Basari Parampara Festival Pune

Basari Parampara Festival Pune ‘बासरी परंपरा’ महोत्सवात ‘चक्रव्ह्यू’ ठरला कळसाध्याय; पंडित रूपक कुलकर्णी, मृगेंद्र मोहाडकर यांच्यासह ९३ शिष्यांचे एकत्रित बासरीवादन; सप्तचक्रांची रागांमधून अनोखी मांडणी

पुणे :परंपरा आणि नाविन्य यांचा सुरेल संगम साधत मानवी शरीरातील सप्तचक्रांची संकल्पना रागांच्या माध्यमातून उलगडणारा ‘चक्रव्ह्यू’ हा कार्यक्रम ‘बासरी परंपरा’Basari Parampara Festival Pune या सांगीतिक महोत्सवाचा कळसाध्याय ठरला. पंडित रूपक कुलकर्णी, बासरीवादक मृगेंद्र मोहाडकर आणि त्यांच्या तब्बल ९३ शिष्यांनी केलेल्या सामूहिक बासरीवादनाने उपस्थित रसिकांना एक अद्वितीय आणि मंत्रमुग्ध करणारा सांगीतिक अनुभव दिला. रूपक कुलकर्णी म्युझिक फाऊंडेशन आणि ब्लिसफुल विंड्स फाऊंडेशनतर्फे बासरीवादक मृगेंद्र मोहाडकर यांनी या महोत्सवाचे आयोजन केले होते.

Basari Parampara Festival Pune भूगाव येथील पूना वेस्टर्न क्लब येथे झालेल्या या कार्यक्रमाला संगीतप्रेमींची मोठी उपस्थिती लाभली. संपूर्ण कार्यक्रमात भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा, अध्यात्मिक विचार आणि कलात्मक अभिव्यक्ती यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला.

पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया Hariprasad Chaurasia यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित रूपक कुलकर्णी Pandit Rupak Kulkarni यांच्या संकल्पनेतून ‘चक्रव्ह्यू’ ही अनोखी मैफल साकारली. या संकल्पनेतून बासरीवादनाच्या माध्यमातून मानवी शरीरातील सात ऊर्जा केंद्रे म्हणजेच सप्तचक्रांचे महत्त्व आणि त्यांचे भावविश्व रागांच्या कल्पक मांडणीतून रसिकांसमोर उलगडण्यात आले. विशेष म्हणजे, या सादरीकरणात चार पिढ्यांतील बासरीवादकांचा समन्वय पाहायला मिळाला. पंडित रूपक कुलकर्णी यांच्यासह त्यांचे शिष्य मृगेंद्र मोहाडकर आणि त्यांच्या ९३ शिष्यांनी ही परंपरा पुढे नेत प्रभावीपणे सादरीकरण केले.

सादरीकरणाची सुरुवात मूलाधार चक्राच्या स्थिरता आणि आत्मविश्वास दर्शविणाऱ्या गुणधर्माने झाली. या चक्राचे भावविश्व राग आनंदभैरवच्या माध्यमातून मांडण्यात आले. त्यानंतर संवर्धन, सर्जनशीलता आणि प्रवाहशीलता दर्शविणाऱ्या स्वाधिष्ठान चक्रासाठी राग शुद्ध सारंग सादर करण्यात आला. पुढे निर्णयक्षमता आणि ऊर्जा दर्शविणाऱ्या मणिपूर चक्रासाठी शुद्ध कल्याण राग सादर करण्यात आला. या सादरीकरणात पहाडी धून आणि लोकसंगीताची हलकीशी झलकही अनुभवायला मिळाली.

हृदयाच्या मध्यभागी असलेल्या अनाहत चक्राची भावपूर्णता आणि संवेदनशीलता दर्शविताना राग पटदीपवर आधारित ‘मर्म बंधातली ठेव ही’ हे नाट्यगीत बासरीच्या सुरांत सादर करण्यात आले. या रचनेने सभागृहातील वातावरण अधिकच भावपूर्ण केले.

यानंतर कंठस्थानी असलेल्या विशुद्ध चक्राचे महत्त्व उलगडताना ‘कानडा राजा पंढरीचा’ हे प्रसिद्ध भक्तिगीत बासरीच्या स्वरांत गुंजले. सत्य, संवाद आणि भावविश्व यांचा सुंदर संगम या सादरीकरणातून साधला गेला.

पुढील टप्प्यात गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत आज्ञाचक्रासाठी राग देस सादर करण्यात आला. या सादरीकरणात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी रचलेली गत सादर करण्यात आली. पंडित रूपक कुलकर्णी यांनी आपल्या प्रभावी बासरीवादनातून या रचनेतून रसिकांना अक्षरशः संमोहित केले.

कार्यक्रमाच्या अखेरीस जीवनाला उर्जा देणाऱ्या सर्वोच्च सहस्त्रार चक्राचे दर्शन घडविताना राग हंसध्वनीमध्ये मध्यलयीत ‘वातापी’ ही रचना सादर करण्यात आली. यानंतर पंडित रूपक कुलकर्णी यांनी गुरू मल्हारराव कुलकर्णी यांच्याकडून शिकलेली द्रुत लय तसेच पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडून आत्मसात केलेली अति द्रुत लय प्रभावीपणे सादर केली. त्यांच्या या सादरीकरणाने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

या संपूर्ण मैफलीत पंडित रूपक कुलकर्णी आणि मृगेंद्र मोहाडकर यांनी त्यांच्या शिष्यांसह केलेल्या बासरीवादनाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. कार्यक्रमाला पंडित रामदास पळसुले आणि श्रीराज ताम्हणकर (तबला), शंतनू पांडे (की-बोर्ड) आणि खुशी पाठक (सारंगी) यांनी उत्कृष्ट साथसंगत दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस कथक नृत्यांगना राधिका करंदीकर यांनी जयपूर-बनारस घराण्याच्या शैलीतील कथक नृत्य सादर करून कार्यक्रमाची सुरेल सुरुवात केली. यात ताल रूपक, शिवध्यान, दुर्गापरण, चक्रदार, तिश्रजाती आणि शिवकवित्त अशा विविध रचना सादर करण्यात आल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेत्री गौतमी देशपांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रजत जोशी यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रमाने बासरीवादनाच्या परंपरेचा गौरव आणि भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा यांचा सुंदर संगम रसिकांसमोर उभा केला.

हे ही वाचा : VC Properties Pune व्ही.सी. प्रॉपर्टीजचे भव्य चॅनेल पार्टनर्स संमेलन; ६०० हून अधिक रिअल इस्टेट व्यावसायिकांची उपस्थिती