पुणे : पुणे महापालिकेत ( Pune Municipal Corporation ) महापौरपदासाठी मंजुषा नागपुरे आणि उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांचा विजय आता केवळ औपचारिकतेपुरता उरला आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे ही निवडणूक एकतर्फी ठरणार आहे.
महापौर व उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केले असले, तरी पुणे महापालिकेत ( Pune Municipal Corporation ) भाजपची एकहाती सत्ता असल्याने निकालाबाबत कोणतीही शंका उरलेली नाही.
त्यामुळे ९ फेब्रुवारी रोजी होणारी निवडणूक ही केवळ प्रक्रियात्मक ठरणार आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने ११९ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले आहे. महापौरपद हे यंदा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने भाजपमध्ये इच्छुकांची मोठी रांग लागली होती. चौथ्यांदा निवडून आलेल्या वर्षा तापकीर यांच्यासह मंजुषा नागपुरे, रंजना टिळेकर, मानसी देशपांडे आणि स्वरादा बापट यांच्या नावांची जोरदार चर्चा होती. मात्र, अखेर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने मंजुषा नागपुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
महापौरपदासाठी मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्यानुसार मंजुषा नागपुरे यांनी महापौरपदासाठी, तर उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर यांनी नगरसचिव योगिता भोसले यांच्याकडे अधिकृत उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, गटनेते गणेश बिडकर, माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते.
महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत होणार आहे. निवडणुकीच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. मात्र भाजपकडे स्पष्ट संख्याबळ असल्याने प्रत्यक्ष मतदानाची वेळ येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंजुषा नागपुरे यांच्या निवडीमुळे सिंहगड रोड परिसराला प्रथमच महापौरपदाचा मान मिळणार आहे. नागपुरे या सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या असून, यंदाच्या महापालिका निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक ३४ मधून बिनविरोध विजय मिळवला आहे. स्थायी समितीसह महत्त्वाच्या समित्यांवर काम केलेल्या नागपुरे या भाजपच्या अनुभवी व निष्ठावंत नेत्या म्हणून ओळखल्या जातात.
उपमहापौरपदासाठी परशुराम वाडेकर यांची निवड निश्चित मानली जात आहे. मागील टर्ममध्ये त्यांच्या पत्नी सुनिता वाडेकर या उपमहापौर होत्या. त्यामुळे पुणे महापालिकेत पत्नीपाठोपाठ पती उपमहापौर होण्याचा दुर्मिळ योग जुळून आला आहे.
मंजुषा नागपुरे यांची निवड झाल्यानंतर त्या पुण्याच्या ५८व्या महापौर तर दहाव्या महिला महापौर ठरणार आहेत. भाजपच्या सत्ताबळावर पुणे महापालिकेतील सत्ता समीकरणांवर पुन्हा एकदा भाजपची मोहोर उमटली आहे.
Leave a Reply