Kidney Transplant at Sassoon Hospital: आईच्या किडनी दानातून तरुणाला नवे आयुष्य

Kidney Transplant at Sassoon Hospital

पुणेः आईच्या मूत्रपिंडदानामुळे तरुणाला नवे आयुष्य मिळाले आहे. पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात अत्यंत कमी खर्चात ३५वी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली (Kidney transplant at Sassoon hospital).

पुणे शहरातील नामांकित महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या आणि गरीब कुटुंबातील २२ वर्षीय तेजसचे (नाव बदललेले) दोन वर्षांपूर्वी उच्च रक्तदाबामुळे दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली होती. त्यानंतर तो नियमितपणे डायलिसिसवर होता. डॉक्टरांनी मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. मात्र खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेसाठी १० ते १५ लाख रुपयांचा खर्च असल्याने तो परवडणारा नव्हता.

तेजसचे वडील साफसफाईचे काम करतात. त्यांचे मासिक उत्पन्न अवघे १३ हजार रुपये असून या तुटपुंज्या पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेच कठीण होते. त्यामुळे एवढा मोठा वैद्यकीय खर्च उचलणे अशक्य होते. याच दरम्यान ससून रुग्णालयात कमी खर्चात मूत्रपिंड प्रत्यारोपण (Kidney transplant at Sassoon hospital) होते, अशी माहिती कुटुंबाला मिळाली.

यानंतर त्यांनी ससूनमधील समाजसेवा अधीक्षक सत्यवान सुरवसे आणि अरुण बनसोडे यांची भेट घेतली. त्यांनी संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. रक्ताच्या नात्यातील व्यक्तीने मूत्रपिंड दान केल्यास प्रत्यारोपण लवकर करता येते, अशी माहिती देण्यात आली. मुलाच्या प्रेमापोटी तेजसच्या आईने मूत्रपिंड दान करण्याचा निर्णय घेतला आणि शनिवारी (ता. २७) ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.

Kidney Transplant at Sassoon Hospital: महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लपा जाधव, शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डॉ. लता भोईर आणि मानवी अवयव प्रत्यारोपण कार्यक्रम प्रमुख डॉ. किरणकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या शस्त्रक्रियेसाठी मेडिसीन विभागप्रमुख डॉ. हरिदास प्रसाद, पथक प्रमुख डॉ. हर्षल भितकर, मूत्रपिंडविकार तज्ज्ञ डॉ. निरंजन आंबेकर, डॉ. संदीप मोरखंडीकर, डॉ. सुरेश पाटणकर आणि डॉ. राजेश श्रोत्री यांनी मोलाचे सहकार्य केले.

ससून रुग्णालयात महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या जातात. योजनेत समाविष्ट नसलेली औषधे, इंजेक्शन, शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य तसेच प्रत्यारोपणानंतरच्या आवश्यक तपासण्या सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे रुग्णांवर अत्यल्प खर्चाचा भार येतो. मूत्रपिंड किंवा यकृत प्रत्यारोपण इच्छिणाऱ्या रुग्णांनी ससून रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे (Kidney Transplant at Sassoon Hospital).

हेही वाचाः International Ayurveda Ratna Award: डॉ हरीश पाटणकर यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान 

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.
Exit mobile version