Krishna Kumar Goyal
Krishna Kumar Goyal

Pune Festival 2026 पुणे फेस्टिव्हलच्या अध्यक्षपदी कृष्णकुमार गोयल; चेअरपर्सन म्हणून मीरा कलमाडी यांची निवड; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार ३८ वा पुणे फेस्टिव्हल

पुणे : पुण्याची सांस्कृतिक ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविणाऱ्या प्रतिष्ठित पुणे फेस्टिव्हलच्या (Pune Festival 2026) अध्यक्षपदी ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल (Krishna Kumar Goyal) यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. फेस्टिव्हलच्या चेअरपर्सनपदी मीरा कलमाडी, तर सेक्रेटरीपदी डॉ. सतीश देसाई यांची निवड झाली. पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार दिवंगत सुरेश कलमाडी यांच्या निधनानंतर झालेल्या विश्वस्तांच्या पहिल्या बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

(Pune Festival 2026) बैठकीच्या प्रारंभी पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत सुरेश कलमाडी यांना विश्वस्त आणि पदाधिकाऱ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पुणे फेस्टिव्हलच्या उभारणीपासून ते या महोत्सवाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देण्यापर्यंतच्या त्यांच्या योगदानाला यावेळी उजाळा देण्यात आला.

त्यांच्या आठवणींना अभिवादन करत त्यांनी सुरू केलेला सांस्कृतिक वारसा अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेण्याचा निर्धारही उपस्थितांनी व्यक्त केला.

नव्या नेतृत्वाकडे महत्त्वाची जबाबदारी

विश्वस्तांच्या बैठकीत (Pune Festival 2026) कृष्णकुमार गोयल (Krishna Kumar Goyal) यांच्या नावावर अध्यक्षपदासाठी एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. मीरा कलमाडी यांच्याकडे चेअरपर्सनपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, डॉ. सतीश देसाई यांची सेक्रेटरीपदी निवड झाली आहे. प्रख्यात अभिनेत्री, नृत्यांगना आणि खासदार हेमा मालिनी या पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन म्हणून कार्यरत आहेत.

फेस्टिव्हलच्या (Pune Festival 2026) अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांचीही फेरनिवड करण्यात आली. त्यामध्ये सुभाष सणस यांची उपाध्यक्षपदी, तर अॅड. अभय छाजेड यांची मुख्य संयोजकपदी निवड करण्यात आली. डॉ. सतीश देसाई यांच्याकडे सेक्रेटरीपदासह सांस्कृतिक कार्यक्रमांचे मुख्य संयोजक म्हणूनही जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. सर्व पदाधिकाऱ्यांची निवड एकमताने झाल्याने पुणे फेस्टिव्हलच्या पुढील वाटचालीसाठी संघटित आणि अनुभवी नेतृत्व उपलब्ध झाले आहे.

सुरेश कलमाडींचा ३७ वर्षांचा सांस्कृतिक वारसा

माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी ३७ वर्षांपूर्वी पुणे फेस्टिव्हलची (Pune Festival 2026) मुहूर्तमेढ रोवली. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांना शहराची कला, संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक वैभव अनुभवता यावे, या उद्देशाने त्यांनी या महोत्सवाची सुरुवात केली. सांस्कृतिक कार्यक्रम, शास्त्रीय संगीत, नृत्य, नाट्य, क्रीडा, पर्यटन आणि सामाजिक उपक्रमांचा समन्वय साधत पुणे फेस्टिव्हलने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली.

सुरेश कलमाडी यांच्या नेतृत्वाखाली पुणे फेस्टिव्हल (Pune Festival 2026) दरवर्षी सातत्याने आणि भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला. देशातील नामवंत कलाकारांसह आंतरराष्ट्रीय कलाकारांनाही या महोत्सवाने व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यामुळे पुण्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून असलेली ओळख अधिक दृढ झाली आणि शहराचे नाव जागतिक पर्यटन नकाशावर पोहोचले.

१४ सप्टेंबरपासून ३८ व्या पुणे फेस्टिव्हलचा जल्लोष

सुरेश कलमाडी यांच्या पश्चात त्यांनी निर्माण केलेला वारसा जतन करणे आणि पुणे फेस्टिव्हलची (Pune Festival 2026) भव्यता कायम राखणे ही मोठी जबाबदारी असल्याची भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. विश्वस्त, समितीप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या एकत्रित मेहनतीतून तसेच श्रीगणेशाच्या आशीर्वादाने हा सांस्कृतिक वारसा निश्चितपणे पुढे नेला जाईल, असा विश्वास नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

यंदाचा ३८ वा पुणे फेस्टिव्हल (Pune Festival 2026) १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत साजरा होणार आहे. बारा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी पुणेकर आणि पर्यटकांना अनुभवता येणार आहे. नव्या नेतृत्वाखाली होणाऱ्या यंदाच्या पुणे फेस्टिव्हलकडे पुणेकरांसह देश-विदेशातील कलाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा :  PSI Suspended फ्लाईंग जिप्सी’ कॅफेत राडा घालणारे पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम निलंबित; रात्रगस्तीदरम्यान काठीने तोडफोड अन् अरेरावीचा व्हिडिओ व्हायरल; काठीने मारून कॉफीचे ग्लास फोडले, ग्राहकांना हुसकावून लावले

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.