पुणे : विमाननगर येथील सिटी स्पेस बिल्डिंगमधील द रुट स्पा या स्पा सेंटरवर The Root Spa raid पुणे पोलिसांनी सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात धक्कादायक घटना घडली. पोलिसांची चाहूल लागताच पहिल्या मजल्यावरील गॅलरीतून पाईपला धरून खाली उतरून पळण्याचा प्रयत्न करत असताना पाईप तुटल्याने खाली पडून एका महिलेचा मृत्यू झाला, तर स्पा मॅनेजर जखमी झाला आहे.
The Root Spa raid छाप्याची चाहूल लागताच गॅलरीतून पळण्याचा प्रयत्न; स्पा मॅनेजर जखमी, पाच जणांवर गुन्हा दाखल
संगिता इंदल मुखिया (वय ३७, रा. बिहार) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव असून, हुसेन शफिकुल रहमान शेख (वय २८, रा. येरवडा भाजी मार्केट) हा जखमी झालेला स्पा मॅनेजर आहे. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी पोलीस अंमलदार लालू सतु कर्हे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून स्पा मॅनेजर हुसेन शफिकुल रहमान शेख, स्पा मालक बाबू, जागा भाड्याने देणारे नारायण पुंजाराम धारे (वय २६, रा. निमगाव गुरु, पो. सावंगी टेकाळे, बुलढाणा), जागा मालक भुतकर संतोष जयंत (वय ४९, रा. वीरभद्रनगर, बाणेर) आणि स्पामध्ये काम करणारा मेहदाद ऊर्फ अकरबरअली आलम (वय २२, रा. खांदवेनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट ग्राहकाद्वारे सापळा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमाननगर येथील सिटी स्पेस बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर द रुट स्पा The Root Spa raid नावाने हे स्पा सेंटर चालवले जात होते. येथे थायलंडसह इतर राज्यांतील तरुणींकडून मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची गुप्त माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांना मिळाली होती.
यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करून त्याला स्पामध्ये पाठवले. संबंधित ग्राहकाने आतून परिस्थितीची माहिती देताच पोलिसांनी तत्काळ छापा टाकला. दरवाजा बंद असल्याने पोलिसांना तो तोडून आत प्रवेश करावा लागला.
काऊंटरवर कोणीही दिसत नसल्याने आणि बाजूच्या रुमचे दरवाजे बंद असल्याने पोलिसांना संशय अधिक बळावला. एक दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर एका तरुणीने सांगितले की, मॅनेजर आणि संगिता मुखिया यांनी गॅलरीतून खाली उडी मारली आहे.
पाईप तुटल्याने दुर्घटना
पोलिसांनी गॅलरीतून खाली पाहिले असता एक महिला आणि एक पुरुष जखमी अवस्थेत पडलेले आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान संगिता मुखिया यांचा मृत्यू झाला.
१६ हजारांचा मुद्देमाल जप्त
प्राथमिक तपासात पाच तरुणींना मसाजच्या नावाखाली ग्राहकांना ‘खुश’ करून जास्त पैसे मिळतात असे सांगून वेश्या व्यवसायास भाग पाडले जात असल्याचे उघड झाले. थायलंड, आसाम आणि हरियाना येथील तरुणींकडून हा व्यवसाय करवून घेतला जात होता. पोलिसांनी घटनास्थळावरून १६ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव करीत आहेत. विमाननगर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.





















1 Comment