पुणेः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ (Scholarship Exam 2026) ही २६ एप्रिल २०२६ रोजी राज्यभर एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे. ही माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.
शासनमान्य शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता चौथी किंवा सातवीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथीसाठी, तर उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवीसाठी असणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. अर्ज भरताना परीक्षेचे माध्यम निवडताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सेमी इंग्रजी माध्यम निवडलेल्या विद्यार्थ्यांना काही विषयांच्या प्रश्नपत्रिका दोन्ही माध्यमांत (मूळ माध्यम + इंग्रजी) दिल्या जाणार आहेत.
Scholarship Exam 2026: परीक्षा वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची
ही परीक्षा वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असून प्रत्येक पेपरसाठी चार पर्यायांपैकी एकच योग्य उत्तर असणार आहे. परीक्षा मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड अशा सात माध्यमांत तसेच सहा सेमी माध्यमांत होणार आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नियमित, विलंब, अतिविलंब आणि अति विशेष विलंब अशा टप्प्यांमध्ये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी व पालकांनी अधिकृत संकेतस्थळांना भेट द्यावी.
हेही वाचाः Navrasya: सूर्यदत्त नॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात; विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट सादरीकरण
Leave a Reply