Pune Airport पुणे विमानतळाच्या भरारीला नवे पंख; वाढीव स्लॉटमधून नव्या शहरांसाठी उड्डाणे; देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्ताराला प्राधान्य; २३५ दैनंदिन विमान हालचालींच्या क्षमतेचा पूर्ण वापर करणार

Murlidhar Mohol

पुणे : भारतीय हवाई दलाच्या सहकार्यामुळे पुणे विमानतळावर (Pune Airport) उपलब्ध झालेल्या अतिरिक्त उड्डाण स्लॉटचा पूर्ण क्षमतेने वापर करून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवांचे जाळे विस्तारले जाणार आहे. पुण्यातून नवीन शहरांसाठी थेट उड्डाणे सुरू करण्यासह सध्याच्या लोकप्रिय मार्गांवरील विमानांची संख्या वाढविण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. वाढत्या प्रवासी मागणीची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकार, विमानतळ प्रशासन आणि विमान कंपन्यांमध्ये समन्वय सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे विमानतळावरून (Pune Airport) सध्या इंडिगो, एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर, स्पाइसजेट, फ्लाय९१, स्टार एअर आणि अलायन्स एअर या आठ विमान कंपन्यांकडून प्रवासी सेवा दिली जात आहे. अतिरिक्त स्लॉट उपलब्ध झाल्याची माहिती या सर्व विमान कंपन्यांना देण्यात आली आहे.

 कंपन्यांच्या मुख्यालयांशी समन्वय साधून पुण्यातून नव्या मार्गांवर विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

विद्यमान मार्गांवरील उड्डाणेही वाढणार

नवीन शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याबरोबरच प्रवाशांची संख्या अधिक असलेल्या विद्यमान मार्गांवरील उड्डाणांची वारंवारता वाढविण्यावरही (Pune Airport) भर दिला जाणार आहे. पुणेकरांना देशातील प्रमुख औद्योगिक, व्यावसायिक आणि पर्यटन शहरांशी अधिक चांगला थेट हवाई संपर्क मिळावा, हा यामागील प्रमुख उद्देश असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

हवाई दलाच्या निर्णयामुळे क्षमता वाढली

मोहोळ यांनी १९ मार्च २०२५ रोजी भारतीय हवाई दलाकडे पुणे विमानतळावरील (Pune Airport) उड्डाण स्लॉट वाढविण्याची अधिकृत विनंती केली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले. हवाई दलाने ३० मे २०२५ रोजी पुणे विमानतळावरील दैनंदिन विमान हालचालींची कमाल मर्यादा २२० वरून २३५ पर्यंत वाढविण्यास मान्यता दिली. त्यामुळे दररोज १५ अतिरिक्त विमान हालचालींचा मार्ग मोकळा झाला.

एका दिवसात २१४ विमान हालचाली

पुणे विमानतळावर २ ऑगस्ट २०२६ रोजी १०७ विमानांचे आगमन आणि १०७ विमानांचे प्रस्थान झाले. अशा प्रकारे एकाच दिवसात एकूण २१४ विमान हालचाली नोंदविण्यात आल्या. नव्याने निश्चित करण्यात आलेल्या २३५ विमान हालचालींच्या कमाल मर्यादेच्या तुलनेत विमानतळाची दैनंदिन क्षमता मोठ्या प्रमाणात वापरली जात असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होते.

पुण्याचा ३४ शहरांशी हवाई संपर्क

त्या दिवशी पुणे विमानतळावरून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा एकूण ३४ शहरांशी हवाई संपर्क उपलब्ध होता. दिल्लीसाठी सर्वाधिक १९, बंगळुरूसाठी १७ आणि चेन्नईसाठी सात उड्डाणे झाली. हैदराबाद आणि अहमदाबादसाठी प्रत्येकी पाच, तर गोव्यातील मोपा विमानतळासाठी चार उड्डाणे झाली. या शहरांसाठी प्रवाशांकडून असलेली वाढती मागणी या संख्येतून दिसून येते.

दुबई आणि बँकॉक सेवा पुन्हा सुरू

इंडिगो आणि एअर इंडिया एक्सप्रेसने दुबई आणि बँकॉक मार्गांवरील विमानसेवा पुन्हा सुरू केली आहे. त्यामुळे पुण्याच्या आंतरराष्ट्रीय हवाई संपर्काला चालना मिळाली असून अतिरिक्त स्लॉटचा वापरही लक्षणीयरीत्या वाढला आहे. आगामी काळात प्रवासी मागणी आणि विमान कंपन्यांचे नियोजन लक्षात घेऊन आणखी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

आयटी आणि उद्योगामुळे मागणीत वाढ

पुणे हे देशातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. माहिती-तंत्रज्ञान, वाहन उद्योग, शिक्षण, संरक्षण आणि पर्यटन क्षेत्रांमुळे पुण्यातून हवाई प्रवास करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. शहराचा व्यावसायिक विस्तार आणि देश-विदेशातून पुण्यात येणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता अधिक विमानसेवांची आवश्यकता असल्याचे मोहोळ यांनी नमूद केले.

अधिक पर्याय देण्याचे प्रमुख उद्दिष्ट

पुणे विमानतळाची उपलब्ध क्षमता अधिक प्रभावीपणे वापरणे, नवीन उड्डाणांना चालना देणे आणि प्रवाशांना अधिक मार्गांचे पर्याय उपलब्ध करून देणे, हे केंद्र सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे. विमान कंपन्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर नवीन मार्गांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. भविष्यात पुण्याची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक तो सातत्यपूर्ण पाठपुरावा केला जाईल, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा : Tukaram Mundhe सुट्टीच्या दिवशीही कामाचा ‘डोस’; FDA च्या 29 अधिकारी-कर्मचाऱ्यांची तक्रार, तुकाराम मुंढेंनी आरोप फेटाळले; दोन पाळ्या, अपुरे मनुष्यबळ आणि वाढत्या कामाच्या ताणावरून छत्रपती संभाजीनगरच्या प्रयोगशाळेत नाराजी 

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.
Exit mobile version