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण हलका होण्याची अपेक्षा आहे.
सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय
पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडने ही मंजुरी सुरक्षितता, गुणवत्ता आणि अभियांत्रिकी क्षमतेच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानेही उर्वरित प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यावर भर दिला आहे. मेट्रो सेवा (Hinjawadi Metro) सुरू झाल्यानंतर नागरिकांना सुरक्षित, जलद आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय मिळणार आहे.
आता प्रवासी सेवेच्या तारखेकडे लक्ष
CMRSची मंजुरी मिळाल्याने माण–बालेवाडी टप्प्यावरील प्रवासी सेवा (Hinjawadi Metro) सुरू होण्यातील मोठा अडथळा दूर झाला आहे. मात्र, प्रत्यक्ष व्यावसायिक सेवा सुरू होण्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. उर्वरित परिचालन औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन आणि प्रवासी सेवेचे वेळापत्रक घोषित केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांचे लक्ष आता मेट्रोच्या पहिल्या प्रवासी फेरीकडे लागले आहे.