पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरून इतर शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या किंवा आपली दुचाकी पार्सलने पाठवणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आहे. पुणे रेल्वे प्रशासनाने पार्सल सेवेद्वारे दुचाकी पाठवताना (Two Wheeler Parcel) केली जाणारी ‘पॅकिंग’ची सक्ती आता पूर्णपणे रद्द केली आहे. रेल्वेच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ग्राहकस्नेही निर्णयामुळे वाहनधारकांची मोठी आर्थिक बचत होणार असून, प्रत्येक दुचाकीमागे थेट ३४३ रुपये वाचणार आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
(Two Wheeler Parcel) पुणे रेल्वे स्थानकावरील पार्सल कार्यालयातून दररोज सुमारे ८० ते ९० दुचाकी वेगवेगळ्या शहरांमध्ये पार्सलद्वारे पाठवल्या जातात. तसेच, दररोज तेवढ्याच प्रमाणात इतर शहरांतूनही वाहने पुण्यात दाखल होतात.
आजवर रेल्वेने दुचाकी पाठवण्यासाठी (Two Wheeler Parcel) तिचे पॅकिंग करणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, या अनिवार्य नियमाचा गैरफायदा घेत काही खाजगी कंत्राटदारांकडून प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट केली जात असल्याचे समोर आले होते.
पॅकिंगच्या नावाखाली (Two Wheeler Parcel) प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जात असल्याच्या अनेक लेखी व तोंडी तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत पुणे रेल्वे प्रशासनाने तात्काळ पावले उचलली. प्रशासनाने मनमानी करणाऱ्या संबंधित खाजगी कंत्राटदाराचे कंत्राट तर रद्द केलेच, शिवाय प्रवाशांना या त्रासातून कायमची मुक्ती देण्यासाठी पॅकिंगची अटच पूर्णपणे रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
सुरक्षेसाठी पॅकिंग आता ऐच्छिक; प्रवाशांना पर्याय खुला
रेल्वे प्रशासनाने पॅकिंगची सक्ती (Two Wheeler Parcel) जरी रद्द केली असली, तरी वाहतुकीदरम्यान गाडीला ओरखडे (स्क्रॅच) पडू नयेत किंवा गाडीचे नुकसान होऊ नये असे ज्या वाहनधारकांना वाटते, त्यांच्यासाठी सुरक्षेचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. अशा प्रवाशांना त्यांच्या इच्छेनुसार बाहेरून स्वतःच्या गाडीचे पॅकिंग करून आणण्याची मुभा असेल. तसेच ते स्वतः आपल्या गाडीला पुठ्ठा किंवा इतर संरक्षक साहित्य बांधू शकतात. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही सक्ती किंवा आडकाठी केली जाणार नाही. हा निर्णय पूर्णपणे प्रवाशांच्या इच्छेवर सोपवण्यात आला आहे.
“रेल्वेने दुचाकी पाठविताना (Two Wheeler Parcel) पूर्वी पॅकिंगची अट बंधनकारक होती, ती आता आम्ही पूर्णपणे रद्द केली आहे. यासोबतच वाहनधारकांकडून जास्त रक्कम आकारणाऱ्या कंत्राटदाराचे कंत्राटदेखील रद्द करण्यात आले आहे. यापुढे वाहने पाठविण्यासाठी कोणीही अतिरिक्त किंवा जास्त रकमेची मागणी केल्यास प्रवाशांनी थेट तक्रार करावी. अशा प्रवृत्तींवर तात्काळ आणि कठोर कारवाई केली जाईल.”
— हेमंत कुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे.
वाहनधारकांनो, दुचाकी बुक करताना ‘हे’ नियम नक्की लक्षात ठेवा!
रेल्वेने दुचाकी पाठवताना (Two Wheeler Parcel) कोणतीही अडचण येऊ नये आणि आपला प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने काही महत्त्वाचे नियम जारी केले आहेत:
१. कागदपत्रे आवश्यक: दुचाकी पार्सल करताना गाडीचे मूळ आरसी बुक (Registration Certificate) आणि वाहनधारकाचे अधिकृत ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी) आणि त्यांच्या झेरॉक्स प्रती सोबत असणे अत्यंत बंधनकारक आहे.
२. पेट्रोलची टाकी रिकामी असावी: सुरक्षेच्या कारणास्तव आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी दुचाकीच्या टाकीतील पेट्रोल पूर्णपणे काढून घेतलेले असावे.
३. वेळेचे नियोजन: ज्या रेल्वेने तुम्हाला दुचाकी पाठवायची आहे, ती गाडी सुटण्याच्या किमान ३ ते ४ तास आधी दुचाकी पार्सल बुकिंग कार्यालयात आणणे गरजेचे आहे.
४. लगेज की पार्सल?: जर प्रवासी स्वतः त्याच ट्रेनने प्रवास करत असेल, तर दुचाकी ‘लगेज’ म्हणून सोबत नेता येते. मात्र, प्रवासी स्वतः सोबत प्रवास करत नसेल, तर गाडी ‘पार्सल’ म्हणून पाठवावी लागते.
५. सहा तासांची मुदत: दुचाकी संबंधित रेल्वे स्थानकावरील पार्सल कार्यालयात पोहोचल्यानंतर ६ तासांच्या आत ती ताब्यात घेणे बंधनकारक आहे.
६. विलंब शुल्क (दंड): गाडी पोहोचल्यानंतर ६ तास उलटून गेल्यास, पुढील प्रत्येक तासासाठी १० रुपये याप्रमाणे दंड (डेमरेज चार्ज) आकारण्यात येईल.
प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण
रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचे (Two Wheeler Parcel) सर्वसामान्य प्रवासी आणि पुणेकरांकडून जोरदार स्वागत केले जात आहे. ऐन सणासुदीच्या किंवा बदलीच्या काळात दुचाकी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे आता अत्यंत स्वस्त आणि पारदर्शक झाल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत. कंत्राटदारांच्या मनमानीला चाप बसल्याने या प्रक्रियेतील पारदर्शकता अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.