Tukaram Mundhe सुट्टीच्या दिवशीही कामाचा ‘डोस’; FDA च्या 29 अधिकारी-कर्मचाऱ्यांची तक्रार, तुकाराम मुंढेंनी आरोप फेटाळले; दोन पाळ्या, अपुरे मनुष्यबळ आणि वाढत्या कामाच्या ताणावरून छत्रपती संभाजीनगरच्या प्रयोगशाळेत नाराजी 

Tukaram Mundhe

छत्रपती संभाजीनगर : शिस्तप्रिय आणि धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळख असलेले अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतील 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवला आहे. दोन पाळ्यांमध्ये काम, शनिवार-रविवारसह सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी उपस्थित राहण्याचे आदेश आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे वाढलेला ताण, अशा विविध मुद्द्यांचा तक्रारीत समावेश आहे. मात्र कर्मचाऱ्यांकडून कोणतेही अतिरिक्त काम करून घेतले जात नसल्याचे सांगत मुंढे यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

(Tukaram Mundhe) प्रयोगशाळेतील 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 15 जुलै रोजी अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले. या निवेदनावर संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सह्या असल्याचे सांगण्यात येत आहे. 

प्रयोगशाळेतील कामकाजाची पद्धत, सतत बदलणारे आदेश आणि उपलब्ध संसाधनांच्या तुलनेत वाढणाऱ्या जबाबदाऱ्यांबाबत निवेदनातून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

दोन पाळ्यांच्या निर्णयाला विरोध

प्रयोगशाळेमध्ये (Tukaram Mundhe) अचानक दोन पाळ्यांमध्ये काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. मात्र हा निर्णय राबविण्यासाठी आवश्यक संख्येने कर्मचारी, तांत्रिक सहाय्यक आणि अन्य सुविधा उपलब्ध नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आधीच अनेक पदे रिक्त असल्याने सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

सुट्टीच्या दिवशीही कामाचे आदेश?

शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कामावर उपस्थित राहण्याचे आदेश (Tukaram Mundhe) दिले जात असल्याचे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. काहीवेळा सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री बारापर्यंत काम करावे लागत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. कार्यालयीन वेळांमध्ये वारंवार होणाऱ्या बदलांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाल्याचे तक्रारदारांनी नमूद केले आहे.

तपासणीच्या गुणवत्तेबाबत चिंता

प्रयोगशाळेत अन्नपदार्थ, औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. प्रलंबित नमुन्यांचा वेगाने निपटारा करण्याच्या प्रयत्नात विश्लेषणाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. प्रत्येक नमुन्याची वैज्ञानिक मानकांनुसार तपासणी करण्यासाठी पुरेसा वेळ आवश्यक असतो. घाईमध्ये अहवाल तयार केल्यास अचूकतेबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतात, असा त्यांचा दावा आहे.

मानकांनुसार तपासणीसाठी वेळ आवश्यक

(Tukaram Mundhe) भारतीय औषध संहिता, ब्रिटिश फार्माकोपिया आणि अमेरिकन फार्माकोपियासारख्या निर्धारित मानकांनुसार नमुन्यांचे विश्लेषण केले जाते. प्रत्येक विश्लेषकाची नमुने तपासण्याची एक निश्चित क्षमता असते. मात्र त्या क्षमतेपेक्षा अधिक नमुने तपासण्याचा दबाव टाकला जात असल्याचा आरोप अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केला आहे. प्रयोगशाळेतील उपकरणे, क्षमता आणि मनुष्यबळ वाढविल्याशिवाय दोन पाळ्यांची व्यवस्था राबवू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

मुंढेंनी आरोप फेटाळले

तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी तक्रारीतील आरोप वस्तुस्थितीला धरून नसल्याचे स्पष्ट केले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांना गरजेनुसार विविध जबाबदाऱ्या दिल्या जातात. आवश्यकतेनुसार दोन पाळ्यांमध्ये कामाचे नियोजन करण्यात आले आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याकडून नियोजित वेळेपेक्षा जास्त काम करून घेतले जात नसल्याचे त्यांनी सांगितले.

‘आठवड्यात केवळ 48 तास काम’

नियमांनुसार प्रत्येक कर्मचाऱ्याकडून आठवड्याला अपेक्षित असलेले 48 तासच काम करून घेतले जाते, असा दावा मुंढे (Tukaram Mundhe) यांनी केला. त्यापेक्षा अधिक कामाचा भार कोणावरही टाकण्यात आलेला नाही. त्यामुळे अतिरिक्त काम आणि अवाजवी दबावाचे आरोप योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कामाच्या आवश्यकतेनुसार पाळ्यांचे नियोजन करणे हा प्रशासनाचा नियमित भाग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या

दोन पाळ्यांमध्ये काम करण्याचा निर्णय मागे घेऊन पूर्वीची कार्यालयीन वेळ लागू करावी, अशी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. अतिरिक्त काम आवश्यक असल्यास योग्य भत्ते आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्याचबरोबर रिक्त पदे भरून प्रयोगशाळेची क्षमता, उपकरणे आणि तांत्रिक मनुष्यबळ वाढवावे, असेही निवेदनात म्हटले आहे. आता मंत्री नरहरी झिरवाळ या तक्रारीवर कोणती भूमिका घेतात, याकडे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा :  Hotmix Plant अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी खड्डेमुक्तीला ‘बूस्टर’; येरवडा प्लांटसाठी १४ कोटींच्या डांबर खरेदीला हिरवा कंदील; पेट्रोलियम कंपन्यांकडून थेट खरेदी; १५ क्षेत्रीय कार्यालयांना मिळणार डांबरी मिश्रण, पावसाळ्यातील रस्ते दुरुस्तीला वेग येण्याची अपेक्षा

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.
Exit mobile version