Pandharpur Corridor)
Pandharpur Corridor)

Pandharpur Corridor पंढरपूर कॉरिडॉर अडीच वर्षांत पूर्ण करणार; बाधितांचे योग्य पुनर्वसन करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही; आषाढी एकादशीनिमित्त देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा; वाढत्या भाविकांसाठी मंदिर परिसरात आधुनिक सुविधा उभारणार

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंढरपूर कॉरिडॉरच्या (Pandharpur Corridor) माध्यमातून मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे कोणावरही अन्याय होणार नाही. बाधित नागरिक, व्यावसायिक आणि भाडेकरूंचे योग्य पुनर्वसन करून कॉरिडॉरचे काम येत्या अडीच वर्षांत पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

(Pandharpur Corridor) आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती बाबासाहेब माने हे दाम्पत्यही महापूजेत सहभागी झाले.

 महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात मुख्यमंत्री बोलत होते.

याच वर्षी कॉरिडॉरच्या कामाला प्रारंभ

मंदिर विकासाचे यापूर्वी सुरू करण्यात आलेले काम बहुतांश पूर्ण झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लाखो भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत असताना सध्याची जागा अपुरी पडत असल्यामुळे मोठ्या जागेची निर्मिती करणे आवश्यक आहे. कॉरिडॉरचे (Pandharpur Corridor) काम याच वर्षी सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

व्यावसायिक, रहिवासी आणि भाडेकरूंचे हित जपणार

कॉरिडॉरच्या (Pandharpur Corridor) विकासामुळे स्थानिक व्यावसायिकांचा व्यवसाय वाढावा, नागरिकांना घरे मिळावीत आणि भाडेकरूंची योग्य व्यवस्था व्हावी, अशा पद्धतीने प्रकल्पाची रचना करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भाविकांची संख्या कितीही वाढली तरी त्यांच्यासाठी उत्तम व्यवस्था उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दर्शन रांगेने गाठला नवा उच्चांक

(Pandharpur Corridor) यंदाच्या आषाढी वारीने नवा उच्चांक गाठल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. दर्शनासाठी २५ किलोमीटरपेक्षा अधिक लांबीची रांग लागली होती. दर्शनाला सुमारे २५ तास लागत असतानाही वारकरी नाराज किंवा निराश न होता आनंदाने विठ्ठलनामाचा गजर करत असल्याचे त्यांनी सांगितले. वारकऱ्यांचा हा भक्तिभाव महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेचे वैशिष्ट्य असल्याचेही ते म्हणाले.

चंद्रभागा आणि वाळवंटाच्या स्वच्छतेवर भर

चंद्रभागा नदीचे पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी (Pandharpur Corridor) प्रशासनाने विशेष काळजी घेतली. वाळवंट परिसरात पालकमंत्री आणि प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे कचरा व इतर घाण तातडीने हटविण्यात आली. त्यामुळे चंद्रभागेचे वाळवंट पुन्हा स्वच्छ आणि सुंदर दिसत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

वारकऱ्यांची सेवा म्हणजे विठुरायाची सेवा

लाखो भक्त पायी चालत विठुरायाच्या दर्शनासाठी येतात, तर अनेक वारकरी मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन समाधान मानतात. या सोहळ्यात सहभागी होणे ही पर्वणी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून केलेली शासकीय महापूजा ही राज्यातील आणि जगभरातील पांडुरंग भक्तांच्या वतीने केलेली पूजा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय

वारीमध्ये शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, उद्योजक आणि विविध क्षेत्रांतील नागरिक सहभागी होतात. विठुरायाची प्रत्यक्ष सेवा करता आली नाही, तरी वारकरी आणि शेतकऱ्यांची सेवा विठ्ठलापर्यंत पोहोचते, असे मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी, मोफत वीज आणि थकीत वीजबिल माफीचे निर्णय शासनाने घेतल्याचे त्यांनी सांगितले.

मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सन्मान

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती माने यांना यंदाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला. महापूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. एसटी महामंडळाकडून माने दाम्पत्याला वर्षभर मोफत प्रवासाचा पासही देण्यात आला.

‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कारांचे वितरण

(Pandharpur Corridor) पाणी, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, प्लास्टिकमुक्त वारी आणि वृक्षसंवर्धनाबाबत प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. श्री विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, कौंडण्यपूरने प्रथम, वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान, जालनाने द्वितीय, तर गोऱ्हेकर संस्था, आळंदी देवाचीने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या संस्थांना पुरस्कार आणि धनादेश देऊन गौरविण्यात आले.

हे ही वाचा : Hinjawadi Metro हिंजवडी मेट्रोला ‘सेफ्टी सिग्नल’; माण–बालेवाडी मार्गावर प्रवासी सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा; पुणे मेट्रो मार्गिका क्रमांक ३च्या १३ किलोमीटर टप्प्याला CMRS ची तात्पुरती मंजुरी; १२ स्थानकांचा समावेश, उर्वरित औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर व्यावसायिक सेवा सुरू होणार

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.