Maharashtra Police MD Drug Bust: बंगळुरूमधील तीन एमडी ड्रग्ज कारखाने उद्ध्वस्त

Maharashtra Police MD Drug Bust

पुणे: महाराष्ट्र अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (Anti Narcotics Task Force) कर्नाटकातील बंगळुरू शहरात धडक कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज तयार करणारे तीन अवैध कारखाने उद्ध्वस्त केले (Maharashtra Police MD Drug Bust).

या कारवाईत तब्बल ५५ कोटी ८८ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आंतरराज्य ड्रग्ज रॅकेटचा मोठा पर्दाफाश झाला आहे.

राज्यात अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक व वितरण रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना केली आहे. सध्या राज्यभरात सात विभागीय कृती गट कार्यरत असून, कोकण कृती गटाच्या तपासातून ही मोठी कारवाई उघडकीस आली (Maharashtra Police MD Drug Bust).

२१ डिसेंबर रोजी नवी मुंबईतील वाशी येथील पुणे–मुंबई महामार्गालगत असलेल्या जुन्या बस डेपो परिसरात छापा टाकून आरोपी अब्दुल कादर रशीद शेख याच्याकडून १ किलो ४८८ ग्रॅम एमडी ड्रग्ज (अंदाजे किंमत १ कोटी ४८ लाख ८० हजार रुपये) जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तपास व तांत्रिक विश्लेषणादरम्यान बेळगाव येथील रहिवासी प्रशांत यल्लापा पाटील हा एमडी ड्रग्ज तयार करत असल्याची माहिती समोर आली. पुढील तपासात बंगळुरू शहरातील तीन ठिकाणी एमडी ड्रग्जचे गुप्त कारखाने सुरू असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस पथकाने बंगळुरू येथे जाऊन सूरज रमेश यादव आणि मालखान रामलाल बिश्नोई या दोन आरोपींना अटक केली.

Maharashtra Police MD Drug Bust: २१ किलो ४०० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त

आरोपींच्या कबुलीजबाबानुसार स्पंदना लेआउट कॉलनीतील एनजी गोलाहळी भागात असलेली ‘आर. जे. इव्हेंट’ नावाची फॅक्टरी तसेच येरपनाहळी कन्नूर परिसरातील लोकवस्तीत असलेल्या आरसीसी घरामध्ये एमडी ड्रग्ज तयार केले जात होते.

या तिन्ही ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी ४ किलो १०० ग्रॅम घन स्वरूपातील एमडी आणि १७ किलो द्रव स्वरूपातील एमडी असा एकूण २१ किलो ४०० ग्रॅम एमडी ड्रग्ज, यंत्रसामग्री आणि विविध रसायने जप्त केली. तिन्ही कारखाने पूर्णतः उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.

Maharashtra Police MD Drug Bust: भारतातील विविध राज्यांमध्ये पुरवले जात होते ड्रग्ज

या कारखान्यांतून तयार होणारे एमडी ड्रग्ज भारतातील विविध राज्यांमध्ये पुरवले जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. ड्रग्ज विक्रीतून मिळालेल्या पैशांतून आरोपींनी बंगळुरू शहरात मोठ्या प्रमाणावर स्थावर मालमत्ता खरेदी केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून, आणखी दोन प्रमुख आरोपींचा शोध सुरू आहे (Maharashtra Police MD Drug Bust).

ही संपूर्ण कारवाई अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद, विशेष पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत आणि उपमहानिरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुणे कृती गटाचे पोलीस अधीक्षक एम. एम. मकानदार, अपर पोलीस अधीक्षक कृष्णात पिंगळे, उप अधीक्षक रामचंद्र मोहिते आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

दरम्यान, अंमली पदार्थांबाबत कोणतीही गोपनीय माहिती असल्यास नागरिकांनी ०७२१ ८००००७३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने केले आहे (Maharashtra Police Drug Bust).

हेही वाचाः PIFF 2026: ‘ऑस्कर’च्या यादीतील ९ चित्रपट पिफमध्ये पाहण्याची संधी 

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.
Exit mobile version