पुणे : (Pune Municipal Corporation) पुणे महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या नगरसेविका मंजूषा नागपुरे यांची महापौरपदी, तर भाजप-रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) परशुराम वाडेकर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. भाजपने महापालिका निवडणुकीत सर्वाधिक ११९ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविल्याने महापौर-उपमहापौरपदावर भाजपचाच दावा निश्चित मानला जात होता.
(Pune Municipal Corporation) मंजूषा नागपुरे दहाव्या महिला महापौर, परशुराम वाडेकर उपमहापौर
सोमवारी सकाळी ११ वाजता नगरसचिव योगिता भोसले यांनी निवड प्रक्रियेची माहिती दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी खासदार सुरेश कलमाडी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव आणि माजी महापौर शांतिलाल सुरतवाला यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर, महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावनिक विनंती भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनी सर्व विरोधी पक्षांकडे केली
.
विरोधकांचा सकारात्मक प्रतिसाद
भाजपच्या या विनंतीला मान देत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने निवडणुकीतून माघार घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार शीतल सावंत, तर काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यामुळे मंजूषा नागपुरे यांची महापौरपदी बिनविरोध निवड निश्चित झाली. उपमहापौरपदासाठीही चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता बहिरट आणि काँग्रेसचे साहिल केदारी यांनी माघार घेतल्याने परशुराम वाडेकर यांचा मार्ग मोकळा झाला.
जल्लोषाला फाटा, साधेपणाने स्वागत
राज्यातील इतर महापालिकांमध्ये महापौर-उपमहापौर निवडीनंतर जल्लोष, घोषणा आणि पारंपरिक वेशभूषेतील आनंदोत्सव दिसून आला. मात्र पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) शोकाकुल वातावरणामुळे कोणताही जल्लोष न करता, अत्यंत साधेपणाने निवड प्रक्रिया पार पडली. जोरदार टाळ्या, हारतुरे, घोषणा यांना फाटा देत, सर्व गटनेत्यांनी नवविर्वाचित महापौर व उपमहापौरांचे शांतपणे अभिनंदन केले.
दहाव्या महिला महापौर
पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) इतिहासात १९९२ मध्ये कमल व्यवहारे या पहिल्या महिला महापौर ठरल्या होत्या. त्यानंतर अॅड. वंदना चव्हाण, वत्सला आंदेकर, दीप्ती चवधरी, रजनी त्रिभुवन, राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, दिवंगत चंचला कोद्रे आणि दिवंगत मुक्ता टिळक यांनी महापौरपद भूषवले. सोमवारी झालेल्या निवडणुकीनंतर मंजूषा नागपुरे या पुण्याच्या दहाव्या महिला महापौर ठरल्या आहेत.
विकासावर भर देण्याचा निर्धार
“पुणेकरांना वाहतूक कोंडीमुक्त, प्रदूषणविरहित हवा असलेले सुरक्षित शहर हवे आहे. शहर विद्रूप होणार नाही, अतिक्रमणांच्या विळख्यात सापडणार नाही, यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करू,” अशी ग्वाही नवनिर्वाचित महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिली.
उपमहापौर परशुराम वाडेकर म्हणाले, “झोपडपट्टीवासीयांसह वंचित आणि दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांसाठी मी कायम आवाज उठवला. पत्नीला उपमहापौरपदाची संधी मिळाल्यानंतर आता मला ही जबाबदारी मिळाली आहे. या संधीचा उपयोग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी करणार आहे.
राज्यातील पहिले दांपत्य
परशुराम वाडेकर आणि त्यांच्या पत्नी सुनीता वाडेकर हे राज्यातील पहिले उपमहापौर दांपत्य ठरल्याने यावेळी सभागृहात विशेष चर्चा रंगली. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दोघांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
1 Comment