पुणे : पुणे महापालिकेच्या शाळांमधील Pune Municipal Corporation Schools शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून महापालिका प्रशासन १० ई-लर्निंग शाळा सुरू करणार असून त्याचबरोबर सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित ८ नवीन शाळाही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Pune Municipal Corporation Schools १४४ शाळा ‘मॉडेल स्कूल’ म्हणून विकसित; ६८ कोटींची तरतूद • शिक्षकांचा ताण कमी करण्यासाठी ३०० डेटा एन्ट्री ऑपरेटर व ३०० स्वच्छता कर्मचारी नियुक्ती
पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी ही माहिती देताना सांगितले की, पालिका शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी विविध सुधारणा योजना राबविण्यात येत आहेत.
डिजिटल शिक्षण, आधुनिक पायाभूत सुविधा आणि उत्तम शैक्षणिक वातावरण यावर प्रशासनाचा विशेष भर असेल.
महापालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात शाळांच्या नवीन इमारती बांधणे तसेच दुरुस्ती कामांसाठी सुमारे ६८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील अनेक शाळा जुन्या इमारतींमध्ये सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून टप्प्याटप्प्याने नवीन इमारती उभारण्याची योजना आखण्यात आली आहे.
१४४ शाळा ‘मॉडेल स्कूल’ म्हणून विकसित
शहरातील ७५ संकुलांमधील एकूण १४४ शाळा ‘मॉडेल स्कूल’ म्हणून विकसित करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. या शाळांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा, डिजिटल क्लासरूम, ई-लर्निंग साधने, सुधारित ग्रंथालये आणि विद्यार्थ्यांसाठी अनुकूल शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे पालिका शाळांबद्दलचा पालकांचा विश्वास वाढविणे हा प्रशासनाचा उद्देश आहे.
जीर्ण इमारतीतील शाळांचे स्थलांतर
शहरातील काही महापालिका शाळांच्या इमारती अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याने त्या शाळांचे स्थलांतर करणे आवश्यक झाले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जून २०२६ पर्यंत अशा १५ शाळांचे स्थलांतर करणे गरजेचे आहे. त्यापैकी तीन शाळांचे स्थलांतर आधीच पक्क्या इमारतींमध्ये करण्यात आले आहे.
काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात पत्र्याच्या शेडमध्ये वर्ग भरविण्याची तयारी दाखविण्यात आली असली तरी धोकादायक किंवा पडण्याच्या स्थितीत असलेल्या इमारतींमध्ये विद्यार्थ्यांना बसवले जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शिक्षकांचा ताण कमी करण्यासाठी उपाय
शाळांमधील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना अध्यापनाबरोबरच विविध प्रशासकीय कामांमध्ये मोठा वेळ द्यावा लागत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
यावर उपाय म्हणून प्रत्येक शाळेत एक अशा प्रमाणे सुमारे ३०० डेटा एन्ट्री ऑपरेटर नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शिक्षकांचा प्रशासकीय ताण कमी होऊन त्यांना अध्यापनावर अधिक लक्ष केंद्रित करता येणार आहे.
स्वच्छतेसाठी ३०० कर्मचारी
शाळांचा परिसर आणि वर्गखोल्या स्वच्छ ठेवण्यासाठी ३०० स्वच्छता कर्मचारीही नियुक्त केले जाणार आहेत. या कामासाठी सुमारे ७ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच संबंधित संस्थेला वर्क ऑर्डर दिली जाणार आहे.
पालिका प्रशासनाच्या या निर्णयांमुळे शहरातील महापालिका शाळांमध्ये आधुनिक सुविधा वाढून विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी व्यक्त केला.
मुख्य मुद्दे :
१० ई-लर्निंग शाळा आणि सीबीएसईच्या ८ नवीन शाळा सुरू
६८ कोटींची इमारत बांधकाम व दुरुस्तीची तरतूद
१४४ शाळा ‘मॉडेल स्कूल’ म्हणून विकसित होणार
जीर्ण इमारतीतील १५ शाळांचे जून २०२६ पर्यंत स्थलांतर
३०० डेटा एन्ट्री ऑपरेटर व ३०० स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती
हे ही वाचा : Gas supply crisis इराण–इस्राईल तणावाचा परिणाम : व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर निर्बंध; हॉटेल व्यवसायात चिंता