Air Pollution
Air Pollution

Air Pollution पुण्याच्या श्वासाला प्रदूषणाचा विळखा; वर्षातील ३१ दिवस हवा ‘खराब’; वाहनांची विक्रमी भर, वाहतूक कोंडी आणि बांधकामांच्या धुळीने वाढवली चिंता; नायट्रोजन डायऑक्साइडसह सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण धोक्याच्या दिशेने

पुणे : झपाट्याने होणारे शहरीकरण, रस्त्यांवरील वाढती वाहने, सातत्याने सुरू असलेली बांधकामे आणि वाहतूक कोंडी यांचा थेट परिणाम पुण्याच्या हवेवर होत आहे. शहरात २०२५-२६ या वर्षात तब्बल ३१ दिवस हवेची गुणवत्ता ‘खराब’ (Air Pollution) नोंदविण्यात आली. पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत पर्यावरण सद्यस्थिती अहवाल सादर करण्यात आला त्यात ही माहिती देण्यात आली आहे. 

 (Air Pollution) गेल्या पाच वर्षांत नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाणही वाढले असून, प्रमुख चौक आणि वर्दळीच्या भागांमध्ये सूक्ष्म धूलिकणांची पातळी चिंताजनक बनली आहे. पुण्याची हवा आता केवळ पर्यावरणाचा नव्हे, तर नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न ठरत आहे.

 वर्षातील केवळ १२ दिवस स्वच्छ हवा

शहराच्या हवेच्या गुणवत्तेचे वर्षभर केलेले निरीक्षण धक्कादायक चित्र समोर आणते. वर्षातील केवळ १२ दिवस हवा चांगली होती. १९२ दिवस हवेची गुणवत्ता समाधानकारक, तर १३० दिवस मध्यम स्वरूपाची नोंदविण्यात आली. तब्बल ३१ दिवस पुणेकरांना खराब हवेत (Air Pollution) श्वास घ्यावा लागला. प्रदूषणाची ही स्थिती कायम राहिल्यास भविष्यात ‘खराब हवा’ असलेल्या दिवसांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रस्त्यांवर साडेतीन लाख नव्या वाहनांची भर

पुण्यात वाहनांची संख्या वेगाने वाढत असून, एका वर्षात तब्बल ३ लाख ४६ हजार ११२ वाहनांची नव्याने भर पडली आहे. रस्त्यांची मर्यादित क्षमता, अपुरी सार्वजनिक वाहतूक आणि खासगी वाहनांचा वाढता वापर यामुळे शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडी होते. कोंडीत बराच वेळ सुरू राहणाऱ्या वाहनांमधून कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड आणि इतर घातक वायू बाहेर पडतात. त्यामुळे वर्दळीच्या चौकांमध्ये प्रदूषणाची तीव्रता (Air Pollution) अधिक जाणवते.

नायट्रोजन डायऑक्साइडमध्ये सातत्याने वाढ

वाहनांमधून होणाऱ्या उत्सर्जनामुळे गेल्या पाच वर्षांत शहरातील नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रीय मानकांच्या तुलनेत हे प्रमाण सध्या सुरक्षित मर्यादेत असले, तरी त्यातील वाढीचा कल धोक्याचा इशारा (Air Pollution) देणारा आहे. शिवाजीनगरसारख्या वर्दळीच्या परिसरात तसेच औद्योगिक आणि दाट वाहतुकीच्या भागांमध्ये या वायूचे प्रमाण तुलनेने अधिक आढळते. दीर्घकाळ अशा प्रदूषित हवेत राहिल्यास श्वसनसंस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

सूक्ष्म धूलिकणांनी वाढवला आरोग्याचा धोका

शहरातील प्रमुख रस्ते, बांधकाम प्रकल्प, खोदकामे आणि उघड्यावर पडलेला राडारोडा यामुळे हवेत ‘पीएम १०’ आणि ‘पीएम २.५’ या सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण वाढत (Air Pollution) आहे. हे अतिसूक्ष्म कण श्वासाद्वारे थेट फुफ्फुसांपर्यंत पोहोचतात. दमा, खोकला, श्वास घेण्यास त्रास, घशाची जळजळ आणि हृदयविकार असलेल्या नागरिकांना त्याचा अधिक फटका बसू शकतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि मैदानी काम करणारे कर्मचारी विशेष जोखमीच्या गटात आहेत.

बांधकामांच्या धुळीवर नियंत्रण गरजेचे

मेट्रो, उड्डाणपूल, रस्ते आणि खासगी इमारतींची कामे शहराच्या विविध भागांत सुरू आहेत. बांधकामस्थळी संरक्षक जाळ्या न लावणे, राडारोडा उघड्यावर ठेवणे आणि माती वाहून नेणाऱ्या वाहनांवर आच्छादन नसणे यामुळे मोठ्या प्रमाणावर धूळ पसरते. (Air Pollution) बांधकाम प्रकल्पांनी नियमित पाणी फवारणी, वाहनांची स्वच्छता आणि धूळरोधक उपाय करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केल्याशिवाय परिस्थितीत बदल होणार नाही.

सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य हवे

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी बस आणि मेट्रोचे जाळे अधिक सक्षम करणे, सायकल मार्ग विकसित करणे तसेच पायी चालण्यासाठी सुरक्षित पदपथ उपलब्ध करणे गरजेचे आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देतानाच जुन्या आणि अधिक धूर सोडणाऱ्या वाहनांची नियमित तपासणी केली पाहिजे. प्रमुख चौकांमधील वाहतूक नियोजन सुधारल्यास कोंडीमुळे होणारे उत्सर्जन कमी करता येईल.

आजच उपाय केले तरच उद्याचा श्वास सुरक्षित

वायुप्रदूषणाचा (Air Pollution) सामना केवळ प्रशासनाच्या प्रयत्नांनी शक्य नाही. नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर, वाहनांचे नियमित प्रदूषण परीक्षण, कार-पूलिंग आणि अनावश्यक वाहन वापर टाळण्यास प्राधान्य दिले पाहिजे. शहराच्या विकासाबरोबर स्वच्छ हवेचे नियोजन झाले नाही, तर पुण्याची ओळख ‘राहण्यायोग्य शहर’ म्हणून टिकवणे कठीण होईल. आज घेतलेले ठोस निर्णयच उद्याच्या पुणेकरांचा श्वास सुरक्षित ठेवू शकतील.

हे ही वाचा : BJP Maharashtra भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या ‘दौरा समन्वयक – माध्यम विभाग’ पदी अमोल कविटकर