पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या १ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसने आंदोलन केल्यास भारतीय जनता पक्षाकडूनही प्रति-आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिला. “इलाका तुम्हारा होगा, लेकिन धमाका हमारा होगा,” अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसला थेट आव्हान दिले.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल Ajit Doval पुण्यात येणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली.
देशाची अखंडता आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी अमित शाह (Amit Shah) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचा दावा करत, त्यांचा पुणे दौरा शहरासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे भाजपने म्हटले आहे.
कलम ३७० आणि नक्षलवादाविरोधातील कारवाईचा उल्लेख
जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा निर्णय तसेच नक्षलवादाविरोधात केंद्र सरकारने केलेल्या कारवाईचा उल्लेख भाजपने आपल्या निवेदनात केला. अमित शाह (Amit Shah) यांच्या कणखर नेतृत्वामुळे देशाची सुरक्षा अधिक सक्षम झाल्याचा दावा धीरज घाटे Dheeraj Ghate यांनी केला.
काँग्रेसवर ‘राजकीय स्टंटबाजी’चा आरोप
दरम्यान, अमित शाह (Amit Shah) यांच्या दौऱ्यावेळी आंदोलन करण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेवर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे राजकीय प्रसिद्धीसाठी आंदोलनाची स्टंटबाजी करत असल्याचा आरोप घाटे यांनी केला. या आंदोलनाच्या माध्यमातून पुण्यातील शांतता बिघडवण्याचा आणि सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी म्हटले.
भाजपच्या शिष्टमंडळाची पोलीस आयुक्तांकडे धाव
या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाने पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. अमित शाह (Amit Shah) यांच्या दौऱ्यादरम्यान काँग्रेसला आंदोलनाची परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारे निवेदन शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांना दिले. दौऱ्यादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणीही भाजपने केली.
‘आंदोलनाला परवानगी दिल्यास प्रति-आंदोलन करणार’
काँग्रेसला आंदोलनाची परवानगी देण्यात आल्यास भाजपलाही त्याच ठिकाणी प्रति-आंदोलन करण्याची परवानगी द्यावी लागेल, अशी भूमिका घाटे यांनी मांडली. पुण्यातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न झाल्यास भाजप शांत बसणार नाही आणि काँग्रेसला ‘जशास तसे’ उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी Dheeraj Ghate दिला.
‘काँग्रेस नेत्यांना पुण्यात पाय ठेवू देणार नाही’
काँग्रेसच्या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी काँग्रेसची असेल, असे घाटे म्हणाले. परिस्थिती बिघडल्यास काँग्रेसच्या एकाही नेत्याला पुण्यात पाय ठेवू देणार नाही, असा आक्रमक इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे अमित शाह (Amit Shah) यांच्या दौऱ्यापूर्वी पुण्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
भाजपचे पदाधिकारी उपस्थित
पोलीस आयुक्तांच्या भेटीवेळी भाजपचे सरचिटणीस तथा नगरसेवक रवी साळेगावकर, बापू मानकर, पुनीत जोशी, दीपक पोटे, विश्वास ननावरे, सुशील मेंगडे आणि अमर आवळे उपस्थित होते. महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा मनीषा लडकत, युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ आणि पुष्कर तुळजापूरकर यांचाही शिष्टमंडळात समावेश होता.