Pune Municipal Corporation Budget 2026-27 निरोगी पुण्याकडे मोठी झेप; महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला प्राधान्य, कॅन्सर हॉस्पिटल, आयव्हीएफ सेवा, मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांची घोषणा; स्वस्त व दर्जेदार उपचारांचा संकल्प

Shrinath Bhimale

पुणे : शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि सर्वसामान्यांना परवडणारी करण्याच्या उद्देशाने पुणे महानगरपालिकेच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात Pune Municipal Corporation Budget 2026-27 “निरोगी पुणे” ही महत्त्वाकांक्षी संकल्पना पुढे आणण्यात आली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले Shrinath Bhimale यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात आरोग्य सेवांसाठी भरीव तरतूद करत विद्यमान सुविधांचे सक्षमीकरण आणि नव्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली.

Pune Municipal Corporation Budget 2026-27 महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेत सध्या ५३ बाह्य रुग्ण विभाग, २० प्रसूतिगृहे, ४०० खाटांचे सर्वसाधारण रुग्णालय आणि संसर्गजन्य आजारांसाठी स्वतंत्र रुग्णालय कार्यरत आहे. दररोज सुमारे १२ हजार बाह्यरुग्ण आणि ३०० आंतररुग्ण उपचार घेतात, तर दरवर्षी सुमारे ३० लाख नागरिकांना आरोग्य सेवा पुरवली जाते.

याशिवाय दरवर्षी ८५०० प्रसूती महापालिकेच्या रुग्णालयांत होतात. या सर्व सेवा विनामूल्य उपलब्ध असून शहरी गरीबांसाठी औषधे व अंशदायी वैद्यकीय साह्य योजनांसाठी सुमारे १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मल्टिस्पेशालिटी Multispeciality Hospitals रुग्णालयांचा विस्तार

शहरातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सहा प्रसूतिगृहे आणि पाच रुग्णालयांचे रूपांतर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांत करण्यात येणार आहे. येथे आयसीयू, एनआयसीयू आणि अत्याधुनिक नर्सिंग सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. वारजे येथे ३५० खाटांचे आधुनिक मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे काम वेगात सुरू आहे.

कॅन्सर रुग्णांसाठी मोठा दिलासा

बाणेर येथे सार्वजनिक-खासगी भागीदारीत महापालिकेचे पहिले कॅन्सर रुग्णालय Cancer Hospital Baner उभारण्यात येणार आहे. येथे लिनियर एक्सलेरेटरद्वारे रेडिओथेरपीसारखे अत्याधुनिक उपचार ‘सीजीएचएस’ दरात उपलब्ध होतील. त्यामुळे कॅन्सर उपचारासाठी होणारा प्रचंड खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.

स्वस्त दरात निदान सुविधा

गंगाधाम परिसरात एमआरआय आणि सिटी-स्कॅन केंद्र उभारले जाणार असून महागड्या तपासण्या कमी दरात उपलब्ध होणार आहेत. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

प्रसूतिगृहांत ‘आयव्हीएफ’ सेवा

महापालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये आयव्हीएफ IVF Treatment Services (इन विट्रो फर्टिलायझेशन) सेवा सुरू करण्यात येणार आहे. वंध्यत्वावरील आधुनिक उपचार आता सर्वसामान्य कुटुंबांनाही परवडणाऱ्या दरात मिळणार आहेत.

आर्थिक सहाय्य मर्यादेत वाढ

कर्करोग आणि मूत्रपिंडाच्या आजारांसाठी डायलिसिस उपचारांवरील आर्थिक सहाय्याची मर्यादा ३ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजनेची पुनर्रचना करून ती अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वैद्यकीय शिक्षणालाही चालना

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातून यंदा एमबीबीएसची पहिली बॅच बाहेर पडणार आहे. पदव्युत्तर शिक्षण, जेरियाट्रिक केअर सेंटर, आयव्हीएफ सुविधा आणि दिव्यांग मुलांसाठी विशेष देखभाल युनिट सुरू करण्याचे नियोजन आहे. नायडू रुग्णालय परिसरात १४ मजली विद्यार्थी वसतिगृह आणि कर्मचारी निवास उभारण्यात येणार आहे.

एकूणच, “निरोगी पुणे” या संकल्पनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांमुळे पुणेकरांना शहरातच स्वस्त, दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हे ही वाचा : Pune Architecture Awards पायाभूत विकास, बांधकाम क्षेत्रामध्ये आर्किटेक्टचे मोलाचे  योगदान, आर्कि. विलास अवचट यांचे प्रतिपादन; आर्किटेक्ट, इंजिनिअर्स अँड सर्व्हेयर्स असोसिएशनतर्फे ‘एईएसए वार्षिक पुरस्कार’ वितरण

Exit mobile version