Homi Bhabha Hospital Pune: ठेकेदारांचे कर्मचारी रुग्णालयातच ठाण मांडून; काम ७ वर्षांपासून प्रलंबित

Homi Bhabha Hospital

पुणेः शिवाजीनगरमधील महापालिकेच्या डॉ. होमी भाभा रुग्णालयाचे (Homi Bhabha Hospital) काम तब्बल सात वर्षे उलटूनही अद्याप अपूर्ण आहे.

चार मजली इमारतीचे बांधकाम रखडल्यामुळे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेले नाही. प्रसूतीसारख्या अत्यावश्यक सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांसह महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

वडारवाडी परिसरातील या रुग्णालयात अनेक महत्त्वाची कामे प्रलंबित असून ठेकेदाराचे कर्मचारी अनेक वर्षांपासून रुग्णालयाच्या आवारातच वास्तव्यास आहेत. त्यांची वाहनेही याच ठिकाणी उभी केली जात असल्याने रुग्णालयाच्या परिसराचा गैरवापर होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांची वसाहत आणि वाहनतळ रुग्णालयातच असल्यामुळे काम मुद्दाम संथ गतीने सुरू असल्याची शंका रुग्णांनी व्यक्त केली आहे.

Homi Bhabha Hospital: मूलभूत सुविधा अद्याप पूर्ण नाहीत

रुग्णालयातील विद्युत जनरेटर, पाणी शुद्धीकरण केंद्र, संरक्षण भिंत, सुरक्षा रक्षक कक्ष, औषध साठवणूक कक्ष, सोलार यंत्रणा, तसेच वाहनतळ आदी मूलभूत सुविधा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. प्रत्येक मजल्यावरील फर्निचर, विद्युत कामे, वातानुकूलीत यंत्रणा, प्रतीक्षालये आणि समुपदेशन कक्षांची कामेही रखडलेली आहेत.

विशेष म्हणजे रुग्णालयात (Homi Bhabha Hospital) प्रसूतीची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे परिसरातील महिलांना इतर रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. प्रसूतीसाठी आवश्यक यंत्रणा, साहित्य व बांधकाम पूर्ण न झाल्याने महिलांची मोठी गैरसोय होत आहे.

दरम्यान, रुग्णालयाचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करून ते पूर्ण क्षमतेने सुरू करावे, अशी मागणी रुग्ण आणि डॉक्टरांकडून होत आहे. या संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त करताना सांगितले की, “निवडणुकीच्या काळात आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात महिलांच्या आरोग्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही. आमच्या भागातील महिलांच्या आरोग्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार?”

हेही वाचाः International Ayurveda Ratna Award: डॉ हरीश पाटणकर यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान 

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.
Exit mobile version