National Single Parent Day India पालकत्व समृद्ध होण्यासाठी मुलांशी मैत्र जपणे गरजेचे; मृदुला भाटकर यांचे प्रतिपादन; ‘क्रिसेंट’तर्फे आयोजित एकल पालक संमेलन उत्साहात

National Single Parent Day India

पुणे : National Single Parent Day India”आईवडील हे मुलांचे काळजीवाहक, सेवादाते आणि संरक्षक असतात. त्यासोबतच त्यांना प्रेमाचा व मायेचा आधार हवा असतो. त्यामुळे पालकांनी मुलांशी मैत्र जपायला हवे. त्यातूनच पालकत्व अधिक समृद्ध होत जाते,” असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश मृदुला भाटकर यांनी केले. एकल पालकत्व निभावताना मनाचा कणखरपणा खूप महत्वाचा असतो, असेही त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय एकल पालक दिवसाच्या (२१ मार्च) निमित्ताने क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर्सतर्फे आयोजित एकल पालक संमेलनात भाटकर बोलत होत्या.

National Single Parent Day India पालकांनी मुलांची तुलना न करता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर करत त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. मुलांशी पालक म्हणून नव्हे, तर विश्वासू मित्र म्हणून नाते निर्माण करावे असे प्रतिपादन भाटकर यांनी केले.

बीएमसीसी रस्त्यावरील दादासाहेब दरोडे सभागृहात आयोजित या संमेलनावेळी दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुवेंद्र महाजन, कौटूंबिक न्यायालयातील ज्येष्ठ समुपदेशिका डॉ. स्मिता प्रकाश जोशी, राजेंद्र ततार, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर्सचे संस्थापक दिनेश कोठावदे, संचालक भूषण वाणी आदी उपस्थित होते. संघर्षाला सामोरे जात आपल्याला मुलांना घडवणाऱ्या काही एकल पालकांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.

मृदुला भाटकर यांनी एकल पालकत्वाच्या विविध पैलूंवर अत्यंत संवेदनशील आणि वास्तववादी दृष्टिकोन मांडला. त्या म्हणाल्या, “एकल पालकांना अनेक भावनिक, सामाजिक आणि आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागते; मात्र त्यातूनच शिकण्याची, स्वतःला सक्षम बनवण्याची संधीही मिळते. योग्य दृष्टिकोन, संयम आणि सकारात्मक विचारसरणी ठेवली, तर पालकत्व ताणतणावाचा विषय न राहता आनंददायी आणि समाधानकारक अनुभव ठरतो.

पालकांनी मुलांची तुलना न करता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर करत त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. मुलांशी पालक म्हणून नव्हे, तर विश्वासू मित्र म्हणून नाते निर्माण करावे. विश्वास, संवाद आणि समजूतदारपणा या तीन गोष्टींवर पालक-मुलांचे नाते अधिक दृढ होते.”

“समाज बदलतो, तसे कायदेही बदलत जातात. हे बदल समाजाच्या कल्याणासाठीच असतात. त्यामुळे एकल पालकांनी कायद्याबाबत जागरूक राहून आपल्या हक्कांची आणि जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. एखादी व्यक्ती वैवाहिक नात्यात अपयशी ठरली, तर ती पालक म्हणूनही अपयशी ठरेलच असे नाही. उलट, अनेकवेळा अशा व्यक्ती अधिक संवेदनशील आणि जबाबदार पालक म्हणून पुढे येतात,” असेही त्यांनी नमूद केले. 

एकल पालकांशी थेट संवाद साधत भाटकर यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मुलांच्या संगोपन, शिक्षण, मानसिक ताणतणाव, कुटुंबीय संबंध आणि कायदेशीर बाबींशी संबंधित प्रश्नांवर त्यांनी अत्यंत सोप्या आणि स्पष्ट भाषेत मार्गदर्शन केले. प्रत्येक प्रश्नाकडे त्यांनी सहानुभूतीने पाहत परिस्थितीनुसार व्यावहारिक उपाय सुचवले. त्यांच्या संवादात्मक शैलीमुळे उपस्थित पालकांना आपले प्रश्न मोकळेपणाने मांडण्याची संधी मिळाली.

दिव्यांगांचे पालकत्व निभावताना याविषयीचे अनुभव सांगत यजुवेंद्र महाजन म्हणाले, “केवळ स्वतःसाठी जगणे म्हणजे मृत्यूसमान असून, इतरांसाठी निःस्वार्थपणे जगण्यातच खऱ्या अर्थाने जीवनाचे समाधान आहे. ‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ हे जीवनाचे अंतिम ध्येय मानून माझ्या आयुष्याची दिशा समाजकार्यासाठी समर्पित केली. वैयक्तिक सुखांचा त्याग करून अनेक गरजू मुलांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला.

सुरुवातीला १० मुलांना दत्तक घेत त्यांच्या शिक्षण व संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. आज शेकडो मुलांचे पालकत्व असून, त्यातील एक कन्या भारतातील पहिली दिव्यांग न्यायाधीश झाली आहे, तर इतर अनेक मुले उच्च पदांवर कार्यरत आहेत, हे पाहून समाधान वाटते.”

भूषण वाणी यांनी आर्थिक नियोजनाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, पालकत्व ही एक दीर्घकालीन जबाबदारी असून, त्यासाठी शिस्तबद्ध आर्थिक नियोजन आवश्यक आहे. विमा म्हणजे केवळ गुंतवणूक नसून, आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठीचे संरक्षण आहे. वाढत्या आरोग्य खर्चाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक तयारी अत्यंत गरजेची असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, लहान रकमेपासून सुरू होणारी गुंतवणूक भविष्यात मोठ्या संपत्तीत रूपांतरित होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

डॉ. स्मिता जोशी यांनी एकल पालकांच्या समस्या प्रभावी आणि संवेदनशील पद्धतीने मांडण्याचा अभिनव प्रयत्न केला. त्यांनी लहान मुलांच्या सहभागातून सादर करण्यात आलेल्या छोट्या नाटिकेच्या माध्यमातून एकल पालकांच्या दैनंदिन आयुष्यातील भावनिक, सामाजिक आणि मानसिक आव्हानांचे जिवंत चित्र उभे केले.

हे ही वाचा :Pune Municipal Corporation कचरा प्रकल्पावरून यू-टर्न : विनानिविदा प्रस्ताव रद्द, आता खुली निविदा अनिवार्य; भूमिग्रीन मक्तेदारीवर टीकेनंतर पालिकेचा निर्णय; आयुक्त नवल किशोर राम यांची स्पष्ट भूमिका

Exit mobile version