Hindustan Antibiotics Limited employees salary issue हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या कर्मचाऱ्यांचे वेतन, कोविडनंतरच्या आजाराप्रश्नी डॉ. मेधा कुलकर्णी यांची केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्याशी चर्चा

'एचएएल' कर्मचाऱ्यांचे वेतन, कोविडचे परिणाम यासंदर्भात केंद्रीय मंत्री नड्डा यांची भेट घेत डॉ. मेधा कुलकर्णी यांची चर्चा

पुणे : हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेड (एचएएल) पुणे ( Hindustan Antibiotics Limited employees salary issue) येथील कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित २००७ वेतन सुधारणेचा प्रश्न, तसेच पोस्ट-कोविड काळात वाढत असलेल्या ‘एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस (एव्हीएन) ऑफ हिप जॉइंट’ या गंभीर आरोग्य समस्येवर राज्यसभा खासदार डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांची थेट भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

नड्डा यांच्याशी झालेल्या या भेटीत डॉ. कुलकर्णी यांनी ‘एचएएल’ कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रश्नाबाबत ( Hindustan Antibiotics Limited employees salary issue) सविस्तर माहिती दिली.

गेल्या जवळपास तीन दशकांपासून कर्मचारी १९९७ च्या वेतनश्रेणीनुसार वेतन घेत असून, २००७ वेतन सुधारणा अद्याप प्रलंबित असल्याने कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण व मनोबलावर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एचएएल व्यवस्थापनाने आवश्यक सर्व स्पष्टीकरणांसह प्रस्ताव प्रशासकीय मंत्रालयाकडे सादर केला असूनही निर्णय प्रलंबित असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

याच भेटीत डॉ. कुलकर्णी यांनी पोस्ट-कोविड काळात महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये युवक व नोकरी करणाऱ्या वयोगटात वाढत असलेल्या ‘एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप जॉइंट’ या आजाराबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये या आजारामुळे लवकर टप्प्यात हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेची गरज भासत असून, त्यातून मोठ्या सामाजिक व आर्थिक अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर पोस्ट-कोविड ‘एव्हीएन’ संदर्भात राष्ट्रीय पातळीवरील सखोल अभ्यास, प्रभावी आरोग्य सर्वेक्षण आणि धोरणात्मक उपाययोजना राबविण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी मांडले. दोन्ही विषय सार्वजनिक हिताचे असल्याने त्यावर सकारात्मक व तातडीने निर्णय घेण्याची विनंती त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली.

हे ही वाचा : Pune Municipal Corporation पुणे महापालिकेत महापौर-उपमहापौरांची बिनविरोध निवड; मंजूषा नागपुरे महापौर, परशुराम वाडेकर उपमहापौर

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.
Exit mobile version