पुणे, :बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंग मंदिर महाशिवरात्रीच्या कालावधीतही (Bhimashankar Temple Closed) दर्शनासाठी बंद राहणार आहे. कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या भव्य विकासकामांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे.
दि. १२ फेब्रुवारी ते दि. १८ फेब्रुवारी २०२६ या महाशिवरात्री कालावधीतही श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांच्या नित्यदर्शनासाठी बंद (Bhimashankar Temple Closed) राहणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी स्पष्ट केले आहे.
सन २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या लाखो भाविकांपैकी मोठ्या संख्येने भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथेही दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ २०२५ मधील अनुभव लक्षात घेता, भविष्यातील गर्दी व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र शासनाने ‘श्री क्षेत्र भीमाशंकर विशेष विकास आराखडा (कुंभमेळा २०२७)’ मंजूर केला आहे.
या आराखड्याअंतर्गत भाविकांसाठी सुरक्षित, सुयोग्य व सुसज्ज सुविधा निर्माण करण्यासाठी नवीन भव्य सभामंडप, सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था, पायरी मार्ग, तसेच गर्दी व्यवस्थापनाच्या अत्याधुनिक सोयी विकसित केल्या जात आहेत. सध्या ही कामे वेगात सुरू असून कुंभमेळ्यापूर्वी सर्व पायाभूत सुविधा पूर्ण करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे.
कुंभमेळ्याच्या काळात दररोज सुमारे एक लाख भाविक भीमाशंकरला भेट देऊ शकतात. ही संभाव्य गर्दी लक्षात घेता जुना सभामंडप अपुरा ठरणार असल्याने तो पूर्णपणे हटवून नवीन, अधिक क्षमतेचा सभामंडप उभारण्यात येत आहे. तसेच पायरी मार्गाचे कामही सुरू आहे.
दरम्यान, बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर दगड, साहित्य व अवजड यंत्रसामग्री मंदिर परिसरात ठेवण्यात आलेली आहे. परिसराची भौगोलिक रचना, सुरू असलेले दगडी बांधकाम आणि रोजची गर्दी लक्षात घेता, मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे हे भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पूर्वी भाविकांच्या सोयीसाठी महाशिवरात्रीचा कालावधी (दि. १२ ते १८ फेब्रुवारी २०२६) वगळून मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सध्या सुरू असलेल्या कामांचा वेग, व्याप्ती आणि सुरक्षेचा सखोल आढावा घेतल्यानंतर, महाशिवरात्री दरम्यानही (Bhimashankar Temple Closed) मंदिर खुले ठेवणे शक्य नसल्याचे निदर्शनास आले.
विशेष म्हणजे, भीमाशंकर हा अतिवृष्टीचा प्रदेश असून जून ते सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसामुळे बांधकाम शक्य होत नाही. त्यामुळे उपलब्ध कालावधीतच कामे पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याने विकासकामांना गती देणे गरजेचे असल्याचे प्रशासनाने सांगितले.
या सर्व बाबींचा विचार करून दि. १२ फेब्रुवारी ते दि. १८ फेब्रुवारी २०२६ या महाशिवरात्री कालावधीतही श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांच्या नित्यदर्शनासाठी बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे गांभीर्य ओळखून मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
हे ही वाचा : Pune Municipal Corporation शहर परिवर्तन कक्षाद्वारे पुण्याचा कायापालट ; रस्ते, पादचारी मार्ग, स्वच्छतेवर भर



















1 Comment