Fake Degree Certificate तीन लाखांत ‘बी.कॉम’ची बनावट पदवी? पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप; मुलाच्या प्रवेशाची चौकशी करण्यासाठी आलेल्या रिक्षाचालकाला पदवी विकत देण्याची ऑफर; बनावट गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन

Fake Degree Certificate

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नावाने अवघ्या तीन लाख रुपयांत बी.कॉमचे बनावट पदवी प्रमाणपत्र (Fake Degree Certificate) देण्याची ऑफर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यापीठातीलच एका कर्मचाऱ्याने आपल्या तीन ते चार साथीदारांसह ही ऑफर दिल्याचा आरोप रिक्षाचालक महेश कदम यांनी केला आहे. बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र तयार करून देण्यासंबंधी तक्रार प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाची सत्यता व व्याप्ती तपासण्यासाठी चौकशी समिती स्थापन केली आहे.

(Fake Degree Certificate) रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे महेश कदम गेल्या वर्षी आपल्या मुलाच्या पदवी अभ्यासक्रमातील प्रवेशाबाबत चौकशी करण्यासाठी विद्यापीठात गेले होते. याच वेळी त्यांची विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागातील रमेश मुखेकर नावाच्या कर्मचाऱ्याशी भेट झाली.

 प्रवेश प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी आलेल्या कदम यांना थेट पदवी प्रमाणपत्र विकत देण्याची ऑफर करण्यात आल्याने त्यांना धक्का बसला.

तीन लाख रुपयांत बी.कॉम प्रमाणपत्राची ऑफर

कदम यांच्या आरोपानुसार, संबंधित कर्मचाऱ्याने त्यांना कोणताही अभ्यासक्रम पूर्ण न करता वाणिज्य शाखेचे बी.कॉम पदवी प्रमाणपत्र देण्याची (Fake Degree Certificate) तयारी दर्शविली. त्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली. या व्यवहारामध्ये आणखी तीन ते चार जण सहभागी असल्याचेही कदम यांनी म्हटले आहे. विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेच्या नावाने अशी ऑफर दिली गेल्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

आर्थिक परिस्थितीमुळे व्यवहार नाकारला

“माझ्या मुलाच्या पदवी अभ्यासक्रमाची चौकशी करण्यासाठी मी विद्यापीठात गेलो होतो. त्या वेळी मुखेकर यांनी तीन लाख रुपये दिल्यास बी.कॉमचे पदवी प्रमाणपत्र (Fake Degree Certificate) मिळवून देऊ, असे सांगितले. मात्र, तीन लाख रुपये देणे मला शक्य नव्हते,” असे कदम यांनी सांगितले. पैसे देण्याची क्षमता नसल्याने त्यांनी हा कथित व्यवहार पुढे नेला नाही.

बनावट गुणपत्रिकेचाही तक्रारीत उल्लेख

या प्रकरणात केवळ पदवी प्रमाणपत्रच (Fake Degree Certificate) नव्हे, तर बनावट गुणपत्रिका तयार करून दिल्याचाही आरोप आहे. विद्यापीठाच्या अधिकृत नोंदी, शिक्के, स्वाक्षऱ्या किंवा प्रमाणपत्रांच्या नमुन्यांचा गैरवापर झाला आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे कथित बनावट कागदपत्रे प्रत्यक्षात कशा पद्धतीने तयार केली जात होती, याचा शोध घेण्याचे आव्हान चौकशी समितीसमोर असेल.

विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार दाखल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्याने बनावट गुणपत्रिका आणि पदवी (Fake Degree Certificate) तयार करून दिल्याचा आरोप असलेली तक्रार विद्यापीठ प्रशासनाला प्राप्त झाली आहे. तक्रारीतील आरोपांची प्राथमिक पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधित कर्मचारी आणि तक्रारदार यांचे म्हणणे नोंदवून आवश्यक पुरावे तपासले जाण्याची शक्यता आहे.

चौकशी समिती करणार सत्यता आणि व्याप्तीची तपासणी

प्रकरणाची सत्यता तपासण्याबरोबरच अशा प्रकारचे आणखी व्यवहार झाले आहेत का, याचाही शोध घेतला जाणार आहे. कथित प्रकारात (Fake Degree Certificate) विद्यापीठातील अन्य कर्मचारी किंवा बाहेरील व्यक्तींचा सहभाग आहे का, बनावट प्रमाणपत्रे यापूर्वी कोणाला देण्यात आली आहेत का आणि त्यांचा नोकरी अथवा पुढील शिक्षणासाठी वापर झाला आहे का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे चौकशीतून अपेक्षित आहेत.

दोषींवर कडक कारवाईचा इशारा

“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कर्मचाऱ्याने बनावट गुणपत्रिका आणि पदवी (Fake Degree Certificate) तयार करून दिल्याचा आरोप असणारी तक्रार प्राप्त झाली आहे. त्याची सत्यता व व्याप्ती तपासण्यासाठी चौकशी समिती स्थापन केली आहे. दोषी असणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कडक कारवाई केली जाईल,” असे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी स्पष्ट केले.

विद्यापीठाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी लाखो विद्यार्थी आणि हजारो महाविद्यालये जोडलेली आहेत. त्यामुळे विद्यापीठाच्या नावाने बनावट पदवी प्रमाणपत्रे (Fake Degree Certificate) तयार होत असल्याचा आरोप अत्यंत गंभीर मानला जात आहे. या आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांवर प्रशासकीय कारवाईबरोबरच फौजदारी गुन्हा दाखल होण्याचीही शक्यता आहे. आता चौकशी समितीच्या अहवालाकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा : Pune Traffic Congestion पुण्याची कोंडी फोडण्यासाठी ट्रिपल इंजिन ; एचसीएमटीआर, रिंगरोड अन् बोगद्यांच्या जाळ्याला वेग; एचसीएमटीआर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य; भूसंपादनासाठी रोख मोबदला, शासकीय जमिनींसाठी एकत्रित शासन निर्णयाचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.
Exit mobile version